इच्छा

दिंनाक: 05 Jan 2018 12:28:54


आपल्या मनात कितीतरी इच्छा ठाण मांडून बसलेल्या असतात. लहानपणी परिकथा ऐकून, वाचून तसेच व्हावेसे वाटते आपल्याला. कधी वाटते, जादूने अदृश्य व्हावे, कधी वाटते, शूर राजकुमार व्हावे, सुंदर राजकुमारी व्हावे किंवा उडणाऱ्या घोड्यावर स्वार व्हावे... एक ना दोन, असंख्य इच्छा मनात रुंजी घालत असतात, ज्या प्रत्यक्षात अशक्य असतात. आपण जे आहोत, जसे आहोत, तसे आपल्याला नको असते, तर समोरचा जसा आहे, त्याच्याकडे जे आहे, ते हवेसे वाटते आपल्याला. हे झालं माणसांच्या बाबतीत. असाच जर एखाद्या फुलाला, दिव्याला आणि तळ्यातल्या पाण्याला वाटले तर ....

वाचा या रवींद्रनाथांच्या  कल्पनारम्य कवितेत !!

    

एक दिवस फुलास वाटलेयेईल का मलाही उडता ?

जिथे खुशी तिथे विहरेन भारीच वाटेल ढगांत पळता ।

विचार करता करता सहज जुळवल्या पाकळ्या त्या फुलाने

अहो आश्चर्य ! होऊन फुलपाखरू उडून गेलं अति आनंदे ।।

 

एका जागी रोज बसून म्हणे प्रकाश समईचा

मनात माझ्या एकच ध्यास, उंच उंच उडण्याचा ।

उडू शकलो असतो तर किती छान झालं असतं

रंगीत संगीत जग सारं डोळ्यांनी या पाहिलं असतं ।

अवचित मिळाले पंख, त्याचा काजवा की हो झाला

घरात कसा ठेवू आता, उंचच उंच उडून गेला ।।

 

तळ्याचे पाणी म्हणते मनात, सतत चूप असतो मी

हाय हाय, कित्ती मज्जा, उडतात कावळा- चिमणी ।

म्हणूनच वाटतं, एके दिवशी धूसर पंख उभारून

अनायासे आकाशात उडालं पाणी मेघ होऊन ।

 

मलाही वाटते, होऊन घोडा, अरण्य करावे पार

कधी वाटते, मासा होऊन पोहून जावे सागर चार ।

पक्षी होऊन झेपावेसे वाटते निळ्या गगनात

कधीच होणार नाही शक्य, का येते तेच मनात ?

 

-स्वैर अनुवाद - स्वाती दाढे.

 [email protected]

मूळ बंगाली कविता - रवींद्रनाथ.