जुईचा निबंध

दिंनाक: 03 Oct 2018 14:59:35


गोष्ट आहे वीस एक वर्षांपूर्वीची. जुई सातवीत शिकत होती. आज शाळेत “कचऱ्याची समस्या” या विषयावर एक व्याख्यान होते. जुई लक्षपूर्वक ऐकत होती. डोक्यात विचारांचे प्रचंड वादळ उठले होते. व्याख्यान संपले. सर्व मुले आपापल्या वर्गात गेली. जुईच्या वर्गात त्यांच्या वर्गशिक्षकांनी त्यांना “कचरा कमी करा” या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला. शाळा सुटली पण कचरा काही जुईचा पिच्छा सोडत नव्हता. जुई विचारांच्या तंद्रीतच घरी पोहोचली. आजीने नाश्ता दिला तरी लक्ष नाही. ती निबंधाचाच विचार करत होती. काय लिहू बरं निबंध? अगदी खरं खरं असलं पाहिजे. काल्पनिक अजिबात नको. रात्री जेवतानासुद्धा जुईचे मन विचारात गुंतले होते. तिचा दादा कल्याण दहावीत होता. त्याने जुईला विचारले, जुईबाई काही मदत हवी का अभ्यासात? मग काय जुईने लगेच दादाला निबंधाचा विषय सांगितला. खरं खरं निबंध लिहिणार आहे हे पण सांगितले. कल्याण म्हणाला, ‘तू निबंध लिही मी तो खरं करून दाखवेन.’ जुईने रात्रभर विचार केला. पहाटे पहाटे तिने चटकन उठून वही पेन हातात घेतले. तासाभरात निबंध लिहून काढला. कधी एकदा दादाला दाखवते असे तिला झाले. ताबडतोब दादाला उठवले आणि निबंध वाचायला दिला. कल्याणने निबंध वाचला आणि तिच्याकडे पाहताच राहिला जणूकाही एखाद्या चिमुकल्या शास्त्रज्ञानेच लिहिला आहे जणू, असे त्याला वाटले. कल्याणने जुईला वचन दिले, ‘हा निबंध मी तुला १० वर्षांनी खरा करून दाखवेन.’ जुईला खूप आनंद झाला. शाळेत व वर्गात छान निबंध लिहिला म्हणून जुईला खूप शाबासकी मिळाली.

पुढे कल्याणने जीवशास्त्र या विषयात पदवी मिळवली. याच विषयात सखोल संशोधन केले. त्याने स्वतःची एक प्रयोगशाळा सुरू केली. वेगवेगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. बरीच माहिती जमवली. एक ठोस कार्यक्रम तयार केला. त्यानुसार आपल्या कामाला सुरुवात केली.

कल्याणने शेतकऱ्यांकडून चार म्हाताऱ्या गायी विकत घेतल्या. त्या त्याला जवळजवळ फुकटच मिळाल्या. कारण त्यांचा काही उपयोग नव्हता. ना दूध दयायच्या ना काम करायच्या. कल्याणने त्यांच्यासाठी गोठा तयार केला. पण चाऱ्याचे काय? त्याने मंडईत जाऊन रोज उरलेला व फेकलेला भाजीपाला घेऊन येण्याचा सपाटा लावला. गायींना चारा मिळू लागला. हळूहळू भाजीवाले, शेजारीपाजारी भाजीपाल्याचा फळांचा कचरा गोठ्यात स्वतःहून देऊ लागले. गायी भरपूर खाऊन सावलीत मस्त आरामात राहू लागल्या. भरपूर शेण मिळू लागले. कल्याणने शेणापासून बायोगॅस प्लांट तयार केला. उरलेल्या चोथ्यापासून खत तयार केले. गांडूळ खत निर्मिती केली. शेणात किडे होत. त्यावर त्याने उपाय शोधला. कोंबड्या पाळल्या. कोंबड्या सर्व किडे फस्त करून मस्त अंडी देऊ लागल्या. कल्याणच्या कचऱ्याचा व्यवसाय वाढीस लागला. त्याला बायोगॅस, खत, अंडी विकून भरपूर उत्पन्न मिळू लागले.

कल्याण एक संशोधक म्हणून नावारूपाला आला. पूर्वी जे लोक त्याला वेडा म्हणून हिणवत होते ते आता कौतुक करत होते. कल्याणचा एक प्रयोग यशस्वी झाल्यावर त्याने दुसरे काम हाती घेतले. शहराच्या मध्यवस्तीतील मच्छीमार्केट म्हणजे एक डोके दुखी होती. त्या कचऱ्याचा सर्वांना फार त्रास व्हायचा. त्यावर कल्याणने उपाय शोधला. त्याने बदक पाळले. त्या बदकांमुळे मच्छीमार्केटचा कचराही लगेच साफ व्हायचा व अंडीही भरपूर मिळायची. कचऱ्याच्या प्रयोगशाळेला लोक लांबून भेटी देण्यासाठी येत. त्याचे सल्ले घेत. कल्याण मोठा ‘बिझनेसमन’ झाला होता.

कल्याणने जे काम केले होते ते खरे जुईचे स्वप्न होते. त्याने जुईला आपली प्रयोग शाळा दाखवायला नेले. जुई ते सर्व पाहून थक्क झाली. कचऱ्यातून एवढा मोठा पराक्रम तिच्या दादाने करून दाखविला होता. कोणतेही भांडवल नाही. ना कोणती यंत्रसामग्री ना मनुष्यबळ. फक्त कचरा गोळा करणे आणि तो संपविणे एवढच काम व तेही निसर्गातील प्राण्यांकडूनच. कचऱ्याचे हे उत्तम व्यवस्थापन पाहून तिला तिच्या दादाचा अभिमान वाटत होता.

जुई अगदी मनापासून स्वतःला, समाजातील प्रत्येकाला बजावत होती-

“प्रत्येकाने असे डोके लढवून नवनवीन प्रयोग केले तर पर्यावरण आपणच वाचवू शकतो.”

अशा आपल्या शेजारीपाजारी, जागोजागी भेटणाऱ्या पर्यावरण प्रेमींपासून प्रेरणा घेऊन आपणही कामाला सुरुवात करू या.

“कचरा कमी करू या” 

              -सुनिता वांजळे 

[email protected]

सुनिता वांजळे यांची रक्षाबंधनानिमित्त एक सुंदर कथा

देवाला आवडणारे काम