द स्कुल बॅग

दिंनाक: 24 Oct 2018 14:49:14


जगभरात घडणारा दहशतवाद असो की सध्या सिरीयात सुरू असलेलं युद्ध आणि रक्तपात असो हे सगळं पाहिलं की आपला जीव हळहळतो हे सगळं संपावं म्हणून नकळत आपले हात प्रार्थनेसाठी जोडले जातात हे सहन करणाऱ्या लोकांसाठी नकळत आपले डोळे पाणावतात. नव्वदीच्या दशकापासून दहशतवाद हा तर संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

आज दहशतवाद या विषयावर भाष्य करण्याचं कारण आहे एक शॉर्टफिल्म 'द स्कुल बॅग'. कथा घडते पाकिस्तानमध्ये पेशावर या शहरात. फारूक हा शाळेत जाणारा मुलगा. फारूक इतर चार मुलांसारखाच आहे.. शाळेत मस्ती करणारा, खोडकर. त्याच्यासाठी त्याची आई मैत्रीण आहे. जिच्याजवळ तो मनातलं बोलू शकतो, तिच्याजवळ हट्ट करू शकतो. फारुकची आईही आहे इतर चार आईंसारखीच. आपल्या मुलाची काळजी करणारी, प्रसंगी त्याला दटावणारी, फारुकचे बालहट्ट पुरवणारी, त्याच्या आवडीची शेवयाची खीर बनवणारी.

वाढदिवसासाठी 'मला नवीन स्कुल बॅग हवी' असा हट्ट फारुक आपल्या आईजवळ धरतो. आपल्या लेकाला कसं खूश करायचं हे कोणत्याही आईला उपजत माहीत असतच तसंच फारुकची आई फारुकचा हट्ट कसा पुरवायचा याचा विचार करतेय. फारूक आणि त्याची आई या दोघांच्या संभाषणात फारुकच्या वडिलांचा उल्लेख होतो, त्यावरून समजतं की त्याचे वडील पाकिस्तान सैन्यदलात काम करतात. ते कधीकधी सुट्टी काढून आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी येतात. हे सगळं पाहताना, वाचताना वाटतंय की नेहमीचीच तर कथा आहे की... यात काय विशेष? आणि याचा दहशतवादाशी काय संबंध? तर..आत्तापर्यंत वर्णन केलेली कथा खरंच नेहमीचीच आहे..कथा वळण घेते शेवटच्या 3 मिनिटांत.. ते धक्कादायक वळण काय? शॉर्टफिल्मला 'द स्कुल बॅग' असं नाव देण्यामागचं प्रयोजन काय? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ही शॉर्टफिल्म पाहाच.

15 मिनिटांची ही शॉर्टफिल्म पाकिस्तानमध्ये 16 डिसेंम्बर 2014 साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.2017 साली आलेली ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केलीय धीरज जिंदाल यांनी तर मूळ कथा अशुल अग्रवाल यांची आहे. कथेला साजेसं संगीत दिलंय युसूफ हुसेन यांनी. कथेची उत्तम बैठक, कलाकारांचा अप्रतिम अभिनय आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे ही शॉर्टफिल्म अवघ्या एक वर्षात 1.1 मिलियन लोकांनी पाहिली आणि तितकीच लोकप्रियही झाली. 

फारूक या छोट्या मुलाची भूमिका निभावलीय सरताज या बालकलाकाराने. "आज हमने खूब गेम्स खेले, केक खाया" हे सांगताना फारुकचे चमकणारे डोळे, उद्या वाढदिवसादिवशी वडील आपल्याला 'तातारा पार्क' मध्ये फिरायला घेऊन जाणार आहेत हे समजल्यावर फारुकचा चेहऱ्यावर आपसूक दिसणारा आनंद आणि "मला नवीन दप्तर (स्कुल बॅग) हवी नाहीतर मी उद्या शाळेत जाणार नाही" असं म्हणून गाल फुगवून बसणारा फारूक हे सारं सरताजने पडद्यावर खूप छान साकारलं आहे. फारुकच्या आईची भूमिका केलीय रसिका दुगल या गुणी अभिनेत्रीने  अज्ञात , क्षय,मंटो अशा फिचर फिल्म्स मध्ये झळकलेल्या आणि बऱ्याच वेबसिरीज आणि शॉर्टफिल्म्स मध्ये काम केलेल्या रसिकाने ही भूमिकाही ताकदीने प्रेक्षकांसमोर मांडली आहे, मुलाचा हट्ट पाहून गालातल्या गालात हसणारी, त्याच्या आवडीची शेवयाची खीर बनवताना आज आपला मुलगा शाळेत किती खुश असेल याबद्दल कल्पना करणाऱ्या आईची वास्तल्यमूर्ती रसिकाने अक्षरशः डोळ्यासमोर उभी केलीय. शेवटच्या काही मिनिटांत जेव्हा कथा अचानक वेडीवाकडी वळणं घेते तेव्हा अंगाचा थरकाप उडालेली, शून्य, बधिर आणि असहायय आईच्या भूमिकेत रसिका एवढी शिरली आहे की अगदी आपल्या डोळ्यासमोर घडतंय सारं असं वाटावं.

मिनीटभरासाठी भारत-पाकिस्तान संबंध विसरून ही शॉर्टफिल्म पाहिली तर फिल्मच्या शेवटी येणारी वेदना अधिक खोल रुतत जाते. कारण शेवटी आई मुलाचं नातं , आईची आपल्या अपत्याबद्दल असणारी माया भारत असो, पाकिस्तान असो सगळीकडे सारखीच. 

शॉर्टफिल्मच्या शेवटी "आज आपण आपल्या मुलाला नवीन स्कुल बॅग घेऊन दिली नसती तर? तर कदाचित...." हा फारुकच्या आईच्या डोळ्यात दिसणारा प्रश्न प्रेक्षकांनाही छळत राहतो आणि पर्यायाने ही शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या मनाला सुन्न करून टाकते.

'The school bag' ही शॉर्टफिल्म तुम्ही खालील लिंकवर क्लीक करून पाहू शकता

 

https://youtu.be/2oZOOKFTKpE

सौजन्य - युट्यूब

-भाग्यश्री भोसेकर

bhagyashreebhos[email protected]

 

कोणाची खोटी शपथ घ्यायची नाही यापेक्षा मुळात खोटं बोलूच नये असा सुंदर संदेश देणारी शॉर्टफिल्म आईशप्पथ

आईशप्पथ