आज चहात साखरच घालायला विसरलो. चहात साखर घालता घालता थोडीशी साखर टेबलावर सांडली आणि थोड्याच वेळात खबर लागल्याप्रमाणे तिथे एक मुंगी आली. साखर हुंगून गेली. पाठोपाठ दोन मुंग्या आल्या आणि त्यांच्या पाठोपाठ मुंग्यांची रांगच आली.

आता मी त्यांना काही बोलणार तर तीच म्हणाली, ‘‘तुम्ही काळे, पांढरे, लाल, तपकीरी, करडे किंवा भुरक्या रंगांचे घोडे पाहिले असतील किंवा वेगवगेळ्या रंगाचे, लहान मोठ्या आकाराचे, चित्रविचित्र तोंडाचे कुत्रे पण पाहिले असतील. पण आमचं तसं नाही हं. आम्हाला छप्पन शे साठ रंगच पसंत नाहीत. जगात कुठेही जा आम्ही फक्त दोनच रंगात असतो. काळा किंवा लाल.’’

खरंच त्या सगळ्या लाल मुंग्या होत्या.

ती पुढे म्हणाली, ‘‘आता आमच्यात जे काळे असतात ते कधी इतरांच्या शरीराला आपलं तोंडसुद्धा लावत नाहीत. म्हणजे काळ्या मुंग्या कुणाला चावत नाहीत. काळे.. देवाची बाळे असं त्यांना आमच्यात म्हणतात.’’

मी मान हलवत म्हंटलं, ‘‘हो..हो. आणि.. तुमचं काय..?’’

मागच्या दोन पायावर उभं राहून ती म्हणाली, ‘‘हां.. पण जे लाल असतात ते लई खतरनाक असतात. आमची कुणी खोड काढली की आम्ही मात्र टुचटुचून टुचकन चावतोच. आम्ही ज्याला चावतो तो माणूस तंगड्या झाडत डिस्को करायला लागतो. ‘लालची खोडी.. तंगड्या झाडी’ असं आम्हाला तुमच्यात म्हणतात.. हो किनई?’’

हे ऐकून मी जरा भीतभीतच विचारलं, ‘‘पण जर का तुम्हाला दातच नाहीत तर तुम्ही चावता कसे?’’

चँचँ हसत मुंगी म्हणाली, ‘‘खरं म्हणजे आम्ही तुम्हाला टोचतो किंवा फवारतो.’’

‘‘आता हे काय नवीनच?’’

‘‘अरे, आमच्या या फवारणीने पक्षांना खूप फायदा होतो.’’

तू जरा नीट सांग बरं..

‘‘ओके. आमच्या शरीरावर फॉर्मीक सीडच्या ग्रंथी असतात. जेव्हा शत्रू जवळ येतो, तेव्हा आम्ही त्याच्या अंगावर फॉर्मिक सीडचा फवारा मारतो. फॉर्मिक सीडचा त्रास होऊन शत्रू जीव घेऊन पळून जातो.’’

‘‘अगं मुंगे, शत्रू जर पळून जात असेल तर त्याच्या पक्षांना फायदा कसा होईल? ते पळून जातील ना..? अगं तुझ्या या अशा बोलण्याने माझ्या मेंदूचा गुलाबजाम झालाय.’’

मुंगी मला चिडवत म्हणाली, ‘‘व्वा छान! इतकी साखर संपली की येतोच आम्ही..’’ मग हसून पुढे म्हणाली, ‘‘ऐक. पक्ष्यांच्या पिसामध्ये खरजेचे किडे होतात व त्याचा त्यांना त्रास होऊ लागतो. तेव्हा हे पक्षी पायाने आमचे वारूळ हलकेच फोडतात आणि पंख पसरून उभे राहतात. वारूळ फोडल्याने आमच्यातल्या चिडलेल्या कामकरी मुंग्या फॉर्मिक सीडचा जोरदार फवारा मारतात. त्यामुळे त्या पक्ष्यांच्या पिसांमधील किडे मरतात. तेव्हा पक्षी ‘चँक्यू.. चँक्यू’ म्हणतात, पण आमची वारूळं मोडतात ना..?’’

‘‘अगं, तू आत्ता म्हणालीस की कामकरी मुंग्या. म्हणजे? कामकरी मुंग्या, आळशी मुंग्या, झोपाळू मुंग्या असे काही तुमच्यात प्रकार आहेत की काय?’’

‘‘अरे मित्रा, आमचं राज्यंच वेगळं आहे. आमच्या राज्यात राजा-राणी आहेत..’’

मी तिला थांबवत म्हणालो, ‘‘अगं मुंगुले, आमच्या इथे पण राजा-राणी आहेत..’’

मला अडवत मुंगी म्हणाली, ‘‘आमच्या राजाला आणि राणीला कधीकधी पंख येतात. ते दोघे एकाचवेळी काहीकाळ उडतात. मग थोड्याच वेळात त्यांचे पंख गळून पडतात. असे एकाचवेळी हवेत उडणारे राजा-राणी या पृथ्वीवर फक्त आमच्यातच आहेत असं म्हणतात. म्हणूनच माणसांचे राजा-राणी लोळतात, तेव्हा मुंग्याचे राजा-राणी उडतात असं आमच्यात म्हणतात.’’

हे ऐकून तर माझी बोलतीच बंद झाली.

मान वर करून मुंगी म्हणाली, ‘‘आमच्यात राजा-राणी आणि कामकरी असे तीन मुख्य गट असतात. आमच्यातल्या कामकरी गटाला खूपंच काम करावं लागतं. राणी मुंगीने घातलेल्या अंड्यांचं संरक्षण करतात. वारूळाचं रक्षण आणि डागडुजी करतात. त्या सतत काही ना काही गोळा करून आमच्या वसाहतीकडे नेत असतात. खाद्यं बियांचं, तसंच वनस्पतींच्या भागांचे बारीकबारीक तुकडे करून साठवतात. मेलेला वा जिवंत किटक या मुंग्या शोधतात. त्यांचे बारीक तुकडे करून साठवून ठेवतात. त्यांना काम खूप असल्याने त्यांची संख्या सर्वांत जास्त असते.’’

‘‘म्हणजे किती? शंभर.. दोनशे..पाचशे..?’’

‘‘नाही. त्या काही हजारोंच्या संख्येने असतात आणि मुख्य म्हणजे आम्ही सर्व दिवस-रात्र काम करत असतो. आम्ही आमच्या आडव्या आयुष्यात कधीही झोपत नाही.’’

हे ऐकून तर मी किंचाळलोच. ‘काSSSSय तुम्ही कध्धीच झोपत नाही? थकल्यावर पेंगत नाही? पेंग येऊन तुमचे डोळे बंद होत नाहीत?’’

‘‘अरे मित्रू.. आम्ही झोपणार कसे? आणि पेंगणार कसे?’’

‘‘कसे म्हणजे.. डोळे बंद करून झोपणार. अर्धवट डोळे बंद करून पेंगणार. काSSय?’’

मुंगी अंदाजाने माझ्याकडे पाहात हसत म्हणाली, ‘‘अरे..  आम्ही सतत तुरूतुरू धावताना दिसत असलो तरी प्रत्यक्षात राणी आणि कामकरी मुंग्यांना डोळेच नसतात. त्या चक्क आंधळ्या असतात. फक्त नर मुंग्यांना डोळे असतात. ते डोळे ही संयुक्त प्रकारचे असतात, म्हणजे एकाच डोळ्यांत किमान शंभर डोळे असतात.’’

हे ऐकून तर मी सटपटलोच. आता फवारणी होण्याआधीच मागे सरकावं, असं माझ्या मनात आलं.

ती मनकवडी मुंगी म्हणाली, ‘‘आम्ही जर तुमच्याजवळ येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याभोवती खडूची एक जाड रेष ओढा. आम्ही काळे असू किंवा लाल पण आम्ही खडूची रेष कधीच ओलांडत नाही इतके आम्ही सभ्य आहोत.’’

आणि साखरेचा शेवटचा कण घेऊन ती आंधळी मुंगी डोळसपणे निघून गेली.

-राजीव तांबे

[email protected]

गप्पागप्पी माशीशी