गुरुदेव रवींद्रनाथांच्या आईचे नाव शारदादेवी. लहानपणीच त्यांचा देवेंद्रनाथ यांच्याशी विवाह झाला. त्या अतिशय प्रेमळ आणि कुटुंबवत्सल होत्या. त्याग आणि सेवा हाच धर्म, असे त्या मानत. पतीबद्दल त्यांच्या मनात अपार आदर आणि भक्ती होती. शारदादेवी किती भाग्यवान! त्यांची सर्व मुले अतिशय बुद्धिवान, जणू एकेक रत्नच. त्यांना १५ मुले झाली. रवींद्रनाथ १४ वे अपत्य. पंधरावे अपत्य फार जगले नाही. रवींद्रनाथ सर्वांत लहान, लाडके, आईचा जीव की प्राण. परंतु रवींद्रनाथ १३-१४ वर्षांचे असताना तापाचे निमित्त होऊन शारदादेवींचे निधन झाले. मुले पोरकी झाली. रवींद्रनाथांना हे पोरकेपण आयुष्यभर जाणवत राहिले. आईच्या मृत्युनंतर तिच्या कोमल हातांचा स्नेह्स्पर्श रवींद्रनाथांच्या स्मृतीत कायमचा ताजातवाना राहिला. ते लिहितात, ”मोठा झाल्यावर वसंत ऋतूत पहाटे फुलणाऱ्या मोगऱ्याच्या कळ्या हातात घेऊन वेड्यासारखा फिरत असे, तेव्हा त्या कोमल कळ्यांचा स्पर्श माझ्या आईच्या मऊमुलायम गोऱ्या हातासारखाच वाटे. आईचा प्रेमळ स्पर्श या शुभ्र कळ्यांमध्ये निर्मळपणे फुलत आहे, असे मी प्रत्यक्ष पाहात असे.”

रवींद्रनाथांचे वडील महर्षी देवेंद्रनाथ. त्यांचे शालेय शिक्षण राममोहन रॉय यांच्या विद्यालयात झाले. हिंदू कॉलेजमध्ये द्वितीय श्रेणीपर्यंत ते शिकले. त्यानंतर त्यांचे वडील द्वारकानाथ यांनी स्थापन केलेल्या युनियन बँकेच्या सहकारी कोषाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. त्या वेळी देवेन्द्रनाथांचे वय होते १७ वर्षे. कार-ठाकूर कंपनी आणि युनियन बँक या त्यांच्या दोन मोठ्या व्यवसायाचे प्रशिक्षण आपल्या थोरल्या मुलाला मिळावे, असा उद्देश त्यामागे होता. बरेचदा आईवडील मुलांसंबंधी एक विचार करतात पण भविष्यात मुलांचे जीवन वेगळ्याच वाटेने प्रवास करू लागते. देवेंद्रनाथ मुळात ईश्वरभक्त. धर्मपरायण आजीच्या सानिध्यात त्यांचे मन भक्तिपंथाकडे ओढ घेऊ लागले होते. तरीही वडिलांची इच्छा त्यांनी स्वीकारली. आणि वडिलांच्या आकस्मिक मृत्युनंतर त्यांच्या विशाल कारभाराकडे ते लक्ष देऊ लागले. परंतु काही कारणांमुळे युनियन बँक आणि कार-ठाकूर कंपनी हे दोन्ही व्यवसाय दिवाळखोरीत निघाले. कंपनीवर सुमारे १ कोटी रुपयांचे कर्ज होते आणि येणे रक्कम होती ७००००रु. देवेन्द्रनाथानी शिल्लक रक्कम, कौटुंबिक संपत्ती यांतून सगळे कर्ज फेडले. पण त्यामुळे द्वारकानाथांच्या काळातील ठाकूर कुटुंबाचे ऐश्वर्य लोप पावले. देवेन्द्रनाथानी घरातील नोकर कमी केले आणि जाताना त्यांना घरातील हव्या त्या वस्तू न्यायला सांगितले. किमती, पुराणकालीन वस्तू, मौल्यवान भांडी, फर्निचर इ. त्यांनी नोकरांना देऊन टाकल्या. ईश्वराचा आशीर्वाद समजून त्यांनी परिस्थितीचा स्वीकार केला आणि ईश्वरसाधना, हिमालय-भ्रमण आणि दुसऱ्याला मदत करणे ही आवडती कार्ये चालू ठेवली.

रवींद्रनाथ वडिलांबद्दल लिहितात, "परोपकार आणि धर्मप्रचार यांसाठी त्यांचे भांडार सदैव खुले असे. कितीतरी अनाथ मुलांना त्यांनी आश्रय दिला. अनेक गुणीजनांना सढळ हस्ते मदत केली. कितीतरी गरजू कुटुंबातील धनधान्याचा अभाव दूर करण्यासाठी त्यांनी अवडंबर न माजवता गुप्तपणे साहाय्य केले." म्हणूनच लोक त्यांना महर्षी म्हणू लागले. कोलकात्यापासून दूर रायपूरला जाताना देवेंद्रनाथ एका हातिम वृक्षाखाली थांबले असता तिथे त्यांना "प्राणांना आराम, मनाला आनंद आणि आत्म्याला शांती" मिळत असल्याचा आध्यात्मिक अनुभव आला. लगेच त्यांनी तिथे २० बिघा जमीन खरेदी केली आणि “शांतिनिकेतन” ही राहण्यासाठी, तप:साधनेसाठी वास्तू उभारली.

अशा या अलौकिक पित्याचा सहवास रविन्द्रनाथाना भरपूर मिळाला. पित्याबरोबर केलेल्या हिमालय-भ्रमणामुळे ते निसर्गाकडे अजूनच ओढले गेले आणि देवेन्द्रनाथांनी स्थापलेल्या “शांतिनिकेतन” या वास्तूच्या परिसरात १९०१ साली त्यांनी विद्यार्थी-केन्द्री निसर्ग-शाळा उभारली आणि नंतर तिचे जगप्रसिद्ध विश्वभारतीमध्ये रूपांतर केले.

-स्वाती दाढे

[email protected]

कवी रवींद्रनाथांच्या शिक्षणाच्या वाटचाली विषयी माहिती खालील लिंकवर 
रवींद्रनाथांचे शिक्षण