शिक्षणविवेक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’, 'कोश वाङ्मयाचे महत्त्व' या विषयावर म.ए.सो. मुलांचे भावे हायस्कूलमधील प्र.ल. गावडे सभागृहात व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या वेळी म.ए.सो. मुलांचे भावे हायस्कूलचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ आणि शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक अर्चना कुडतरकर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला म.ए.सो. मुलांचे महाविद्यालय, विमलाबाई गरवारे महाविद्यालय आणि रेणुका स्वरूप महाविद्यालयातील ११  वी आणि १२ वीचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. शरद कुंटे म्हणाले,  “आपल्याकडे जगाला देण्यासाठी काही असेल तरच आपल्याला किंमत असते, अन्यथा आपल्याला किंमत नसते. जेवढे आपण समाजाला देऊ त्यावरून आपली किंमत ठरते. त्यासाठी जगाच्या गरजा ओळखता यायला पाहिजेत. आणि जगाच्या गरजा ओळखण्यासाठी अभ्यास आणि वाचन करणे खूप महत्त्वाचे आहे.’’
 
“कधी, कुठे, काय, कसं, किती वाचायचे आणि त्याचा उपयोग आपल्याला कसा करता येऊ शकतो, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हा विद्यार्थ्यांना या वयात तरी पडायला पाहिजेत. यातूनच आपण काय वाचायचे हे कळते आणि आपल्याकडच्या क्षमता आपल्या लक्षात येतात. त्यातूनच जगाला आपण मदत करू शकतो.’’
 
“भूक ही शारीरिक गरज आहे, तशीच वाचन ही मानसिक गरज आहे. त्यामुळे ती पूर्ण झालीच पाहिजे. कारण वाचन हा एक उर्जेचा प्रवाह आहे, तो कधीच थांबत नाही. आज आपण ज्यांच्या नावाने वाचन प्रेरणादिन साजरा करत आहोत त्या ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी शेवटपर्यंत विद्येचा ध्यास सोडला नाही."
 
विश्वकोशाचे वाड्मयातील महत्त्व सांगताना मा. दिलीप करंबेळकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी सतत ज्ञान वाढवण्याच्या मागे लागले पाहिजे आणि ज्ञानाचे व्यवहारात उपयोजन कसे करायचे ते शिकले पाहिजे. ज्ञान वाढवण्यासाठी वेगवेगळे कोश हाताळण्याची सवय लागली पाहिजे. परमेश्वर जेव्हा आपली एक वाट बंद करतो तेव्हा दुसरी कुठलीतरी वाट त्याने उघडून ठेवलेली असते, हा एक मौलिक संदेश डॉ. अब्दुल कलामांनी अग्निपंख या पुस्तकातून दिला आहे. विशेष ज्ञानाचे एक चाक आणि सामान्य ज्ञानाचे दुसरे चाक असा दुचाकी ज्ञानरथ आपल्याला हाकावा लागतो. त्यामुळे अवांतर ज्ञान घेण्यासाठी कोश वाङ्मयाचे वाचन आवश्यक आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक अर्चना कुडतरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन चित्रा नातू यांनी केले. शिक्षणविवेकच्या उपक्रम प्रमुख रुपाली सुरनीस यांनी उपस्थितांचे आभार मानले.  
मान्यवरांच्या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी विविध विषयांवरील कोश हाताळले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. 
 
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे :