खूप पूर्वी, अमरशक्ती नावाचा एक राजा होता. त्याला तीन मुले होती, पण हे तिघंही थोडे भोळे होते. या राजपुत्रांना व्यवहार आणि राजकारण शिकवायला हवे होते. किती शिकवलं तरी त्यांच्या काही लक्षात येईना. मग राजाने विष्णुशर्मा या वृद्ध विद्वानाला पाचाराण केले. त्याने राजकुमारांची समस्या सांगितली. विष्णुशर्माच्या लक्षात आले की, या मुलांना धर्मशास्त्र, अर्थशास्त्र सरळसरळ शिकवले तर कळणार नाही. त्यांना सगळं सोपं करून शिकवायला लागणार.

तेव्हा विष्णुशर्माने एक युक्ती केली. त्याने माहितीतल्या गोष्टी एकत्र केल्या. काही गोष्टी स्वतः रचल्या. एकातएक सुंदर गुंफल्या. या गोष्टी पाच भागात विभागून यातून पाच तंत्र शिकवली - मित्रलाभ, मित्रभेद, सुहृदभेद, विग्रह आणि संधी. मग त्याने राजपुत्रांना प्रत्येक गोष्ट Case Study म्हणून शिकवली. त्या गोष्टींमधून त्यांना नीतिशास्त्र व धर्मशास्त्राचे धडे दिले. काही दिवसांतच हे राजकुमार राज्य करण्यास शहाणे झाले.

पंचतंत्रमधील गोष्टी तर खूप प्रसिद्ध आहेत! तुम्हालासुद्धा आई-बाबांनी लहानपणी या गोष्टी सांगितल्या असतील. बडबडणार्‍या कासवाची गोष्ट आठवते? एक कासव आणि दोन बगळे मित्र असतात. एकदा ते बगळे दूरच्या तळ्याकडे निघतात. कासवाला फार वाईट वाटते. मी कसा येणार इतक्या दूर? मग बगळे शक्कल चालवतात. आपल्या चोचीत एक काठी धरतात आणि कासवाला ती काठी तोंडात धरायला सांगतात. तिघे जण उडतउडत निघतात. असे जात असताना काही मुले या तिघांची वरात बघून कासवाला हसायला लागतात. कासवाला राहवत नाही आणि त्या वात्रट मुलांना उत्तर देण्यासाठी तोंड उघडतो ... पण बिचारा काही बोलायच्या आतच खाली पडून प्राणाला मुकतो. या गोष्टीतून राजकुमार नको तेव्हा बोलू नये, कुठे किती बोलावे, कधी कधी बोलण्यापेक्षा मौन धारण करणे चांगले असते, हे शिकतात. 

आणखी एक गोष्ट विहिरीतल्या सिंहाच्या प्रतिबिंबाची. एक सिंह सशाला पकडतो. तो सशाला खाणार इतक्यात  ससा सांगतो, ‘‘अरे, जंगलात एक नवीन सिंह आलाय. तो एका विहिरीत राहतोय. आणि स्वत:ला जंगलाचा राजा म्हणून सांगत आहे. तू त्या सिंहाला एकदा बघ आणि मग मला खुशाल खा!’’ सिंह विहिरीत डोकावून पाहतो, तर त्याला पाण्यात स्वत:चे प्रतिबिंब दिसते. सिंह गर्जना करून म्हणतो, ‘मी जंगलचा राजा आहे.’ विहिरीतून प्रतिध्वनी येतो, तेव्हा सिंहाला वाटते विहिरीतला सिंह खरंच स्वत:ला राजा म्हणवत आहे! त्याच्यावर चिडून सिंह विहिरीत उडी मारतो! आणि ससा आनंदाने घरी जातो! 

माकड आणि मगरीची गोष्ट आठवते? माकडाचे काळीज खाण्यासाठी मगर माकडाला पाठीवर घेऊन नदीतून जात असते. पण, त्याचा डाव लक्षात आल्यावर माकड म्हणते अरे! माझे काळीज तर झाडाच्या डोलीत आहे. तुला हवे असेल तर मी तुला आणून देतो. मगर पुन्हा वळते आणि माकडाला डोलीतून काळीज आणायला सांगते. पण तीरावर येताच माकड टुणकन उडी मारून पळून जाते! या गोष्टींमधून राजकुमार शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे शिकतात.

ऐकल्या आहेत ना या सगळ्या गोष्टी? नुसते नाव सांगितले तरी ती गोष्ट आठवते. या गोष्टींमधून कासवाचा मूर्खपणा, सिंहाची प्रौढी, माकडाचा चतुरपणा बरोबर लक्षात राहतो! हीच तर गंमत आहे पंचतंत्रातील गोष्टींची. छोट्या छोट्या गोष्टीतून संकटांचा सामना कसा करायचा, कसे वागायचे, कुणाशी मैत्री करायची, शत्रूची मर्मस्थळे कशी वापरायची असे सगळे शिकवले आहे. उत्तमोत्तम म्हणींचा संग्रह पंचतंत्रात मिळतो, जसे -

यानि कानि च मित्राणि, कृतानि शतानि च ।

पश्य मूषकमित्रेण, कपोता: मुक्तबन्धना: ॥

मनुष्याला खूप मित्र असावेत. पाहा, कबुतरांना त्यांच्या उंदीर मित्रांनी कशी मदत केली.

अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका।

तृणैर्गुणत्वमापन्नैः बध्यन्ते मत्तदन्तिनः॥

एकत्र येऊन मोठी कामे करता येतात. पाहा ना, अनेक गवताच्या कड्या एकत्र आल्या तर त्यांची दोरी मत्त हत्तीला सुद्धा बांधून ठेवू शकते. 

बुद्धिः यस्य बलं तस्य।

ज्याच्याकडे बुद्धी आहे, तोच शक्तिवान आहे.

या गोष्टी आपल्यालाच आवडतात असे नाही. तर जगभरात या गोष्टी प्रसिद्ध आहेत! इ.स. ५०० मध्ये पर्शियाचा बोराझूई नावाचा एक वैद्य भारतात आला होता. त्याला मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची कला शिकायची होती. ती तर काही मिळाली नाही. पण एका ऋषीने त्याला पंचतंत्रचे पुस्तक देऊन सांगितले - ‘‘बाबा रे! मेलेल्या माणसाला जिवंत करायला पर्वतावर संजीवनी मिळणार नाही. पण मेलेल्या (अज्ञानी) माणसाला जिवंत (शहाणं) करायला, या पर्वतावर (पुस्तकात) अनेक संजीवनी (चातुर्याच्या गोष्टी) मिळतील.

बोराझूईने ते पुस्तक वाचले आणि ते डोक्यावर घेऊन नाचला! त्या पुस्तकाचा त्याने पर्शियन भाषेत अनुवाद केला. पुढे त्या पर्शियन पुस्तकाचे अरेबियन, ग्रीक, लाटिन, स्पानिश, झेक, व इतर युरोपीय भाषांमध्ये अनुवाद झाले. हे पुस्तक ‘बिद्पाईच्या गोष्टी’ किंवा ‘पिल्पेच्या गोष्टी’ या नावाने युरोप व अरेबियामध्ये प्रचंड गाजले. केवळ युरोपमध्येच नाही, तर इंडोनेशियापासून इंग्लंडपर्यंत पंचतंत्रच्या गोष्टी मस्त ऐसपैस पसरल्या होत्या आणि आपल्यासारख्याच जगभरातील कितीतरी मुलांनी रात्री झोपताना या गोष्टी ऐकल्या!

-दिपाली पाटवदकर 

[email protected]

अर्जुन, कृष्ण आणि गीतेची कथा वाचा खालील लिंकवर  

अर्जुन, कृष्ण आणि गीता