द इगल हॅज लँडेड!

दिंनाक: 26 Oct 2018 15:25:59


मित्रांनो, मागील लेखामध्ये आपण एका ऐतिहासिक क्षणापर्यंत येऊन पोहोचलो आणि तो क्षण म्हणजे अर्थातच मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले तो क्षण! आता या लेखात आपण अपोलो ११ या मोहिमेबद्दल सखोल माहिती घेऊ.

द इगल हॅज लँडेड! इगल या स्पेस कॅप्सूलमधून पृथ्वीवर आवाज आला आणि सर्व पृथ्वीवर जणूकाही आनंदोत्सवच सुरू झाला. त्याला कारणच तसं होतं. मानवांना घेऊन पहिलं यान चंद्रावर दिमाखात उभं होतं. मानवाने नुसतं अवकाशात नाही तर परकीय गोलावर सुद्धा आपले पाऊल दिमाखात रोवले होते!

दिवस होता १६ जुलै १९६९, अमेरिकेच्या केनेडी अंतराळ बेसवरून सॅटर्न ५ या विशालकाय अशा रॉकेटने उड्डाण केले, जे सार्‍या जगाने प्रत्यक्ष अथवा टेलिव्हिजनवर पाहिले. हे रॉकेट ३ अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेपावले होते. ते तीन अंतराळवीर म्हणजे मायकेल कोलिन्स, बझ ऑल्ड्रीन आणि तिसरा नील आर्मस्ट्रॉन्ग. अत्यंत वेगाने आणि प्रचंड आवाज करीत हे यान अवकाशात झेपावले. अमेरिकेने चंद्रावर पाठवण्यात येणार्‍या मोहिमांपैकी हे पाचवे मानवासहित मिशन होते.

यांचे तीन मुख्य भाग होते. एक म्हणजे कमांड मोड्यूल, सर्विस मोड्यूल आणि लुनार मोड्यूल. यापैकी लुनार मोड्यूलमध्ये दोन भाग होते, एक म्हणजे चंद्रावर उतरणारी स्टेज आणि दुसरी चंद्रावरून अंतराळवीरांना घेऊन वर उडणारी स्टेज. कमांड मोड्यूल हे चंद्राच्या अवकाशातच राहणार होते आणि मायकेल हा त्यात बसून ते चालवणार होता. कमांड मोड्यूल ही एकमेव स्टेज पृथ्वीवर परतणार होती. ठरल्याप्रमाणे रॉकेट पृथ्वीवरून उडाले. त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेमधून बाहेर गेल्यावर रॉकेटची स्टेज ही जाळून पृथ्वीवर आली आणि लुनार आणि कमांड मोड्यूल पुढील प्रवासाला निघाले. साधारण तीन दिवसांचा प्रवास करून हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचले आणि नंतर फार जोखमीची वेळ आली.

चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यावर लुनार मोड्यूल हे नील आणि बझ यांना घेऊन कमांड मोड्यूलपासून वेगळे होणार होते. त्याप्रमाणे ते वेगळे झाले आणि त्यानंतर लुनार मोड्यूलची धुरा ही त्या यानाच्या स्वयंचलित प्रणालीकडे आली. परंतु उतरण्याच्याच वेळी अचानक ती प्रणाली गडबडू लागली आणि विचित्र सिग्नल देऊ लागली. त्याचप्रमाणे इंधन संपत आल्याची सुद्धा सूचना देऊ लागली. त्याचबरोबर नील आणि पृथ्वीवरील मोहिमेचे संयोजक यांची बातचीत झाली आणि नीलने त्या यानाची सूत्रे स्वतः कडे घेतली. ते यान, तसेच चालवायला सुरुवात केली. भरपूर मेहनत आणि आपला सर्व अनुभव पणाला लावून एकदाचे ते यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले.

यान चंद्राच्या पृष्ठभागावर जरी सुखरूप उतरले असले तरीसुद्धा हे अंतराळवीर काही लगेच उतरून बाहेर आले नाहीत. कारण त्या वेळी तंत्रज्ञान फार पुढारलेले नसल्याने चंद्राविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे पृष्ठभाग कसा असेल, त्यावर उतरणे उचित आहे का? वाळू असेल की माती, त्यावर पाय ठेवला तर आपण गाडले तर नाही ना जाणार, असे असंख्य प्रश्न या अंतराळवीरांच्या डोक्यात होते. असे करता करता शेवटी तब्बल सहा तासांनी नील याच्या बाहेर पडला आणि खाली आला आणि पहिल्या मानवाने आपले पाऊल चंद्रावर रोवले आणि त्याने पृथ्वीवर संदेश पाठवला की मानवाची मानवतेसाठीची सर्वांत मोठी झेप!!!

नील उतरल्यानंतर सुमारे २० मिनिटांनी बझसुद्धा बाहेर आला आणि त्यानेसुद्धा चंद्रावर पाऊल ठेवले. त्यांनी तिथे सुमारे २ तास घालवले. त्यामध्ये त्यांनी तिथे सुमारे २१ किलोचे दगड जमा केले, तसेच एक अमेरिकेचा झेंडा लावला आणि इतरही काही प्रयोग जसे की चंद्र-पृथ्वीचे अंतर अचूक मोजण्यासाठी एक लेझर लावले. त्यानंतर मग या लुनार मोड्यूलच्या उड्डाण करणार्‍या स्टेजमध्ये दोघे बसले आणि त्यांनी आपल्या कमांड मोड्यूलच्या दिशेने उड्डाण केले. त्यानंतर त्यांनी आपले लुनार मोड्यूल चंद्राच्या अवकाशातच कमांड मोड्यूलला जोडले आणि नंतर ते तिघेही त्या कमांड मोड्यूलमध्ये बसून पृथ्वीकडे झेपावले. सुमारे ८ दिवस अवकाशात आणि २ तास चंद्रावर राहिल्यानंतर हे तिघेही यानासह २४ जुलैला पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले. यानंतर अमेरिकेसह सर्व जगातच हे हिरो म्हणूनच गणले जाऊ लागले आणि अमेरिकेने घोषणा केल्याप्रमाणे आपले ध्येय गाठून दाखवले आणि अवकाश स्पर्धा मोलाचा टप्पा गाठून जणू इतर देशांसाठी संपवूनच टाकली. चला तर दोस्तहो, या रोमहर्षक प्रवासानंतर पुढील भागात भेटूयात अशाच एका रोमांचकारी मोहिमेची माहिती घेऊन, तोपर्यंत या मोहिमेच्या चित्रफिती आणि छायाचित्र पाहायला विसरू नका!

-अक्षय भिडे

[email protected]

 

चंद्रावर स्वारी आधी ...!