'स्नेहलताई, काय सांगू तुला .....'

थोडीशी गोंधळलेली शमिका बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण शब्दच फुटत नव्हते. ताईनं तिला पाणी दिलं, नीट बसवलं. सगळेजण त्यांच्या भोवती जमले. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. 

थोडी शांत झाल्यावर शमिका सांगू लागली.... "ताई, आज फार विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं. मी घरी येत असताना, माझ्या बाजूनं एक ॲक्टिव्हा पास झाली. दोन मुली बसल्या होत्या त्या स्कूटरवर. अचानक मागून एक कार आली आणि तिनं त्या स्कूटरला मागून धडक दिली. दोघी बिचाऱ्या खाली पडल्या. पण तो कारवाला न थांबताच निघून गेला. मागे बसलेली मुलगी गेलेल्या कारकडे पाहातच राहिली. आजूबाजूचे लोक जमा झाले. पण काय सांगू ताई तुला, त्यांना मदत करायचं राहिलं बाजूला, काही जण चक्क मोबाईलवर शूट करू लागले. गर्दीतल्या एकाने तर त्या मागे बसलेल्या मुलीचा मोबाईलच लंपास केला आणि तो पळाला. कोणीच पुढे येईना. मग मी आणि सारिका पुढे झालो. त्या दोघींना बसतं केलं. पाणी प्यायला दिलं. नशिबाने त्यांना फक्त थोडं खरचटलं होतं. तशा त्या ठीक वाटत होत्या. त्यांना कुठे जायचंय ते आम्ही विचारलं, तर म्हणाल्या गुगलवर पत्ता शोधत येत होतो. जवळपास पोहोचलो होतो आणि हे झालं. त्यांची स्कूटर बाजूला घेऊन आम्ही त्यांना हवा तो पत्ता सांगितला."

 "बाप रे.... असं कसं झालं ताई ..." छोटी नेहा घाबरून ताईला बिलगली. 

"पण खरी गंमत तर पुढेच आहे ताई ..." शमिका सांगू लागली. .... "त्या दोघी बहिणीच होत्या. दोघीही धीटच होत्या म्हणायच्या. झाल्या प्रसंगानं अजिबात गोंधळून न जाता, दोघींपैकी मागे बसलेल्या मुलीनं, ताईच्या पर्समधला मोबाईल काढला आणि चक्क पोलिसांना काॅल करून त्या कारचा नंबर सांगितला आणि पुन्हा कुठेतरी काॅल करून मोबाईल चोरीला गेल्याचं पण सांगितलं. मला तर तिचं कौतुकच वाटलं. " 

"व्वा.... याला म्हणतात प्रसंगावधान. खरंच दोन्ही गोष्टी तिनं अगदी बरोब्बर केल्या...", स्नेहलताई. 

"बऱ्याच वेळेस अशा प्रसंगी गोंधळून जायला होतं. पण अशा प्रसंगांना धीटपणे सामोरं जाणं आवश्यक असतं."

"म्हणून तर मी कराटे क्लासला जाते. तिथे आम्हाला स्वसंरक्षण कसं करायचं याचेच धडे दिले जातात." शमिका.

"खरंय...." केतकीलाही स्फुरण चढलं. "स्त्रियांना अबला म्हणण्याचे दिवस गेले म्हणावं. आम्ही मुली आता दुर्गेचं रूप धारण करू शकतो, हे कळलंच पाहिजे सर्वांना..."

"हो तर.... उगाच का आपण अश्विनातलं नवरात्र साजरं करतो? ते काय नुसतं नटून थटून गरबा खेळायला?" स्नेहलताई सांगू लागली....... "आदिमाया, आदिशक्ती दुर्गेच्या रूपात, अश्विनातले पहिले दहा दिवस तिची पूजा करायची ती त्यासाठी. दुष्टांचा नाश करण्यासाठीच तिनं हे रौद्र रूप घेतलं. त्यापासून आपणही दुष्टशक्तींचा नाश करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे."

"ताई, दसऱ्याला रावण जाळण्याची प्रथा यामुळेच पडली ना..?" निखिल. 

"मी पाहिलाय दिल्लीचा दसरा, रावण दहन" निखिल सांगू लागला...." तिकडे उत्तर प्रदेशात नवरात्रीचे नऊ दिवस रामलीला रंगतात. राम आणि रावणाची कथा, त्यांच्यातील युद्ध आणि दहाव्या दिवशी रावणाचा वध करून रामानं मिळवलेला विजय, हे साजरं करण्यासाठी दसऱ्याला रावण प्रतिमेचं दहन करतात. माझ्या आजोबांनी सांगितलं मला..... दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून सुष्टांचा विजय याचंच प्रतीक म्हणूनच दसऱ्याला विजयादशमी असंही म्हणतात." 

"व्वा... तुझं मराठीही एकदम भारी आहे बुवा...." साहिलच्या कमेंटवर सगळे दिलखुलास हसले.

नेहालाही काहीतरी आठवलं.... "तिकडे कलकत्त्याला पण दुर्गापूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, तीही याच कारणासाठी. गेल्या वर्षी आम्ही कलकत्त्याच्या अात्याकडे गेलो होतो, तेव्हा पाहिला होता हा सोहळा. महिषासुराचा वध करणारी अशी देवीची मूर्ती असते. ते लोक शंख काय दमदार वाजवतात पूजेच्या वेळी. एकदम स्फुरणच चढतं तो नाद ऐकून. दसऱ्याच्या दिवशी विसर्जनाची मिरवणूकही अगदी वाजत गाजत काढली जाते. "

"गुजरातमधली धमाल तर एकदम चोक्कस....." साहील पण सांगू लागला.... "तिथे पण गरबा खेळताना मधोमध देवीचीच स्थापना करतात. त्यांचे रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, पारंपरिक गाणी आणि टिपऱ्यांचा आवाज यामुळे दांडियाची मजा काही वेगळीच असते. " 

"महाराष्ट्रात मात्र सरस्वतीच्या रूपातील देवी पूजली जाते." स्नेहलताई सांगू लागली.... "सरस्वती ही विद्येची देवता, विविध कलांची जननी मानली जाते. त्यामुळे आपल्याकडे लहान मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा, पाटीपूजन करून दसऱ्याच्या दिवशी केला जातो."

तसंच संगीतातले कलाकार आपल्या वाद्यांची पूजा करतात. इतर व्यावसायिक सुद्धा आपापल्या उपकरणांची पूजा करतात. नेहेमीच्या कामांव्यतिरिक्त नवीन कामांची सुरवात केली जाते. पूर्वीच्या काळी शस्रांची पूजा करून, विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन मोहिमेवर निघण्याची प्रथा होती. त्याला सीमोल्लंघन म्हणायचे."

"खाली दक्षिणेकडच्या राज्यांतही नवरात्रात सरस्वतीचं पूजन केलं जातं. म्हैसूरचा दसरा तर अजूनही राजेशाही थाटात साजरा केला जातो. तिथली दसऱ्याची मिरवणूक पाहण्यासारखी असते." अथर्व. 

"म्हणून तर आपल्या भारतात, विविधतेतही एकता आहे असं म्हणतात. म्हणजे सणांमागील धार्मिक हेतू एकच, पण तो साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या", केतकी म्हणाली.

"आणि आपल्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये तर सर्वजण एकमेकांच्या पद्धतीनं सगळे सण साजरे करतात आणि सर्व सणांचा आनंद लुटतात. दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा", शमिका.

"या सणांचा उद्देशच मुळी एकमेकांत मिसळणं, नेहेमीच्या कामातून थोडा विरंगुळा, थोडा बदल शोधून उर्जा मिळवणं हा आहे. त्यानिमित्तानं निरनिराळ्या प्रांतातील चालीरीती समजून घेऊन, सर्वांमधे एकोपा निर्माण झाला तर सणांचा याहून चांगला उपयोग कोणता. ...." स्नेहलताई. 

"या दसऱ्यानंतर येणारी अश्विनातली पौर्णिमा, म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. पाऊस संपत आलेला, त्यामुळे लख्ख चांदण्याची मजा अनुभवता येते. जोडीला शरद् ऋतुतल्या थंडीची हळुहळू सुरुवात. या शरदाच्या चांदण्यात, निसर्गाच्या सहवासात मित्र मैत्रिणींबरोबर मस्त रंगते ही कोजागिरी पौर्णिमा. मग काय करायची ना यंदाही कोजागिरी?" स्नेहलताईनं विचारताच सगळ्यांनी उत्साहानं होकार दिला.

-मधुवंती पेठे 

[email protected]

 

लेख ८ - सांग ना स्नेहलताई ...