"इथून शनिवारवाड्याला जायचे असेल तर कसे जावे लागेल?"

"आधी हा बोर्ड वाचा."

"एकदा पत्ता सांगायचे - दहा रुपये. दुसऱ्यांदा समजून सांगायचे - वीस रुपये. नंतरच्या प्रत्येक प्रश्नाला - २५ रुपये."

पुणेरी पाट्या या नावाखाली कुठेतरी ऐकलेला हा एक प्रसिद्ध विनोद! पण बारकाईने विचार केला, तर या पुणेरी पाटीत विनोदी किंवा वावगे वाटावे असे काहीच नाही. 

या प्रसंगामध्ये, प्रश्न विचारणाऱ्याला शनिवारवाडा कुठे आहे याची "माहिती" नाही, पण पाटी लावणाऱ्याकडे ती "माहिती" आहे. त्याच्याकडे असलेल्या माहितीचे मोल ओळखून. माहितीचे "भांडवल" करून तो पैसे कमवायचा प्रयत्न करत आहे इतकेच.

जर त्याने सांगितलेली माहिती चुकीची निघाली, अद्ययावत नसली तर हळूहळू त्याचा धंदा बसेल. जर त्याला त्या पाटीवर लिहिल्याप्रमाणे धंदा करून पैसे कमवायचे असतील, तर त्याला आजूबाजूला असलेल्या इमारतींची व दुकानांची, शाळांची, कार्यालयांची माहिती, तिथे जायला लागणारा वेळ, तिथे जायचा जवळचा रस्ता, तिथे गेल्यावर प्रश्न विचारणाऱ्या माणसाचे काम होईल का नाही, याचा साधारण अंदाज सांगणे, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. नव्याने होणाऱ्या बांधकामाची माहिती ठेवावी लागेल. पण तो असे काहीच करत नाही. 

दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी त्याने ती पाटी काढून टाकली. कारण कित्येक महिने त्याला कुणी पत्ता विचारायलाच आलेच नाही. पाटीवरती साठणारी धूळ आपल्या बाकीच्या धंद्यासाठी चांगले लक्षण नाही, असा विचार करून त्याने ती पाटी काढून टाकली. खरे तर ज्या वेगाने पुणे वाढत आहे, नवीन लोकं पुण्यात येत आहेत, ते बघता, पत्ता सांगायच्या धंद्याने दिवसेंदिवस जोम धरायला पाहिजे होता. पण हे तर उलटेच झाले! 

याला जबाबदार आहे माहिती तंत्रज्ञान, म्हणजेच आयटी, सगळ्यांच्या उत्सुकतेचा व विशेषतः करियरच्या क्षेत्रात सध्या परवलीचा बनलेला शब्द. अनेकांच्या दृष्टीने आयटी म्हणजे अल्लाउद्दीनचा दिवा! काही करून आयटी कंपनीमध्ये नोकरी मिळवायची आणि हा दिवा ताब्यात घ्यायचा असे अनेकांचे कधी छुपे तर कधी जगजाहीर केलेले स्वप्न असते. एकदा का हा दिवा ताब्यात आला की मग काय टू, थ्री बीएचके, बंगला, कार, नोकर - चाकर, अमेरिका सगळे काही अगदी चुटकीसरशी मिळेल असे अनेकांना वाटते,

पण खरेच माहिती तंत्रज्ञान आणि आपला संबंध फक्त आयटी तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरी एवढाच आहे का? किंवा कुणालातरी आपल्या तोंडावर "सध्या माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, बर का, तुम्हाला काही कल्पना आहे का नाही?" असे वाक्य फेकून आपल्या सामान्य ज्ञानाची खिल्ली उडवण्यासाठी आहे का? तसे असेल तर आयटी कंपनीतल्या नोकरीचा आणि त्या पुणेरी पाटीवर धूळ साठण्याचा काय संबंध असेल?

होय, त्या पुणेरी पाटीचा सुवर्णकाळ संपवून त्या पाटीला धूळ चाटायला लावण्यामागे माहिती तंत्रज्ञानाची प्रगती व त्यातून जन्माला आलेले गुगल मॅप कारणीभूत आहे. गुगल मॅप तुम्हाला फक्त पत्ता सांगत नाही, तर तुम्ही ज्या ठिकाणी चालला आहेत, तिथे पार्किंग आहे का, जाताना ट्राफिक किती लागेल, तुम्ही जिथे चालला आहात, तेथील कामाची वेळ काय आहे, या सगळ्याची माहिती देते. तेही फुकटात! एवढी सगळी माहिती आपल्या बोटांच्या नुसत्या इशाऱ्यावर मिळत असेल व तेही अत्यंत विनम्रपणे, तर त्या पाटीवाल्या पुणेकराचे महत्त्व संपणार आहे, हे निर्विवाद सत्य आहे.

अत्यंत स्वस्तात मिळू लागलेले वेगवान इंटरनेट, त्यातला त्यात स्वस्त झालेले स्मार्टफोन व सामान्य माणसाला सहज वापरता यावीत म्हणून स्थानिक भाषेत तयार होत असलेली गुगल मॅपसारखी अत्यंत इंटरऍक्टिव्ह अँप हे सगळे माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त नोकरी मिळवण्यासाठी नसून, दैनंदिन जीवनातील छोटी छोटी कामे सोपी करण्यासाठी सुद्धा आहे हे सिद्ध करत आहेत.

तुम्हाला मान्य असो वा नसो पण माहिती तंत्रज्ञान हे आता तुमच्या रोजच्या आयुष्यात तुमच्यासोबत तुमच्या सावलीसारखे आहे, हे सत्य आहे. अगदी आधार कार्डपासून ते तुमच्या बँकेतील व्यवहार, तुमचा गाडीचे रजिस्ट्रेशन, रेशन कार्ड, तुमचा जन्म आणि हो तुमच्या मृत्य्रुची नोंदणीसुद्धा आता माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने होत आहे. एवढेच काय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दर क्षणाला तुम्हाला साथ देणाऱ्या सोशल मिडीयाचा पूर्ण डोलारादेखील माहिती तंत्रज्ञानावर उभा राहिला आहे.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या मदतीला उभे असलेल्या माहिती तंत्रज्ञानाची ओळख करून घेऊन, या तंत्रज्ञानाचा आपल्या रोजच्या जगण्यात पुरेपूर वापर कसा करायचा? माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने बिन महत्त्वाची कामे करण्यात जात असलेला आपला वेळ वाचवून तोच वेळ माणूस म्हणून निसर्गाने आपल्या दिलेल्या इतर क्षमता पूर्णपणे वापरता याव्यात म्हणून कसा सत्कारणी लावायचा, हे आपण "माहिती तंत्रज्ञान व आपण" या नवीन सदरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

 

-चेतन एरंडे

[email protected]

माहितीच्या जगात नक्कीच एक जबाबदार नागरिक म्हणून आपले स्थान निर्माण करण्यासाठी वाचा चेतन एरंडे यांचा लेख.   

                  
माहिती तंत्रज्ञान - माहितीच्या जगात जबाबदार नागरिक होण्यासाठी - भाग २