काही वर्षापूर्वीची गोष्ट. नागपूरच्या चिटणीस पार्कमध्ये एका स्वातंत्र्यवीराच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी दुसरा सेनाधुरंधर उपस्थित होता. उंच, धिप्पाड, नजरेत असणारी भेदकता, तितकीच  सहकाऱ्यांसाठी ओथंबून वाहणारी माया, असे ते प्रभावी व्यक्तिमत्त्व समोर उभे होते, वय झाले तरी विलक्षण चपळता होती. स्वभावात नम्रता व उच्चारात स्पष्टता होती. असा लढवय्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी चबुतऱ्यावर चढताच, वर लपून बसलेल्या एकाने थेट त्यांच्यासमोर उडी मारली व त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण एवढ्याशा गोष्टीने घाबरून जाणाऱ्यातला तो नव्हता. जराही विचलित न होता त्या व्यक्तीने शांत चित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

उद्घाटनाप्रसंगी तो योद्ध उद्गारला, "नागपूरकर बंधू – भगिनींनो एका महान योध्याच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मला बोलावून आपण माझा यथोचित असा सत्कार केला आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वोच्च सन्मान आहे असं समजतो. अनेक झुरळे, वादळे, माझ्या अंगावर मी झेलली. वादळांना तोंड द्यायला शिका." टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी उभे राहून त्या शूरवीराला सलाम केला. त्या व्यक्तिमत्वाचे नाव होते फिल्ड मार्शल सर बहाद्दूर माणकेशा.

बांग्लादेश मुक्ती संग्राम हे शब्द उच्चारतात डोळ्यांसमोर येतात सरसेनापती सॅम बहाद्दूर माणकेशा! आम्हा लष्करी अधिकाऱ्यांचा बाप माणूस... अमृतसरमध्ये हिराबाई – होरमुसजी फ्रेमजी यांच्या पोटी जन्माला आलेले. सॅम बहाद्दूर यांनी डॉक्टर व्हावे ही वडिलांची इच्छा. पण नैनितालमधील शेरवूड महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन डेहराडूनच्या मिलिटरी अॅकॅडमच्या पहिल्या बॅचला रेजिमेंटमध्ये १९३४ ला रुजू झाले.

दुसऱ्या महायुद्धात बर्मामध्ये रॉयल इंडियन आर्मीचे अधिकारी म्हणून त्यांनी केलेला पराक्रम पाहून तत्कालीन ४/१२ फ्रंटियर फोर्स रेजिमेंटचे मेजर जनरल डी.टी. कोवन या ब्रिटीश सेनापतीने स्वतःचा मिलिटरी क्रॉस जायबंदी माणकेशा यांच्या छातीवर चढवला व ते म्हणाले ‘He faught as a tiger.’

पॅगोडा हिल हे लक्ष्य (target) जिंकताना ते आपल्या कंपनीचे नेतृत्व करत होते. जपानी सैनिकांशी लढताना त्यांची आर्धी कंपनी धारातीर्थी पडली. ते स्वतः मूर्च्छित झाले. पण पॅगोडा हिल जिंकून दाखवले. त्यांच्या अतुलनीय अशा शौर्यामुळे ते प्रसिद्ध झाले. त्यांना ब्रिटीश गॅझेटमध्ये मिलिटरी क्रॉस रिबन जाहीर करून मेजर म्हणून पदोन्नती दिली. हा मिलिटरी क्रॉस सॅम बहाद्दूर मरेपर्यंत अभिमानाने आपल्या छातीवर मिरवत असत. सॅम बहाद्दूर हा पहिला भूदल सेनापती ज्यांना भारत सरकराने पद्मविभूषण हा नागरी सन्मान प्रदान केला.

नेपाळ सरकारने सॅम बहाद्दूर यांना त्यांच्या भूदल सैन्याचे Honorary General of Royal Nepal Army हा हुद्दा देऊन गौरविले. ४ एप्रिल १९१४ ला जन्मलेले माणेकशा २७ जून २००८ ला स्वर्गवासी झाले. १९३४ ते २००८ म्हणजे तब्बल ७४ वर्षे ते कार्यरत होते. कारण भूदल सैन्याला फिल्ड मार्शल हा मृत्यूपर्यंत निवृत्त होत नसतो, असा नियम आहे.

बांगलादेश युद्धातील त्यांची युद्ध नीती व नेतृत्त्व इतके अचूक होते की, हे युद्ध ४ डिसेंबरला सुरू होऊन १२ डिसेंबरलाच म्हणजे ८ दिवसांत संपले. दिनांक १२ डिसेंबर जनरल गंधर्व सिंह यांनी ढाक्याच्या सीमेवर धडक देऊन पाकिस्तानी जनरल अमीर अब्दुल नियाजी यांना निर्वाणीचा संदेश पाठवला, शरण या, अन्यथा हकनाक मराल.

या पराक्रमाला जोड होती ती सॅमच्या मार्गदर्शक नेतृत्त्वाची. हे युद्ध कमीत कमी वेळेत, दिवसांत जिंकणे आवश्यक आहे, कारण अमेरिकेचे सातवे आरमार पाकिस्तानला मदत करणार होते. तसे घडले असते तर तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला असता. कारण रशिया, तत्कालीन संघटित रशिया भारताच्या बाजूने उतरली असती. जागतिक शांतता धोक्यात आली असती.

त्या ऐन धामधुमीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनी सॅम बहाद्दूर यांना विचारले असता, सॅम बेधडकपणे म्हणाले, "मॅडम, माझे सहकारी व मुलांवर माझा विश्वास आहे. आपण हे युद्ध कमीतकमी दिवसात जिंकूच, तसे करू शकलो नाही, तर आम्ही मृत्यूला कवटाळू, आपण निर्धास्त असा." त्याप्रमाणे १६ डिसेंबरला पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली व आपण युद्ध जिंकले.

शरणागती पत्करून ९००० पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांना शस्त्रे खाली ठेवण्यास भाग पडणारे सॅम बहाद्दूर म्हणत, "मी मृत्यूला भीत नाही म्हणणारा माणूस एक तर खोटे बोलत असतो किंवा तो निश्चितपणे गुरखा सौनिक असतो." गुरखा रेजिमेंटवर त्यांचा इतका दुर्दम्य विश्वास होता.

सॅम बहाद्दूर जेव्हा पूर्व ध्वजाधिकारी (General Officer Commanding Eastern Command) होते. तेव्हा दहशतवादी संघटनांनी त्यांच्या हेलिकॉप्टरवर (चॉपर) बंदुकीच्या फैरी झाडल्या होत्या. तेव्हा न डगमगता सॅम बहाद्दूर पूर्व विभागाची पाहणी करत असत. अशा निरीक्षण दौऱ्यात दोनदा त्यांच्या हेलिकॉप्टरला बंदुकीच्या गोळ्या लागल्या होत्या, पण ते कधीच डगमगले नाहीत.

शेवटी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या होत्या, "sam, please stop this dare devil. don’t want to loose you." शरणागतीच्या सोहळ्याला ढाक्यात पराक्रमी सॅमबहाद्दूरने जावे, असे इंदिराजींना वाटत होते. तेव्हा सॅमने नम्रपणे त्यास नकार दिला होता.

या महान योद्धयाची म्हणावी तशी दखल आपण घेतली नाही. आजच्या  प्रजासत्ताकदिना निमित्ताने त्यांना नम्र अभिवादन.

कॅ.विनायक 

[email protected]