इंदिरा संत 

संत, इंदिरा नारायण

कवयित्री

४ जानेवारी १९१४ - १३ जुलै २०००  

इंदिरा नारायण संत या पूर्वाश्रमीच्या इंदिरा गोपाळराव दीक्षित. विजापूर जिल्ह्यातील ‘इंडी’ या तालुक्याच्या गावी दीक्षितांच्या कुळात जन्म झाला. त्यांचे वडील गोपाल सीताराम दीक्षित हे प्रशासकीय सेवेत मामलेदार होते. वडिलांची गावोगावी बदली झाल्याने कानडी मुळाक्षरे व थोडेसे लेखन-वाचन त्यांनी घरीच केले. ‘तवंदी’ हे त्यांच्या वडिलांचे मूळ गाव होते. घरच्या वाङ्मयीन वातावरणामुळे इंदिराबाईंच्या मनात कवितालेखनाची आवड बालपणातच निर्माण झाली. घरी ‘रामायण’ व ‘महाभारत’ यांसारखे ग्रंथ; भारतगौरव ग्रंथमालेच्या कादंबऱ्या; मनोरंजन, उद्यान इत्यादी मासिकांचे अंक यांसारखे खूप साहित्य होते. या वाचनाने या पुस्तकांतून भेटणाऱ्या लालित्याचा, भावात्मकतेचा खोल ठसा त्यांच्या अंतःकरणावर उमटला आणि याचा परिणाम म्हणजे त्यांना कवितालेखनाचा छंद जडला. त्यांच्या घरचे सात्विक संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्याकरिता उपयोगी पडले.

निसर्गाशी नाते   

घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी स्तोत्रे म्हणण्याची पद्धत होती. त्यामुळे काव्य छंदात्मक असते, याची त्यांना जाणीव झाली. घरी पोथ्या-पुराणे, संतवाङ्मय तसेच मोरोपंत, वामन पंडित यांचे आख्यानकाव्य यांचे वाचन होत असल्याने प्राचीन मराठी कवितेचा संस्कार बालपणीच यांच्या मनावर झाला. तसेच त्यांची आई त्यांच्याकडून भूपाळ्या व तुळशीपूजा म्हणवून घेत असे. अशा प्रकारे आई – वडिलांचे, घराण्याचे सुसंस्कार लहान वयातच झाल्यामुळे त्यांची काव्याविषयी गोडी अधिकच वाढली. या संस्काराचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या काव्यावरही झाला. ‘बाहुल्या’ (१९७२) या संग्रहातील ‘सोन्याची कोयरी’ या कवितेत त्यांनी या सुसंस्कारांची जाणीव व्यक्तही केली. त्या सहा-सात वर्षांच्या असतानाच १९२० साली गदग येथे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना ‘तवंदी’ येथे काकांकडेच राहावे लागले.

इंदिरा संताचे बालपण ‘तवंदी’ या खेड्यात गेल्यामुळे या खेड्यातील निसर्गदृश्ये त्यांच्या अंत:करणात ठसवली गेली. निसर्ग-सौंदर्याचा खरा आस्वाद इंदिराबाईंनी बालवयातच घेतला. त्यामुळे बालपणीच्या अनुभवांना विशेष महत्त्व आहे. बालपणापासून स्पर्श, रस, रंग, गंध, रूप आणि वृत्ती इत्यादी संवेदनाअनुभवांचे रसपान करीतच त्यांच्या काव्यात्म व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.

इंदिराबाईंना लहानपणापासून मातीची ओढही आहे. त्या एकाच वेळेस निसर्गकन्या व भूमिकन्या आहेत. ‘मृण्मयी’ या कवितेतूनच त्यांची ही ओढ व्यक्त होते. सारा निसर्ग त्या विद्युत्कणाने असा काही जवळ केला की कवितेतील पहाड, तिरपा पाऊस, ते हिरवेपण, ते आभाळ या सर्वांना त्या प्राणानेच जीवकळा लाभली. तो निसर्ग जणू एखाद्या सतारीसारखाच त्यांच्या मनात उभा राहिला आणि त्यावर भाववृत्ती झंकारल्या. या निसर्गाचा परिणाम त्यांच्या बाह्य व अंतर्गत व्यक्तिमत्वावर अतिशय खोलवर गेलेले आहे.

इंदिराबाईंना बालपणापासूनच ओव्यांचे आकर्षण होते. ओव्या गोळा करण्याचा छंद होता. या स्त्री-गीतांचा परिणाम असल्यामुळे वृत्त, जाती, राग यांचा स्वीकार न करता, ओव्यांमधील नादलय व स्वरलय आवडल्यामुळे त्या ओवी वृत्तातच कविता लिहीत. ओवी म्हणजे त्यांना उत्कृष्ट भावकविता वाटायची. शब्दांचा साधेपणा, वृत्तीचा बाळबोध नितळपणा व मोठा आशय थोडक्यात सांगण्याची शक्ती हे सारे ओवीतले गुण त्यांच्या कवितांत रुजले. एकूणच बेळगाव व तवंदी या दोन्ही गावांच्या अनुभवांनी त्यांची कविता समृद्ध झाली. शालेय शिक्षणातच त्यांच्या कविताप्रेमाला खतपाणी मिळाले. इंदिराबाईंचे दहावीपर्यंतचे शिक्षण बेळगावलाच झाले. त्यांनी वि.स. खांडेकर, ना.सी. फडके यांच्या कादंबऱ्या; बालकवींची कविता, इंग्रजी पुस्तके हे सारे शालेय जीवनातच वाचले. एकाकीपणाची जाणीवही याच काळात झाली. ‘सहवास’ या पहिल्या संग्रहातील ‘अनाथ’ ही कविता याचे दर्शन घडवते. मनातील भाव कवितेत उतरावेत ही जाणीव त्यांना या कवितेपासून झाली. पण घरातल्या कडक शिस्तीत कवितेचे अंकुर जळून गेले. एकीकडे कटू वास्तवता व दुसऱ्या बाजूला कवितेतील स्वप्नदृष्टी! त्यामुळे त्यांच्या स्वभावाची घडण गांभीर्याकडे झुकली. महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. याच वेळी मित्रमैत्रिणींच्या सहवासात कवितेची आवड पुन्हा निर्माण झाली. याच काळात महाविद्यालामधले प्रसिद्ध लघुनिबंधकार नारायण माधव संत यांच्याशी इंदिराबाईंचा परिचय झाला. समानशीलत्वामुळे त्या परिचयाचे रूपांतर प्रीतीत झाले. जीवनातील खऱ्या काव्याची ओळख झाली. दोन्हीकडच्या विरोधी परिस्थितीतही १९३५ साली जूनमध्ये इंदिराबाई व नारायण संत विवाहबद्ध झाले. स्वप्न साकार झाल्याचे समाधान त्यांना वयाच्या २१ व्या वर्षी मिळाले. लग्नानंतर त्यांच्या सुखी संसाराचे, संतृप्त वृत्तीचे चित्रण त्यांच्या काव्यातून जाणवते.

संसार, मुले, मधूनमधून नोकरी यांत रममाण होताना कवितेकडे लक्ष नव्हते. १९३६ पासून म्हणजे लग्नानंतर इंदिराबाईंनी पुणे, बेळगाव, मुंबई या ठिकाणी नोकरीनिमित्त वास्तव्य केले. सुखी संसाराच्या या दशकानंतर त्यांचे दु:खपर्व सुरू झाले. १९४६ साली ना. मा. संतांच्या मृत्युनंतर इंदिराबाई दु:खात पार बुडाल्या. या दुःखाचे चित्रण त्यांनी अनेक कवितांतून उत्कटपणे केले. ‘कातरवेळेला’ या कवितेतून हे दु:ख विशेषतः व्यक्त झाले आहे. सफल प्रीतीपेक्षा जीवघेण्या दुःखाचे चित्रण त्यांच्या काव्यातून प्रतिबिंबित झाले.

विशुद्ध भावकविता

मराठी काव्याच्या इतिहासात इंदिरा संत ह्या ‘विशुद्ध भावकविता लिहिणाऱ्या कवयित्री’ म्हणून विख्यात आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या आधुनिक मराठी कवितेच्या युगाचे प्रणेते मर्ढेकर हे सर्वश्रुत आहेत. मागच्या कवितेचा ठसा पुसून टाकून त्यांनी नवीन वाट तयार केली. इंदिरा संतांनी ही वाट पूर्णतः स्वीकारली नसली तरी मर्ढेकरांच्या नवकाव्याचे, प्रतिमांचे संस्कार त्यांच्या कवितेवर होत गेले. समकालीन कवियत्री पद्मा गोळे, संजीवनी मराठे, सरिता पदकी यांच्यापेक्षा इंदिराबाईंची कविता निराळी आहे. जात्यावरच्या ओव्या, लोकगीते आणि मर्ढेकरी काव्याचा नवीन प्रवाह या त्रयींनी इंदिरा संतांचे काव्य वेगळे झाले. इंदिराबाईंचे काव्य निसर्गावर आहे. तो त्यांच्या कवितेत पूर्णपणे भिनला आहे. सुखासीन पातळीवरून इंदिराबाईंच्या आयुष्यातून प्रा. संत निघून गेल्यामुळे त्यांची झालेली मानसिक व शारीरिक फरफट हे सर्वार्थानेच अचानक झालेले. त्यांच्या जीवनातील हे परिवर्तन काव्यवळणाच्या वाटा बदलण्यासाठी कारणीभूत झाले.

‘सहवास’ (१९४१), ‘शेला’ (१९५१), ‘मेंदी’ (१९५५), ‘मृगजळ’ (१९५७), ‘रंगबावरी’ (१९६४), ‘बाहुल्या’(१९७२), ‘मृण्मयी’ (संपादित रमेश तेंडुलकर), ‘गर्भ रेशीम’ (१९८२), ‘चित्कळा’ (१९८९), ‘वंशकुसुम’ (१९९४), ‘निराकार’ (२०००) असा त्यांचा काव्यप्रवास आहे.

१९४१ साली निघालेला ‘सहवास’ हा एकच संग्रह; सफल प्रीतीच्या नंतर ‘शेला’, मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’ हे दुसरे वळण आणि ‘निराकार’ हे तिसरे! या शेवटच्या  संग्रहातून त्यांचे चिंतनपर वर्तुळ पूर्ण होते व पुन्हा त्याचे टोक पहिल्या वळणावर मिळते, असे शेवटचे स्थित्यंतर!

अर्वाचीन मराठी प्रेमकवितेच्या संदर्भात इंदिराबाईंविषयी वा.ल.कुलकर्णी म्हणतात, “मराठी भावकवितेमधील खरीखुरी जिवंत प्रेमकविता ही इंदिरा संतांचीच आहे. तिच्यात भडकपणाचा लवलेशही नाही. खऱ्या अर्थाने ती भावकविता.”

शुद्धकलानिर्मिती करणे हे विशुद्ध भावकवितेचे कार्य इंदिराबाईंच्या प्रेमकवितेने केले आहे. ही कविता समाजविन्मुख असली, तरी तिने आपली वाट स्वतःच्या पद्धतीने शोधली आहे. प्रेम आणि विरह यांची ही एकच वाट आहे. इंदिराबाईंची प्रेमकविता ही एकाच आशयाभोवती फिरणारी असूनही विलक्षण सामर्थ्यवान व उत्कट आहे. ‘गर्भरेशीम’, ‘चित्कळा’ यांतील कविता याची साक्ष देतात.

प्रतिमांचा वापर

रमेश तेंडुलकर म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या प्रेमकवितेत अभिजात रसिकमन प्रकट होते. ‘सहवास’ नंतर ‘शेला’, मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’ यांत प्रेमकविता अधिक आहेत. तर ‘बाहुल्या’, ‘गर्भरेशीम’ यांत त्यांची कविता भोवताली बघू लागलेली आणि ‘चित्कळा’, ‘वंशकुसुम’ व ‘निराकार’ यांत ती अंतर्मुख होऊन चिंतनपरतेकडे वळलेली दिसते. इंदिराबाईंच्या या काव्यप्रवासात प्रतिमांना आणि रंगांना विशेष स्थान आहे. इंदिराबाईंच्या कवितेतील आत्मनिष्ठाच आशय-अभिव्यक्तीचे एकरूप दर्शवते. सारे प्रतिमाविश्व निसर्गरूपातून आले आहे. चिकाच्या पडद्याआडून जितके दिसते, तितके पण आपल्या प्रतिमांचे सुबक दर्शन तर व्हावे, अशा प्रतिमांचा वापर इंदिराबाई कुशलतेने करतात. तसेच ‘माती’ हे त्यांचे आवडते प्रतीक असून ‘राधा’ व ‘मोर’ हे त्यांचे आवडते घटक आहेत. दृश्य, स्वाद, नाद यांच्या एकात्मतेचा अनुभव यांच्या प्रतिमा देतात.

लाल, जांभळ्या, निळा, काळा अशा रंगप्रतिमा हे यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. तर टिंबे, उद्गारवाचक चिन्हे, अपसारण चिन्हे व रिकाम्या जागा यांनाही इंदिराबाईंच्या कवितेत विशेष प्राधान्य आहे. शब्दप्रतिमा योजून इंदिराबाई त्यांच्या कवितेला बांध घालतात आणि त्या अनुभवाला मूर्त करतात. शाश्वत व सनातन असलेल्या सृष्टीतील प्रतिमांचा वापर त्या करतात आणि आशय-अभिव्यक्तीचा एक सुरम्य अविष्कार त्यांच्या कवितेतून सादर होतो.

कवितेव्यतिरिक्त इंदिराबाईंचे ‘शामली’ (१९५२), ‘कदली’ (१९५५) व ‘चैतू’ (१९५७) असे तीन कथासंग्रह, ‘मृद्गंध’ आणि ‘फुलवेल’ ही आत्मकथनपर ललितनिबंधांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. बालमनाची तरलता नेमक्या शब्दांत पकडून काही यशस्वी बालगीते त्यांनी लिहिलेली आहेत. ‘गवतफुला’, ‘मामाचा वाद’, ‘अंगतपंगत’ हे तीन बालसंग्रह आहेत. तसेच ‘मालनगाथा’ खंड १० – घुंगुरवाळा - लेखन संपादन आणि ‘ना.सी.फडके व्यक्ती आणि लेखक’ (प्रल्हाद वडेर यांच्या सहकार्याने) चे संपादन.

इंदिराबाईंच्या ‘शेला’-१९५१, मेंदी’-१९५५, ‘रंगबावरी’-१९६४ या संग्रहांना महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार लाभले आहेत. ‘गर्भरेशीम’ या काव्यसंग्रहाला सन्मानीय पुरस्कार १९८३ मध्ये मिळाला. १९९५ मधल्या जनस्थान पुरस्काराच्या (नाशिक १९९५) त्या मानकरी ठरल्या.

१९७८ मध्ये कुऱ्हाड येथे महाराष्ट्र राज्य कवयित्री संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. वयाच्या ८६ व्या वर्षी बेळगाव येथे त्यांचे निधन झाले.

- डॉ. सुलभा हेर्लेकर

सौजन्य : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश 

साहित्य खंड