२६ जानेवारी आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो आणि यावेळी आपल्या देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या, त्याग करणाऱ्या, प्रशंसनीय समाजकार्य करणाऱ्या थोर व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. 

पारतंत्र्यात कितीतरी देशभक्तांनी देशाला सर्वस्व अर्पण केले आणि जेव्हा त्यांना मरण दिसू लागले तेव्हा याच देशात पुन्हा जन्म घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. अशाच एका क्रांतिकारी देशभक्ताची  पुनर्जन्माची मनोमन इच्छा, नव्हे खात्रीच या कवितेत शब्दबद्ध केली आहे बंगाली कवी जीवनानंद दास यांनी ! 
नक्की वाचा आणि कळवा.
 
 
पुन्हा परतुन येईन मी या निळ्या नदीच्या तीरापाशी
माणूस होऊन येईन अथवा होईन मैना इवलीशी ।
 
कार्तिकाच्या नवान्न प्रहरी पहाटपक्षी- मी गाईन गान
तलम धुक्यावर स्वार होऊनि पानांवर मांडीन ठाण ।
 
घुंगुरबंधित रक्तिम पदरव, राजहंस मी होईन
अमृतभरल्या पाण्यामधुनि स्वानंदे विहरत राहीन ।
 
पहाल संध्यासमयी मजला आकाशातुन परतताना
अथवा गर्द राईमधुनि पिंगळ्यास ह्या हाकारताना ।
 
शेत, नदी अन पर्वतराजी, मायभूमी ही प्रिय मला 
गंगालहरी सजवि निर्मळ हिरवा आपुला रान- मळा ।
 
मायभूमीच्या जळी- स्थळी आणि पाषाणातही असेन मी
अफाट गर्दीमधुनिसुद्धा  सहजच तुम्हां भेटेन मी ।
 
-कवी जीवनानंद दास.
 स्वैर अनुवाद - स्वाती दाढे.