एका प्राथमिक शाळेत ‘चित्रकला स्पर्धेला’ परीक्षक म्हणून आमंत्रण आलं आणि ‘मुलं चित्रं काढतानासुद्धा मी हजर राहीन’ या अटीसहित मी होकार कळवला.

मुलं चित्र काढताना बघणं हेच मुळी एक सुंदर चित्र असतं. त्यांचे ते आनंदाने, उत्सुकतेने लुकलुकणारे डोळे, माना तिरक्या करून, जीभा बाहेर काढून चालणारं रंगकाम.. अक्षरश: अंतर्बाह्य रंगून जातात ती.

मी शाळेत गेले तेव्हा मनातल्या चित्रासारखंच चित्र होतं हॉलमध्ये. आयत्या वेळी विषय सांगितला गेला - ‘गणपती’ आणि ‘‘सोप्प’’, ‘‘वॉव’’ अशा उद्गारांबरोबर सर्वांच्या पेन्सिली बाहेर आल्या. मीपण एक कोपरा गाठला; हल्ली किती तर्‍हेतर्‍हेचं रंगकाम साहित्य मिळतं, याचं नवल करत...

निरीक्षण करताकरता माझी नजर खिडकीजवळच्या मुलाकडे गेली. पठ्ठ्याने अजून सुरुवातच केली नव्हती. विचारात बुडालेल्या चेहर्‍यावर मध्येच आठी, त्रासिक भाव... ‘काही अडचण आहे का?’, असं विचारावं म्हणून उठणार एवढ्यात त्याने पेन्सिल चालवायला सुरुवात केली. थोड्या वेळाने बर्‍याच मुलांची चुळबुळ सुरू झाली, तरी हा हिरो काही मान वर करत नव्हता, रंगून गेला होता अगदी.

वेळ संपायच्या आधी पंधरा मिनिटं राहावेना म्हणून मी हळूच त्याच्या मागे गेले.. मला त्याच्या कागदावर गणपतीच दिसेना. मी सटपटलेच... नीट चित्र पाहायला लागले आणि थक्कच झाले. काय नव्हतं त्या चित्रात?

मोरांची कटआउट्स लावलेला ट्रक, रंगीबेरंगी लाईट्सच्या माळा, पताका, त्याच्यापुढे दोन मोठ्ठे काळे बॉक्स.. लगेच कळलं, ही साऊंड सिस्टिम! गॉगल लावून नाचणारी मुलं, ढोल वाजवणारी माणसं, वेण्या उडवत फुगड्या खेळणार्‍या बायका... अहाहा! जेवढं मी ते चित्रवाचन करायला लागले, तेवढा मला अजून तपशील दिसू लागला. पण त्या चित्रमध्यात ‘उत्सवमूर्तीचा’ पत्ताच नव्हता! आपोआप माझी नजर आजूबाजूला फिरायला लागली. चित्रकाराने तिथे तर माणसांचा समुद्रच काढला होता. खाऊगाड्या, फुगे, खेळणीवाला चक्क पोलीससुद्धा... नुसती डोकी दाखवून पुरुष, बायका, मुलगे-मुली आणि या सगळ्या गर्दीवर गुलाबी ढग? मी विचारात पडले, मुले तर एरवी निळे ढग काढतात. एवढ्यात लक्षात आलं ‘हा उधळलेला गुलाल तर नव्हे?’

कौतुकाने मी त्याच्याकडे पाहिलं, तर महाराज कागदाचा शेवटचा कोपरा भरत होते. एक कुटुंब-पाठमोरं, पदर व वेणीवाली आई, शर्ट-पॅन्टवाले बाबा आणि त्यांच्या डोक्यावर अजून एक डोकं? बाबांनी हात वर केल्यावर कळलं. त्यांनी कोण्या छोट्याला खांद्यावर घेतलंय. मनातच मी त्याला शाबासकी दिली. ‘‘वा रे! मज्जेत वर बसवलंय की स्वत:ला’’ पण नाही... हे सगळं रंगवल्यावर त्याने आईच्या शेजारी हाताला एक मुलगा काढला.. नुसताच.. न रंगवता, त्याचा उदासपणा जणू जाणवत होता आणि त्याच्या डोक्यावर एक ‘विचार ढग’ आणि मग त्या ढगात एक छोटाऽसा गणपती काढला!

अचानक डोक्यात कोणी फटकन मारल्यासारखं झालं. वाटलं, खरंच आपण मोठी लोकं ‘गणपती पाहायला’ मुलांना गर्दीत लोंबकळत नेतो. हवा, ध्वनी आणि दृश्यप्रदूषण सोसायला लावतो. त्या गोंधळात ‘गणपतीबाप्पा’ नीट दिसतो का त्यांना?

त्या मुलामध्ये, त्याच्या चित्रामध्ये ‘समाजघातक प्रवृत्तींवर’ ताशेरे झोडण्याचा आविर्भाव नक्कीच नव्हता. पण, त्याच्या वयानुरूप त्याला बोचणारे शल्य त्याने नक्की समर्थपणे चितारले होते.. मग मोठ्यांनी त्यातून संदेश घ्यावा अगर घेऊ नये. ‘मुलांच्या मनोव्यापाराच्या अभिव्यक्तीचे उत्तम साधन म्हणजे चित्रकला’, या न्यायाने त्या मुलाचे चित्र मला अतिशय भावले, नव्हे खरं तर त्या चित्रकारासकट चित्राने माझ्या मनात कायमचे घर केले.

शिवानी जोशी 

[email protected]