१९६५चे हिंदुस्थान-पाक युद्ध. हिंदुस्थानी सेना लाहोरपासून दोन किलोमीटर अंतरावरील बर्की या पाकिस्तानी शहरापर्यंत पोहोचली. पाकिस्तानच्या बिनशर्त मागणीवरून युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या युद्धकैद्यांची मोजदाद, देवाणघेवाण होणार हे ठरले म्हणून फिल्डमार्शल आयुब खान हिंदुस्थानी युद्धबंद्यांची यादी बघत होते. त्या यादीतील एक नाव वाचून आयुब खान ब्रिगेडियर उस्मानला म्हणाले, ‘‘मला या कैद्यांना पाहायचे आहे.’’ दोघेही कराचीच्या डिटेशन क्वार्टरमध्ये आले. हिंदुस्थानी कैद्याची माहिती घेत आयुब खान पुढे सरकत होते. त्या हिंदुस्थानी तरुण वैमानिकाजवळ आयुब खान येताच म्हणाले, ‘‘क्यू बरखुर्दार खुश और सलामत तो हो!’’

फिल्डमार्शल आयुब खान व ब्रिगेडियर उस्मान परत आपल्या कार्यालयात येताच आयुब खान यांनी फर्मान सोडले. एक पाकिस्तानी वायुदलाचे विमान मुक्रर करा. मला त्या हिंदुस्थानी युद्धकैद्याला दिल्लीला सुखरूप पाठवायचे आहे. त्याप्रमाणे त्या पाकिस्तानी सेबरजेटमधून त्या तरुण आकाशयोद्ध्याला लष्करी इतमामाने सोडून देण्यात आले.

न राहून अचंबित झालेल्या ब्रिगेडियर उस्मानने आयुब खान यांना विचारले, ‘‘खाविंद, वह तो एक हिंदुस्थानी काफर था! आपने उसे बाईज्जत छोड दिया, इसका राज?’’ 

फिल्डमार्शल आयुब खान तत्काळ म्हणाले, ‘‘उस्मान, वह लडका जिसे मैने उसके बचपन में कंधे पे लिया था, वो मेरे उस्ताद का फर्जंद था। उसे जिंदा छोड कर मैने मेरी ‘गुरुदक्षिणा’ की रस्म अदा की! आखिर हम भी उस माटीकेही बने है, यह हमारे संस्कार है! अब तो जंग भी खत्म हो गई!’’ पाकिस्तानी शिकंज्यातून सुखरूप सुटलेला तो हिंदुस्थानी अधिकारी होता, फिल्ड मार्शल करिअप्पा यांचा पुत्र फ्लाईट लेफ्टनंट नंदा करिअप्पा. यालाच म्हणतात संस्काराचे पालन. शेवटी सैनिक हा सुद्धा माणूसच असतो हे बाकी खरे!

-कॅप्ट. विनायक अभ्यंकर

[email protected]

 INS दादागिरी