शंकासूर

दिंनाक: 12 Oct 2018 15:28:50


शंकासूर व गुलमोहोरात बरंच साम्य आहे. गुलमोहारासारखीच छोटी संयुक्त पोपटी पाने, लाल पिवळी आकर्षक फुलं त्यामुळेच चुकून बरेचजण यालाही (गुलमोहोराचा धाकटा भाऊ) गुलमोहोर समजतात. ह्याचे गोत्रही गुलमोहोराचे आहे लेग्यूमिनोसी-सिसालापिनोडी आणि याचे शास्त्रीय नाव – सालपेनिया पल्चेरिमा. याचे मुळस्थान द. अमेरिकेचा उष्ण कटिबंधीय प्रदेश. वेस्ट इंडीज या देशाच्या बार्बाडोस या बेटाचं हे राष्ट्रपुष्प आहे.

सोळाव्या शतकाच्या ‘आन्द्रे सिसालपिनी’ या शास्त्रज्ञाचे नाव याला दिले. पल्येरिया म्हणजे अतिशय सुंदर. ३ ते ५ मीटर वाढणारा हा झुडपासारखा वृक्ष सुंदर दिसतोच पण कुठल्याही जमिनीत अगदी क्षार असलेल्या जमिनीत, पाणी कमी असलं तरीही वाढणारा वर्षभर फुलं देणारा हा शंकासूर. हा शेंगवर्गीय कुळातला असून त्याच्या तुर्यासारख्या पुंकेसरावरून पिकॉक म्हटलं जातं. याची फुलं फांद्यांच्या टोकाला, मोठाल्या त्रिकोणी तुऱ्यामध्ये लागणारी, तळाकडून वर फुलत जाणारी पण गुलमोहर फुलांपेक्षा पुष्कळ लहान! लांब दांड्यांवर टपोऱ्या कळ्या लागतात. फुलाला पाच पाकळ्या. वळ्या-वळ्यांच्या पाकळ्यांपैकी एक लहान असते. काहीशी नरसाळ्यासारखी. पाकळ्यांमधून ताठ मानेने उभे डोकावत असतात. लांबलचक दहा पुंकेसर! केशरी कधी पिवळी, लालसर गुलाबी रंगाची फुले असतात. पुंकेसरांमुळे त्यांची शोभा वाढते. बऱ्याच जातीत ही लहान पाकळी वेगळ्या रंगाचीही असते.

फांद्या पसरलेल्या, पक्षांच्या पिसाऱ्यासारखी १०-१५ सें.मी. लांब पण काटेरी पानं, तजेलदार चिंचेच्या पानासारखा पण फिकट रंग असतो. याच्या झाडावर फुलांमुळे कीटक, पक्षी, फुलपाखरे यांची ये-जा चालूच असते. सदाहरित, सदाबहार शंकासूर इतर अनेक ठिकाणी तसेच उद्यानातही आढळतो.

फुलं येऊन गेली की त्याचे फळ म्हणजे त्याची चपटी शेंग. चपट्या हिरव्या शेंगा पिकल्या की तांबूस रंगाच्या होऊन तडकतात. त्यातील ६-८ बिया लांबवर फेकल्या जाऊन बियांपासून रोपं सहज तयार होतात. आणि वर्षभरात त्यांना फुलही यायला लागतात.

आधुनिक उपचार पद्धतीत श्वसनविकार, लठ्ठपणा इत्यादी उपचारांमध्ये या झाडांचे भाग वापरले जातात.

-मीनल पटवर्धन

[email protected]

 

कळलावी या फुलाविषयी माहिती घेऊ मीनल पटवर्धन यांच्या खालील लेखात

 कळलावी