प्रकाशमय आकाशकंदील, पणती आणि पणतीस्टॅंड या वस्तू स्वतःच्या हातांनी बनवण्याचा आनंद विद्यार्थ्यांना घेता आला, तो शिक्षणविवेक आयोजित ‘तेजोमय’ या दिवाळी विशेष कार्यशाळेत. यावर्षी दिवाळीत विद्यार्थ्यांना स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या वस्तूंनी घराची सजावट करता यावी यासाठी ‘तेजोमय’ या कार्यशाळेचे आयोजन होते. दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०० ते ३.०० या वेळात ही कार्यशाळा घेण्यात आली. 

उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी सुरुवातीला मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. शिक्षणविवेक मासिकात ‘कलाकृती’ची कृती देणाऱ्या संपदा कुलकर्णी यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सर्वांनी पणतीस्टॅंड तयार केले. खराब झालेल्या सी.डी.वर नक्षी तयार करून रंगवण्यात आले. टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले हे पणतीस्टॅंड आकर्षक दिसत होते. आगपेटीच्या कड्या, पिस्त्यांची टरफले अशा घरात असलेल्या वस्तूंचा वापर करून सुंदर पणतीस्टॅंड बनवण्यात आले. प्रत्येकाने आपापली सर्जनशीलता दाखवत नाविन्यपूर्ण असे पणतीस्टॅंड बनवले. त्यानंतर प्रकाशमय आकाशकंदील तयार करण्याची कृती शिकवण्यात आली. रंगीबेरंगी कागद, सुंदर दोऱ्या अशा अनेक वस्तू पाहून सर्वांना मजा येत होती. सर्व विद्यार्थी प्रत्येक कृती अचूकतेने करण्याचा प्रयत्न करत होते. अगदी दोन दोन वेळा निरीक्षण करून संपदा ताईसारखा आपला आकाशकंदील होईल; याकडे सर्वांचे लक्ष होते. छोट्याछोट्या हातांनी बनवलेले आकाशकंदील खरोखरच सुंदर दिसत होते. ‘मी बनवलेला आकाशकंदील माझ्या घरावर लावणार’ या कल्पनेनेच सर्व विद्यार्थी सुखावत होते.

दुसरे सत्र होते ते म्हणजे पणती तयार करण्याचे. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेतील शिक्षक सुरेश वरगंटीवार यांनी मुलांना पणत्यांचे दोन प्रकार शिकवले. टेराकोटा मातीपासून बनवलेल्या पणत्या सुरेख दिसत होत्या. मातीच्या मूळच्या लाल रंगामुळे पणती आणखी उठून दिसत होती. पणती तयार केल्यावर त्या पणतीवर नक्षीकाम करण्यात आले. स्वस्तिकसारखी शुभचिन्हे रेखाटण्यात आली. नेहमी आपण चक्रावर बनवलेल्या पणत्या पाहतो पण हाताने बनवलेल्या पणत्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच पहिल्या होत्या. पणती तयार केल्यानंतर ती कशी रंगवावी, त्यावर उठावदार नक्षीकाम कसे करावे याविषयी सुरेश वरगंटीवार यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

बाजारातून आणलेल्या वस्तूंपेक्षा स्वतः बनवलेल्या वस्तूंचे महत्त्व जास्त असते, हे या कार्यशाळेत लक्षात आले. मुलांनी बनवलेल्या वस्तू कौतुकाने न्याहाळताना सर्व पालकवर्ग दिसत होता. जवळजवळ तीन तास नवनवीन वस्तू तयार करत दिवाळी विशेष कार्यशाळा संपन्न झाली.