अशी शिस्त पाहिजे

दिंनाक: 31 Jan 2018 15:20:59


31 डिसेंबरला आपल्याला एकत्र काय करता येईल, या विषयावर अपर्णा आणि तिच्या मैत्रिणींची चर्चा ऐन रंगात आली असताना खेळायला गेलेली अपर्णाची मुलगी सुरभी अचानक पळत घरात आली आणि गडबडीत, तिचा टीपॉयवरील ज्यूसच्या ग्लासला धक्का लागून सगळा ज्यूस वैशालीच्या नव्या कोर्‍या ड्रेसवर सांडला. अपर्णा तिची जवळची मैत्रीण असल्यामुळे राग आला, तरी वैशाली काहीच बोलू शकली नाही. अपर्णा पटकन उठून सारवासारव करण्यासाठी किचनमध्ये गेली.

इकडे सुरभी वैशाली मावशीची कशी फजिती झाली म्हणून फिदीफिदी हसत होती. ‘‘वैशाली मावशी, आता तू हा ड्रेस फेकून देणार का?’’ असा जखमेवर मीठ चोळणारा प्रश्न सुरभीने विचारातच अपर्णाला पुढच्या परिस्थितीचा अंदाज आला आणि तिने सुरभीला किचनमध्ये बोलावले. सुरभी तिच्या प्रश्नाने निर्माण झालेली अस्वस्थता व पायाचे चिखलाचे डाग मागे ठेवत किचनमध्ये गेली.

‘‘अगं, ही सुरभी आता पाच वर्षांची झाली, तरी किती बेशिस्त आहे. चिखलाने भरलेले पाय काय, आगाऊ बोलणे काय. आमचा अमेय असा नाही बाबा’’, वैशालीने तिचा राग बाहेर काढलाच.

‘‘बघ ना! एवढी मोठी झाली, अपर्णाने आता तिला शिस्त लावायला नको का?’’ सर्वांनी दुजोरा दिला.

तेवढ्यात अपर्णा आली, ‘‘सॉरी वैशाली, माझ्यामुळे तुला त्रास झाला.’’

‘‘अग त्यात काय एवढं, असं होतं कधी कधी’’, असे म्हणत तिने व इतर मैत्रिणींनी तिथून काढता पाय घेतला.

मात्र, जाता जाता मुलांना शिस्त लावणे कसे महत्त्वाचे आहे, याचा ओझरता उल्लेख करून अपर्णाला योग्य संदेश द्यायला त्या विसरल्या नाहीत. झाला प्रकार अपर्णाच्या चांगलाच जिव्हारी लागला. सुरभीच्या तथाकथित बेशिस्त वागण्यापेक्षा मला आता मैत्रिणी काय म्हणतील याची तिला जरा जास्तच चिंता लागली होती.

सुरभीला शिस्त हवीच हे तिला पटत होते, मात्र सुरभीचे बाबा सहा महिने बाहेरगावी असल्यामुळे, ती सुरभीच्या बाबतीत भलतीच हळवी झाली होती व कोणताच निर्णय घेऊ शकत नव्हती. मात्र, आज काहीतरी सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून सुनीलचे, म्हणजेच तिच्या मोठ्या भावाचे घर तिने गाठले.

झाला प्रसंग सुनीलच्या कानावर घालून, एक अनुभवी पालक म्हणून तुझ्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आल्याचे तिने सांगितले.

‘‘अच्छा! म्हणजे सुरभीचेपण एकदाचे शिस्त लावायचे वय झाले तर! पण सगळ्यात आधी, जी शिस्त तुला सुरभीला लावायची आहे, ती शिस्त म्हणजे नक्की काय हे तुला स्पष्ट असले पाहिजे बरं का!’’

‘‘त्यासाठी तर तुझ्याकडे आले आहे ना.’’

‘‘अपर्णा, शिस्त ही आईने किंवा शिक्षकाने मुलांना लावायची किंवा लादायची गोष्ट नाही, तर मुलांना सोबत घेऊन तयार केलेले नियम, वेळापत्रक एकत्र पाळणे आणि समाजात वावरताना आपली भूमिका समजून त्याप्रमाणे कसे वागायचे, हे मुलांना समजण्यासाठी मदत करणे म्हणजे शिस्त.’’

‘‘शिस्त ही नैसर्गिक प्रेरणा आहे. म्हणजे बघ, मी जिन्यातून काळजीपूर्वक चालण्याऐवजी उड्या मारत गेलो, तर साहजिकच, मी कधीतरी जिन्यातून पडतो, माझा पाय मोडतो आणि मग त्यातून जिन्यातून चालायची शिस्त मला आपोपाप लागते. स्वत:च्या चुकांतून शिकायची, त्यातून योग्य पर्याय निवडून त्याप्रमाणे वागण्याची संधी निसर्ग आपल्या प्रत्येकालाच देतो, फक्त ते प्रसंग ओळखून, सुरभीला तिच्या चुका समजणे व त्या पुन्हा होऊ नयेत, म्हणून तुम्ही दोघांनी मिळून काही नियम बनवणे, ही पहिली पायरी आहे असं समज.’’

‘‘सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, घरी पाहुणे आले किंवा तुम्ही कुठे बाहेर गेलात की कसं वागायचं, हे सुरभी तुमच्याकडे बघून शिकणार आहे. काय चूक आणि काय बरोबर हे तुम्ही तिला कृतीतून समजावून सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणी आल्यावर, तिने कसे वागावे, हे तिचे मित्रमैत्रिणी घरी आल्यावर तुम्ही कसे वागता यावर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा. ती ज्या परिसरात वाढते आहे, त्या परिसरातील प्रत्येक व्यक्तीच्या वागण्याचे, घडामोडींचे ती नकळत बारकाईने निरीक्षण करून तिची शिस्तीची व्याख्या ठरवते, त्यामुळे तिच्या आजूबाजूला असलेलं वातावरण आणि घडणारे प्रसंग व त्यातून तिचं होणारं आकलन, याविषयी सुरभीशी सतत संवाद करून, तिला योग्य आकलनासाठी मदत करणं म्हणजे शिस्त लावणं आहे. काय, लक्षात येतंय ना!’’

‘‘हो! आले ना. शिस्त म्हणजे सुरभीने व मी एकत्र येऊन नियम बनवणं व प्रत्येकाने ते पाळणं. मोठ्यांच्या कृतीतून मुलांच्या शिस्तीचा पाया घातला जातो, म्हणून सुरभीसमोर वागताना काळजी घेणं आणि तिला बक्षीस किंवा शिक्षा देऊन तात्पुरती शिस्त लावण्यापेक्षा, कोणत्याही प्रसंगात योग्य पर्याय निवडण्यासाठी तिला सक्षम करणं, ही माझी जबाबदारी आहे.’’

‘‘क्या बात है! अगदी बरोबर आणि तुला, सॉरी सॉरी तुला व सुरभीला माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी शिस्तबद्ध शुभेच्छा!!’’

आत्मविश्वासाचा क्रिएटिव्हिटीशी काय संबंध आहे? वाचा चेतन एरंडे यांच्या लेखात खालील लिंकवर 

आत्मविश्वासातून क्रिएटिव्हिटीकडे

 -चेतन एरंडे

[email protected]