तबला

दिंनाक: 13 Oct 2018 14:54:18


तबला हे अभिजात हिंदुस्थानी संगीतात वापरले जाणारे एक चर्माच्छादित तालवाद्य आहे. तबला-जोडी ही दोन भागांची असते. उजखोर्‍या व्यक्तीच्या उजव्या हातास तबला (किंवा दाया) व डाव्या हातास डग्गा (किंवा बाया) असतो. तबलावादक तबलजी वा तबलिया म्हणून ओळखले जातात. तबल्याच्या उत्पत्तीविषयी निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी इ.स.पूर्व २०० मध्ये भाजे येथील सूर्यलेणी या कोरीव कामात तबला वाजवणारी स्त्री दिसून येते. हे लेणे सातवाहन काळात कोरले गेले. या पुराव्यामुळे तबला हे वाद्य भारतात किमान दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे असे सिद्ध करता येते. १२व्या शतकात शारंगधर यांनी संगीत रत्नाकर नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात तबल्याच्या बोलांचे वर्णन लिखित स्वरूपात आहे. यामुळे तबला हे वाद्य भारतीय आहे असे निश्चित होते. तरीही काही लोक तबल्याचा जनक म्हणून अमिर खुस्त्रो याला मानतात. तबला या वाद्याचे मूळ ‘तब्ल’ या अरबी वाद्यात असावे असे म्हणतात. इब्न खुर्दाद बिह या इतिहासकाराच्या मते तब्लच्या निर्मितीचा मान तबल् बी लमक या अरबी कलावंताकडे जातो. नंतर हे वाद्य मोगलांकरवी भारतात आले असावे. तरीही तबल्याला मृदंग-पखावजाप्रमाणे लावण्यात आलेली ‘शाई’ यामुळे या वाद्याचे भारतीय मूळ अधोरेखित होते. कारण सुमारे १८व्या शतकापर्यंत शाई ही फक्त चीन आणि भारतात बनवली जात असे. १२९६ ते १३१६ च्या दरम्यान तबल्यात महत्त्वाच्या सुधारणा होऊन गायन-वादनात साथीसाठी वापर होऊ लागला. तसेच तबला स्वतंत्र वादनासाठीही प्रसिद्ध आहे. पखवाजाचे दोन तुकडे करून तबल्याची निर्मिती झाली, असेही परंपरेने सांगण्यात येते. तोडा और तब भी बोला, सो तबला अशी तबला या शब्दाची उत्पत्ती आहे असे मानले जाते. अरबी भाषेतील ‘तब्ल’ (अर्थ: वाद्य) या शब्दाशी तबल्याचा संबंध दिसतो. १८व्या शतकात दिल्लीच्या सिद्धारखाँ यांनी प्राचीन तबल्याची सद्यकालीन तबल्याची शैली परत प्रचारात आणली असे निश्चितपणे सांगता येते. चांगल्या प्रतीच्या साधारण एक लाकडी तुकड्यास आतून कोरून पोकळ बनवले जाते. खैराचे वा शिसवीचे लाकूड यासाठी उत्तम समजले जाते. या पोकळ भांड्यावर जनावरांचे चामडे लावून बसवण्यात येते. या कातडी आवरणास पुडी असे म्हणतात. यावर आणखी एक गोल किनार केवळ कडांवर बसवण्यात येते. यास चाट (किंवा गोट) म्हणतात. शाईच्या भोवतालच्या कातड्यास लव किंवा मैदान असे म्हणतात. तबल्याच्या मधोमध शाई लावण्यात येते. त्यात लोखंडाच्या कणांची बारीक पूड करून मिसळतात. तबल्याची पट्टी (आवाजाचा पोत) शाईच्या थरावरून निश्चित होते. ही पट्टी निश्चित करण्यास मुख्यत्वे संवादिनी / बाजाच्या पेटीचा वापर करतात. उदा., हार्मोनियमच्या काळी ४शी सम-स्वरात असलेला तबला काळी ४चा तबला म्हणून ओळखला जातो. हवामानातील बदलामुळे तबला एकदा सुरावर लावला तरी काही काळाने सुरात फरक पडू शकतो. यासाठी वादनापूर्वी गठ्ठे (ठोकळे) वर-खाली करून तबला परत स्वतःच्या पट्टीवर मिळवतात. तबल्याच्या तोंडाचा व्यास जसजसा कमी-कमी होत जातो, तसा त्याचा स्वर वरच्या पट्टीत वा टीपेकडे जातो. तबला व डग्गा यांच्या सर्वांत बाहेरची कड म्हणजे गजरा होय. यात १६ घरे असतात. तबला व डग्गा यांच्या वाद्या गजर्‍यातील या घरांमधून विणल्या जातात. तबला व डग्गा यांच्या तळास जी कातडी पट्टी असते तीस गुडरी म्हणतात. वाद्या वरच्या बाजूला गजर्‍यात, तर खालच्या बाजूस गुडरीतून ओवलेल्या असतात. प्रदेशानुसार धातूचे वा मातीचे डग्गे बघण्यास मिळतात. याची शाई तबल्याप्रमाणे केंद्रस्थानी नसून चाटेच्या नजीक असते. डग्ग्याच्या शाईचा व्यास सुमारे १० से.मी. असतो. डग्ग्यात गठ्ठे वापरले जात नाहीत. डग्ग्याच्या भांड्याचा व्यास वरच्या भागात मोठा असून (सुमारे २५ से.मी.) खालच्या भागात निमुळता होत जातो. तबलजींकडे याशिवाय तबला / डग्गा ठेवण्यास चुंबळ, तबला सुरात लावण्यास हातोडी व बोटांना येणार्‍या घामापासून तबल्याची कातडी वाचवण्यासाठी पावडर, अशी व्यवस्था असते. वादन शैलीतील फरकांमुळे तबल्यात स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये असलेली अनेक घराणी निर्माण झाली आहेत. यात दिल्ली घराणे, लखनौ घराणे, बनारस घराणे, पंजाब घराणे, इंदूर घराणे, तसेच फारुकाबाद, अज्रडा, बनारस आदि तबल्याची इतर घराणी आहेत. उस्ताद अल्लारखाँ (पंजाब घराणे), उस्ताद अहमदजान थिरकवा (फ़ारुक़ाबाद घराणे), उस्ताद झाकिर हुसेन (पंजाब घराणे), पं. सामताप्रसाद, पं. किशन महाराज इ. काही प्रसिद्ध तबलावादकांची नावे आहेत. 

-यशोधन जटार

[email protected]