'आपण मोबाईलवर एकमेकांना मेसेज पाठवताना, इमोजी वापरतो. माहिती आहे ?'

आज स्नेहलताईनं एकदम वेगळ्याच विषयाला हात घातला. सगळे आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले.

'कोणकोणते प्रकार वापरतो सांगा पाहू ..... ' स्नेहलताई.

'एकदम दात विचकून दिलखुलास हसणारा' - निखिल.

'कुणाकडून झालेलं कौतुक स्वीकारताना, मंदपणे हसणारी' - केतकी.

'आपण सांगितलेल्या जोकवर, तिरपी मान करून हसणारी' - सायली. 

'कुणाची तरी खेचली की, एक डोळा मारून जीभ बाहेर काढून, टिंगल करणारा' - अथर्व.

'भीतीदायक काहीतरी पाहिल्यावर घाबरून डोळे मोठे करणारी' - नेहा.

'रडवेला झालेली' - अंकिता.

'खूप वाईट वाटलं असं दाखवतांना दोन्ही डोळ्यांतून अश्रूंचा महापूर वाहत असलेला' - सारंग.

'खूप आश्चर्य वाटलं असं दाखवताना तोंडावर हात ठेवून डोळे मोठे करणारा' - किरण.

'खूप खूप रागावलेली' - शमिका.

'शाब्बास, छान प्रकार जाणवलेत तुम्हाला.' स्नेहलताईनं शाबासकी दिली. 'म्हणजे ....इमोजी म्हणजे काय तर इमोशन्स... भावना दाखवणारी चित्रं. या भावना काही फक्त आनंद आणि दु:ख अशा दोनच प्रकारच्या नसतात, तर त्यांना निरनिराळ्या छटा असतात आणि त्या त्या वेळच्या भावना आपल्याला निरनिराळ्या प्रकारे दाखवता येतात. कधी बोलून तर कधी न बोलताही कळतात. कधी आपल्या चेहऱ्यावरून तर कधी आपल्या देहबोलीतूनही व्यक्त होतात.' 

'म्हणजे काय ताई .... न बोलताही कसं कळतं?' गोंधळलेल्या छोट्या अंकिताने विचारलं. 

'म्हणजे आता बघ ...... तुला आत्ता चाॅकलेट नाही मिळणार..... असं आईनं सांगितल्यावर तू रुसून हुप्प होऊन बसतेस, तेव्हा तुझ्या आज्जीला कळतं किनई तू रुसलीयेस ते. मग ती तुला म्हणते....

रुसुबाई रुसू कोपऱ्यात बसू । येऊ दे ग गालात खुदकन् हसू..... ' सारंगने अंकिताची खेचली.

अंकिता खुदकन् हसली. 

'माझ्या आईला तर माझ्या चेहेऱ्याकडे बघूनच कळतं, मला मार्क्स कमी मिळाले ते', सायलीनं कबुली दिली.

'मला तर रिझल्ट कळला की कधी एकदा आईबाबांना सांगतो असं होतं आणि मला धावत येताना बघून त्यांनाही लगेच कळतं की माझा पहिला नंबर आलाय ते', निखिल.

'म्हणजे कळलं ना मी काय म्हणते ते. या सगळ्या भावना आपल्या चेहेऱ्यावर दिसतात, हालचालीतून जाणवतात, अगदी फोनवर बोलताना आवाजातूनही कळतात. फक्त या भावना योग्य वेळी व्यक्त झाल्या पाहिजेत आणि कुणीतरी त्याची तितक्याच आपुलकीनं दखलही घेतली पाहिजे. ' स्नेहलताई. 

'हो ना .... नाहीतर आपण आपलं काहीतरी उत्साहानं सांगायला जावं आणि बाबा त्यांच्या कामात बिझी आणि आई तिच्या कामात अडकलेली. अशा वेळी आपल्याकडे कुणाचं लक्षंच नाही, आपलं ऐकायला कुणाला वेळच नाही असं वाटून मला तर रडूच येतं.' सागरने प्रामाणिकपणे कबुली दिली. आत्ताही बोलताना त्याचा गळा दाटून आला.

'ए रडूबाई, रडतोस काय मुलींसारखा ?' अथर्वने चिडवलं.

स्नेहलताईने लगेच त्याला टोकलं ...'अरे, मुलगा झाला म्हणून काय झालं. भावना सगळ्यांनाच असतात. मुलगा काय आणि मुलगी काय, रडू हे येणारच. मुलांनी रडू दाबून ठेवायचं, मुलींसारखं रडायचं नाही हे कोणी सांगितलं तुला?' 

'आणि तुला तर माहितीच आहे ताई..... हल्ली मुलीसुद्धा ऊठसूठ रडत नाही बसत. चांगलं रडवतात ...... मुलांनासुद्धा.' केतकी.

सर्व मुलींनी टाळ्या वाजवून दाद दिली केतकीला. 

'हो तर!' स्नेहलताईनं दुजोरा दिला. 'आपल्या मनातल्या भावना कधीच दाबून ठेवू नयेत. त्यामुळे मनावर विनाकारण ताण येतो. त्यांना मोकळी वाट करून दिलीच पाहिजे. आपली सुखदु:खं कोणाशी तरी शेअर केली पाहिजेत. म्हणतात ना आनंद वाटल्यानं द्विगुणीत होतो आणि दु:ख वाटल्यानं कमी होतं. मन हलकं होतं. मनात वाईटसाईट विचार येत नाहीत. 

आणि हो.... एक नेहमीच लक्षात ठेवायचं, त्या भावना आपल्याला काबूत ठेवतां आल्या  पाहिजेत. म्हणजे..... आनंदानं अती हुरळून जायचं नाही अन् दु:खानं कोलमडून पण जायचं नाही. असा मनाचा समतोल साधणं कठीण असतं खरं, पण ते आवश्यकही असतं. आता तुमच्या वयाच्या मुलांकडून एकदमही इतकी परिपक्वता ... मॅच्युरिटी ... अपेक्षित नाही. कधी कधी तुम्ही खूप रागावता, रुसता, चिडता. ते एकदम स्वाभाविक आहे. पण त्यातून लवकरात लवकर बाहेर पडता आलं पाहिजे. निदान तसा प्रयत्न तरी करायलाच पाहिजे. एखादं वेळेस कमी मार्क मिळाले, एखाद्या विषयात नापास झालो तरी हरकत नाही. पण असं का झालं याचा विचार केला, तर त्यावरही मात करता येतेच. सगळेच जण सगळ्या विषयात स्काॅलर कसे असतील? आपल्याला काय जमतंय, काय आवडतंय याचाही विचार करायला शिकलं पाहिजे. त्यासाठी आपले आई-बाबा, दादा ताई, मित्र-मैत्रिणी यांची मदत होऊ शकते. आपल्यातले प्लस पाॅइंट्स ओळखायला शिकलं पाहिजे. म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी करताना त्यांत आनंद घेता येतो. अगदी मनाविरूद्ध एखादी गोष्ट कुणाच्या सांगण्यावरून करायची असली तरी, जर करणं आवश्यक असेल, हिताचं असेल तर ती करता येते. '

'मी तर माझ्या लाडक्या बाप्पाशीच बोलते नेहमी....' केतकी म्हणाली.

'काहीतरीच काय... देवाशी कोणी बोलतं का? ' सागर.

' हो तर..... गणपती बाप्पा मला सगळ्यात जवळचा वाटतो. बाकी सगळे देव देवळात असतात. आपण त्यांच्या दर्शनाला जातो. मनातल्या इच्छा बोलून दाखवतो, त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून देवाला प्रार्थना करतो. पण गणपती हा एकच असा देव आहे, जो आपल्या घरी रहायला येतो. मला तो माझा मित्र वाटतो. माझ्या मनातलं मी सगळं त्याच्याजवळ बोलू शकते. मी त्याच्याकडे देव म्हणून पाहात नाही, त्यामुळे त्याच्याकडे काही मागण्याचा प्रश्नच येत नाही. मी फक्त प्रामाणिकपणे त्याला माझ्या सर्व गोष्टी सांगते. मला वाटतं माझ्या सगळ्या चांगल्या कामांमध्ये तो माझ्यासोबत असतो. त्यामुळे मला खूप धीर येतो. आत्मविश्वास वाढतो.'

'तेही खरंच..... केतकी तुझा हा वेगळाच विचार मला अगदी पटला....' स्नेहलताईनं केतकीचं कौतुक केलं.

'सगळ्या प्रामाणिक प्रयत्नांना देवाची साथ नेहमीच असते. मी काही चुकीचं वागत नाही ना, मग भीती कशाची हा विश्वास निर्माण होतो. गणपती तर बुद्धीची देवता. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवस नेमानं तो आपल्या बरोबर असतो. पण आपण मात्र त्याचा हा सहवास कारणी लावतो कां, याचा जरूर विचार केला पाहिजे. इतरांनी सुधारावं असं वाटत असेल तर त्याची सुरवात आपल्यापासूनच करायला हवी. तर मग तुम्ही, मी आपण सा -यांनी आज काही गोष्टी ठरवूया. बघूया आपल्या आजूबाजूच्या इतरांवर त्याचा काही परिणाम होतो कां ते .......' स्नेहलताईच्या या बोलण्यानं उत्साह संचारला.