नमस्कार, मी लहान असताना माझे बाबा म्हणजे आपल्या आजच्या भाषेत म्हणायचं तर पप्पा मला वाचण्यासाठी लहानपणी छोटी छोटी अशी खूप पुस्तकं आणायचे. मी अगदी २ री ३ रीमध्ये असताना पप्पांनी मला पुस्तक आणलं की ते स्वतः माझ्यासमोर बसायचे आणि मग जे वाचता येत नव्हतं, जे शब्द अडखळत होते ते मला समजून सांगायचे. तेव्हापासून मला थोडीफार का होईना पण वाचनाची आवड निर्माण झाली होती आणि आता सुद्धा आहे. ४ थी – ५ वीत असताना मी ‘इसापनीती’ हे छोटंस पुस्तक वाचलं होतं. त्यामध्ये सांगायचं झालं तर इसापनीती हे एक जागतिक कीर्तीचे अमर पुस्तक आहे. त्यात महान जीवनविषयक सत्य लिहिली आहेत. उदा., जीवनात कुठल्या गोष्टी शिकाव्यात, जीवनात घडलेल्या प्रसंगावरून काय धडे घ्यावेत असे अनेक जीवनविषयक सत्य लिहिली आहेत. त्यातील गोष्टी जरी पशुपक्ष्यांच्या असल्या तरी त्या माणसांच्याच आहेत आणि माणसांसाठीच सांगितलेल्या आहेत. केवळ लहान मुलांसाठी वाटत असलेल्या या गोष्टी मोठ्यांसाठी देखील आहेत. यामधल्या अनेक गोष्टी वाचल्या मी. मला त्या खूप आवडल्या म्हणून मला हे पुस्तक खूप आवडलं. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही देखील हे पुस्तक जरूर वाचा.

त्या पुस्तकातील मला आवडलेली गोष्ट म्हणजे ‘प्रयत्नाने यश मिळाल्याशिवाय थांबत नाही’. गोष्टीचे नाव एवढ मोठं आहे पण गोष्ट एवढी मोठी नाही तुम्हाला वाटते तेवढी. एक चिमणा आणि चिमणीचे जोडपं असत. त्यांचं घरटं बांधण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते. घरट मोठं बांधायचं असतं ना म्हणून, कारण आता त्यांच्या घरात म्हणजे घरट्यात नवीन मेंबर येणार होता. त्यांची सगळी तयारी चालू होती. मग काय, झालं चिमणीला पिल्लू. जसजसं पिल्लू मोठ होत गेल तसतसं ते हसू खेळू लागलं. पण त्याला उडता येत नव्हतं. आई-बाबाही त्याला सांगून खूप थकले, पण त्या पिल्लाला उडायची खूप भीती वाटत होती. एकदा त्याने मनाशी पक्क ठरवलं की, मी आता उडायला शिकणार. असं ठरवल्यामुळे प्रयत्न करून करून ते पिल्लू उडायला शिकलं. ही गोष्ट मला खूप आवडली आणि ती मला तुम्हाला सांगावीशी वाटली.

धन्यवाद.

-सानिका गणेश सावंत

७ वी अ  

शिशुविहार प्राथमिक शाळा , एरंडवणे

 

.