"कल्हईवाला कल्हई.....कल्हईवाला कल्हई...." एक खास लयीतला  मोठ्ठा आणि त्यापाठोपाठ एक लहानसा, किनरा अपरिचित आवाज सलग दोन-तीन वेळा कानावर पडला. तसे बाळू, शमी धावतच खिडकीजवळ गेले. कुणी बरं आरोळी दिली म्हणून खिडकीतून डोकावून ते खाली वाकून वाकून पाहू लागले. पण छे...! वाटेवर तर कुणीच दिसेना. थोड्याच वेळात पुन्हा एकदा तोच आवाज कानावर पडला. मग आवाजाच्या दिशेने अधीर होऊन बाळू, शमीने नजर टाकली. डोक्यावर रूमाल बांधलेला एक माणूस आणि त्याच्यासोबत बारीकशी अंगकाठी असलेला एक लहान मुलगा दिसला त्यांना. नेमकी त्याच वेळी बाळू, शमीची आईसुद्धा खिडकीत आली. तिनेही कल्हईवाल्याचा आवाज स्वयंपाक खोलीतून ऐकला होताच. खिडकीत येताच तिनेच आता मोठ्याने त्या कल्हईवाल्याला आवाज दिला. "ए कल्हईवाल्या ...इकडे, इकडे ...वर बघ." कल्हईवाल्याने त्यांच्या खिडकीकडे वर नजर टाकली. आई लगेच म्हणाली, "वरती ये, गेटवर वाॅचमनला सांग. फ्लॅट नंबर ५० मध्ये बोलवलंय म्हणून." 

"आलो आलो ...." एवढं बोलून तो कल्हईवाला आपल्या  मुलासोबत बिल्डिंगच्या गेटमधून आत शिरला. वाॅचमनकडे गेला.

शमी लगेच आईला म्हणाली,  "आई, कशाला गं बोलवलंस त्या  कल्हईवाल्याला?" 

"अगं शमू, आपली जुनी पिढीजात तांब्यापितळीची खूपशी भांडी धूळ खात पडून आहेत घरात. त्यांची सगळी कल्हई गेलीय आतून. अगं, वापरात नसल्याने पडून पडून कळकटलीत सारी भांडी. आता कल्हईवाला आलाच आहे तर त्या भांड्यांना आतून कल्हई लावून घेते. मग बघ कशी ती सारी भांडी लखलखीत होतील. मग स्वयंपाक- पाण्यालाही घरात ती वापरता येतील. खरं तर,  किती दिवसांपासून या भांड्यांना कल्हई लावून घ्यायचं डोक्यात होतं. पण हल्ली कल्हईवालेच इकडे येत नाहीत. पण आज कसा देवासारखाच हा कल्हईवाला आलाय बघ.  बाळू म्हणाला, "अगं आई , पण आता तर सगळीकडे स्टेनलेस स्टीलचीच भांडी वापरतात. सध्या कोणीच वापरत नाहीत तांब्या पितळीची भांडी. "

आई म्हणाली,  "अरे हो, त्यामुळेच तर हे कल्हईवाले हल्ली दिसत नाहीत फारसे. आणि तुला माहिती आहे का बाळू, तांब्याच्या भांड्यात आंबट किंवा आम्लधर्मी पदार्थ बनविले की, त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न बिघडण्याची शक्यता अधिक असते. कधी कधी अन्नाची चव बिघडते. कधी अन्नपदार्थांचा रंग बदलतो. तर कधी त्या अन्नपदार्थांतून विषबाधा होण्याचा धोकाही संभवतो बरं. हे सारं घडू नये म्हणून तर तांब्या पितळेच्या भांड्यांना आतून कल्हई लावून घेतली जाते. बरं चला, बोलत काय बसलोय आपण. पटकन आत चला. ती भांडी तेवढी काढून द्यायला  मला मदत करा. तो कल्हईवाला येईलच एवढयात."

बाळू, शमी आईसोबत आतल्या स्वयंपाक खोलीत गेले. एक एक करून सारी भांडी काढली. केवढी मोठमोठी ही भांडी .... शमी तर सारी भांडी पाहून म्हणाली, "बाप रे...! आई, केवढी गं ही भांडी. जादूच्या पोतडीतून काढावी तशी  कुठून कुठून शोधून काढलीस तू. मला तर इतक्या दिवसातून कधीच दिसली नाहीत घरात."

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. "आला वाटतं कल्हईवाला...", शमी पुटपुटली.

बाळूने दार उघडलं तर कल्हईवालाच दारात उभा. बाळूचं लक्ष त्यांच्यासोबत असलेल्या मुलाकडं गेलं. मळकट शर्ट आणि चड्डी घातलेला. जवळपास बाळूच्याच वयाचा, उंचीने काहीसा बुटका, तरतरीत नाकाचा, बोलक्या डोळ्यांचा; पण अंगापिंडाने  बारीकसा असलेला एक मुलगा बाळूकडेच टकमक पाहत होता. तेवढ्यात आई, शमी दारात आल्या. आईने विचारले, "का रे बाबा, कुठे मांडलीय तुझी कल्हईची भट्टी?"  कल्हईवाला म्हणाला,  "इथं कोपऱ्यावरच्या केशव नाक्यावरच भट्टी मांडलीय बघा. आईचं लक्ष त्याच्यासोबत असलेल्या मुलाकडे गेलं. तिने सहज विचारलं त्या मुलाला,  "काय नाव तुझं?"

"यदुनाथ"...मुलाने उत्साहाने सांगितले. 

"शाळेत जातोस?  कोणत्या इयत्तेत शिकतोस?"...

"आठवीत आहे मी, माई. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत जातो मी.. सुट्टीच्या दिवशी आणि शाळा सुटल्यावर  बाबांच्या हाताखाली मदतीला असतो." नम्रपणे यदुनाथ बोलला. बाळूला, शमीला आणि आईलाही यदुनाथचं खूप कौतुक वाटलं. कष्ट करून शिकतोय तो. माई हा शब्द त्याच्या तोंडून ऐकताना किती छान वाटले. आणि बोलताना किती गोड हसला तो. आई म्हणाली, "पाणी, सरबत काही देऊ का?" यदुनाथचे वडील म्हणाले, "नको, नको, कशाला तुम्हाला उगीच त्रास? तुमची भांडी आणा. आपण घेऊन जाऊ या भट्टीवर. तिथं यदुनाथची आई आहेच. लगेच कल्हई करून देऊ आम्ही." आई हसून म्हणाली, "होय होय, आम्ही भांडी आणतो तोपर्यंत तुम्ही सरबत तरी घ्या. या, आत या." आईने त्यांना घरात घेतलं. बाळू, शमीने पटकन स्वंयपाकघरात जाऊन झट की पट दोन मोठे ग्लास कोकम सरबत बनवून आणले. त्या दोघांच्या हातात ते ग्लास दिले. घरात आल्यावर आईने यदुनाथकडे नीट निरखून पाहिलं तेव्हा तिच्या  लक्षात आलं की त्याच्या उजव्या खांद्यावर शर्ट खूपच फाटला आहे. शिवाय तब्बेतीनेही तो बारीक आहे. तिला वाईट वाटलं. तिला चटकन आठवलं की, मागच्या दिवाळीला बाबांनी बाळूला एक रेडिमेड नवीन शर्ट दुकानातून आणला होता. पण बाळूने तो अजूनपर्यंत वापरलाच नव्हता. तिने लगेच आतल्या कपाटातून तो शर्ट आणला. यदुनाथचा सरबत पिऊन झाल्यावर आई तो शर्ट त्याच्यासमोर धरत म्हणाली, "यदुनाथ, हा घे शर्ट तुला. आमच्या बाळूसाठी त्याच्या बाबांनी आणला होता, पण त्याने घातलाच नाही अरे. तू घाल. तुझ्या अंगावर शोभून दिसेल." यदुनाथला क्षणभर काही कळेनाच. तो दिग्मुढ झाल्यासारखा काही क्षण त्यांच्याकडे नुसता पाहतच राहिला. यदुनाथचे बाबाच मग मध्ये बोलले. "अहो, कशाला ताई,  त्याला नवीन शर्ट?"  यदुनाथला वाटलं क्षणभराची आमची ओळख. मग मी हा शर्ट कसा घेऊ?  मग तोही बोलला, " नको, नको माई. नको मला शर्ट." आई म्हणाली,  " असू दे रे, माझ्याकडून तुला ही भेट."  यदुनाथने आढेवेढे घेतले.  शेवटी यदुनाथचे बाबा म्हणाले यदुनाथला. "घे पोरा, मायेने दिलाय त्यांनी तुला. घे. नाही नको म्हणूस." यदुनाथने तो शर्ट घेतला. तो पटकन म्हणाला, "मी  उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाताना घालेन हा शर्ट."  आई गोड हसली. मग आई, बाळू आणि शमीने आतून सारी भांडी आणली. मोजली. बाळूने सर्व  भांड्यांची वहीत यादीही केली. मग आई कल्हईवाल्याला म्हणाली,  आम्हाला तुम्ही  फक्त रिक्षापर्यंत ही भांडी न्यायला मदत करा. मग आम्हीच घेऊन येऊ ती तुमच्या भट्टीपर्यंत. कोपऱ्यावरच्या  केशव नाक्याच्या बाजूच्या पटांगणातच भट्टी आहे ना तुमची? माहीत आहे आम्हाला तो नाका."

आईने दोन रिक्षा केल्या. आणि ती भांडी  कल्हईवाल्याच्या भट्टीजवळ आणली. अाईसोबत बाळू, शमीही होतेच. कल्हईवाला आणि त्याचा मुलगाही तिथे पोहोचलाच. लगेच कल्हईवाला, त्याची पत्नी आणि मुलगा कल्हईच्या कामाला बिलगले. जमिनीत छोटा खड्डा करून त्यात तयार केलेली भट्टी आता खासच लालबुंद झाली होती. कल्हईवाल्याने त्या विस्तवावर आधी आतल्या बाजूने भांडे तापवले. मग पांढऱ्या रंगाची नवसागराची म्हणजेच अमोनियम क्लोराइडची भुकटी वापरुन ते भांडे त्याने आतल्या बाजूने घासून पुसून आधी स्वच्छ केले. मग ते भांडे गार होण्यापूर्वीच त्याने कथील धातूचा तुकडा त्या भांड्यात टाकला. तो धातू पटकन त्या गरम भांड्यात वितळला. कल्हईवाल्याने तो वितळलेला धातू मग भांड्यात सर्वत्र चांगला पसरवून त्याचा लेप आतून दिला. आणि लगेच ते भांडे त्याने थंड पाण्यात बुडवले. चर्र आवाज झाला. आता भांडे आतून चांगलेच लखलखीत, चकचकीत झाले होते. बाळू, शमी हे पाहून हरखलेच. शमीला तर ही एकप्रकारची जादूच वाटली.

आईने विचार केला,  किती वेळ असं सगळ्या भांड्यांना कल्हई होईपर्यंत रस्त्यावर मुलांसोबत थांबायचं. कल्हईवाल्याने आईचा चेहरा वाचला जणू. त्याला कळले की काय तो लगेच म्हणाला, "ताई, तुम्ही घरी जा हवं तर. मी आणि माझा मुलगा तुमच्या सगळ्या भाड्यांना कल्हई करून ती भांडी घेऊन  येऊ दोन - तीन तासात तुमच्या घरी. काळजी नसावी." यदुनाथही म्हणाला, "माई,  खरंच नका थांबू उन्हात. शिवाय भट्टीचीही उष्णता खूप आहे. जा  तुम्ही खुशाल घरी. आम्ही येतो घरी सारी भांडी घेऊन." आईची काहीशी द्विधा मनस्थिती झाली. मग तिने मनाशी ठरवलं. दोन तीन तासाचाच प्रश्न. ठेवू या विश्वास. जाऊ या आपण घरी. ती म्हणाली,  "हो, या घरी. वाट पाहते मी. मग कामाचे पैसेही तिथेच देते. चालेल ना?" कल्हईवाल्याने  होकारार्थी मान हलवली. आई मुलांना घेऊन रिक्षात बसून घरी निघून गेली.

घरी येऊन आता त्यांना तीन तास झाले होते.... चार.....पाच तास.. घड्याळ पुढे पळतच होते.  पण कल्हईवाला, त्याचा मुलगा त्यांची भांडी घेऊन घरी काही आलेच नाहीत. आईची चलबिचल वाढली. आपली भांडी त्यांनी लंपास केली की काय? नको नको ते विचार डोक्यात आले. मग  ती एकटीच तडक घराबाहेर पडली. रिक्षात बसून कल्हईवाल्याच्या भट्टीजवळ पोहचली. पण तिथे ना भट्टी, ना कल्हईवाला, ना त्याची पत्नी, ना त्याचा मुलगा यदुनाथ. आई रडकुंडीला आली. आता कुठे शोधू त्यांना. ना त्यांचा ठावठिकाणा माहीत. गेली अापली भांडी सारी. आता बाळूचे बाबाही ओरडतील आपल्याला. आपण कसा काय मूर्खासारखा विश्वास ठेवला त्यांच्यावर. तिला काहीच सुचेना. आजूबाजूला चौकशी केली. पण काहीच कळेना. शेवटी निराश होऊन ती घराकडे परतली. संध्याकाळ खूपच वाईट गेली. कसा तरी स्वयंपाक केला. बाबा घरी आले. सगळं त्यांच्या कानावर गेलं. 'असू दे, जाऊ दे. यापुढे लक्षात ठेव. यातून धडा घे. उद्या पोलिसात वर्दी देऊ." असंच  म्हणून त्यांनी या विषयावर पडदा टाकला. आईला मात्र रात्रभर नीट झोप लागलीच नाही. 

दुसऱ्या दिवशी सकाळीच दाराची बेल वाजली. आईला वाटलं दूधवाला असेल. दार उघडलं तर दारात तोच कल्हईवाला आणि हसरा यदुनाथ. आणि त्यांच्या हातात, पायाशी सगळी आतून बाहेरुन  लखलखणारी त्यांची भांडी. "तुम्ही...?" आईच्या तोंडून हा एकच शब्द बाहेर पडला. बाळू, शमी आणि बाबाही दारात आले.  आईच्या डोळ्यांत तर अश्रूच उभे राहिले. यदुनाथ म्हणाला,  "काल आम्हाला पोलिसांनी पकडून चौकीत नेले.  रस्त्यात भट्टी का पेटवली? कुणाची परवानगी घेतली? धूर झाला सगळीकडे. तक्रार आलीय म्हणाले. खूप वेळ बसवून ठेवलं आम्हाला. बाबांनी गयावया केली. पोलिसांना दया आली. मग त्यांनीच  आम्हाला एक नवी जागा सांगितली. लांब आहे ती. पण मोकळी आहे. वस्ती, रहदारी नाही तिथं जवळपास. मग आम्ही तिथं गेलो. भट्टी पेटवली. तुमच्या सगळ्या भांड्यांना कल्हई होईपर्यंत रात्र झाली. मग आई म्हणाली, 'आता सकाळीच जा तुमच्याकडे. आतून ही भांडी आता लखलखीत झालीय. मी सकाळी लवकर उठून बाहेरून घासून काढते ही सारी भांडी. मग ती आतून बाहेरून लखलखीत दिसतील.' बाबांना आईचं बोलणं पटलं. म्हणून मग आज आम्ही सकाळी आलो. "

कल्हईवाला म्हणाला, "ताई  आम्ही काल आलो नाही. म्हणून रागवू नका. काल लय बाका प्रसंग आला होता आमच्यावर. आमचा नाईलाज झाला हो. तुमची भांडी गेली असं तुम्हांला वाटणं साहजिकच आहे. पण ताई,  जिथं कष्टाचंच पुरत नाही तिथं हरामाचं कसं पुरेल आयुष्याला. कष्टाची अर्धी भाकरीच आमच्यासाठी गोड आहे. लांडीलबाडी करून मग देवाला तोंड कसं दाखवू वरती गेल्यावर. " 

आईलाच काय पण  बाबांनाही कल्हईवाल्याच्या आणि यदुनाथच्या लखलखीत, नितळ आणि नितांत सुंदर अंतर्मनाचं दर्शन सक्काळी सक्काळीच घडलं. देवच पावला जणू. 

 

-एकनाथ आव्हाड

[email protected]