रॉक गार्डन

दिंनाक: 22 Jan 2018 17:50:47


अथांग समुद्र नजरेत सामावण्याचा प्रयत्न करत काळ्याशार खडकांवर समुद्रलाटांचा वर्षाव अंगावर झेलत त्या सागरातून आकाशाला स्वत:चे रंग बहाल करत सायंकाळी सामावून जाणारा सूर्यास्त पाहायचा असेल तर मालवणातील निसर्गप्रेमींकडे रॉक गार्डनशिवाय दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही. समुद्र, खडक, वाळू, लाटा, सूर्य या नैसर्गिक गोष्टींची भुरळ नैसर्गिकच आहे पण या बागेची स्वत:ची अशी वेगळी खासियत आहे. त्याबद्दलचं कुतूहल सगळ्यानाच असतं, ते आमच्या प्रशालेतील कुमारवयीन मुलांना असतं, तसंच प्रौढ वयातील आम्हा शिक्षकांनाही असतं. ते शमवण्यासाठी आम्ही आमच्या शाळेतील आठवीच्या वर्गासह रॉक गार्डनला भेट दिली व त्या विद्यार्थ्यांनी रॉक गार्डनमधील आवेक्षक उमेश हडीकर यांना प्रश्‍न विचारत कुतूहल काही प्रमाणात शमवण्याचा प्रयत्न केला. हडीकर यांनीही अत्यंत उत्साहाने आणि आपुलकीने माहिती देत संभाषणात गोडी आणली.

प्रश्न : रॉक गार्डनची स्थापना कोणाच्या कल्पनेतून आणि किती साली साकारली?

उत्तर : रॉक गार्डनची कल्पना मालवण नगरपरिषदेला सुचली. ४ जुलै २००४ रोजी भूमिपूजन करत त्यांनी कामाला सुरुवात केली आणि मार्च २००५ मध्ये प्रत्यक्षात सुरुवात झाली.

प्रश्न : तुम्ही या बागेत कोणत्या प्रकारचे काम करता?

उत्तर : मी इथे बागेची पूर्णपणे निगा राखण्याचे काम करतो. त्यामध्ये नवीन झाडे लावणे, रोपे तयार करणे, झाडांना खत घालणे, झाडांना रोजच्यारोज पाणी देणे, तण काढणे, झाडांची कापणी करणे अशा वेगवेगळ्या कामांचा समावेश होतो.

प्रश्न :  त्यासाठी तुम्ही कोणते शिक्षण घेतले होते?

उत्तर : सुरुवातीला यासाठी मी कोणतंही शिक्षण घेतलं नव्हतं. खरं तर मी पूर्वी गॅरेजमध्ये काम करायचो, पण लहानपणापासून मला झाडांची आवड होती त्यामुळे मी संधीच्या शोधात होतो. इथे रॉक गार्डनचं काम सुरू झाल्यावर मी इथले ठेकेदार विजय कुडतरकर यांना येऊन भेटलो व त्यांच्यासोबत कामाला सुरुवात केली. कुडतरकर हे माझे खूप मोठे गुरू आहेत, त्यांच्या अनुभवाच्या बोलातून मी खूप काही शिकलो.

प्रश्न : हे अनुभव म्हणजे?

उत्तर : कुडतरकर हे प्रभादेवी मुंबई येथील रहिवासी आहेत. त्यांची खासियत म्हणजे ते समुद्रकिनारी बगीचा तयार करण्यात तज्ज्ञ आहेत. समुद्रकिनारी असणारा खारा वारा आणि क्षारयुक्त जमीन व पाणी अशा परिस्थितीत बाग कशी साकारावी यावर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे या बागेच्या पूर्ण रचनेचे श्रेय विजय कुडतरकर यांना जाते. त्यांच्याकडून याबाबतचे ज्ञान मिळविल्यानंतर मी अधिक ज्ञान मिळविण्यासाठी कणकवली येथे मिटकॉनतर्फे चालविला जाणारा अ‍ॅग्रिकल्चरचा अभ्यासक्रम पूर्ण  केला.

म्हणजेच माझा व्यवसाय हा कौशल्य विकासावर आधारित आहे. इथे नोकरी सुरू केल्यावर माझ्या अंगभूत कौशल्याचा विकास झाला.

प्रश्न : आम्ही gardening requires a lot of water most of it in the form of perspiration असं अनेकदा वाचलं आहे त्याबाबत तुम्ही काय सांगाल?

उत्तर : हो, हे खरंच आहे. ही नोकरी म्हणजे माझ्यासाठी विशिष्ट कामाचे तास असणारी चाकोरीबद्ध नोकरी नाही तर इथे मी दहा, बारा ते सोळा तासापर्यंत सलग काम करतो. कारण हा माझा छंद आहे.

प्रश्न : इथे असणारी झाडे मालवण परिसरातीलच आहेत  की  बाहेरून मागवली आहेत?

उत्तर : ही झाडे इथली नाहीत ती दमणवरून मागवली आहेत. ही जी झाडे आहेत त्यांची खासियत अशी की ही सर्व झाडे समुद्रकिनारी वाढणारी आहेत. परिसरातील मोजकी झाडं आहेत ज्यांची आम्ही २०१४ नंतर कलमे तयार करून लावलीत, पण बहुतांशी झाडे दमणहून आणलेली आहेत. त्यांचीही आम्ही कलमे / रोपे करतो व नवीन लागवड करतो.

प्रश्न : या बागेला दररोज किती लीटर पाणी लागतं?

उत्तर : झाडांचे दोन प्रकार प्रखर सूर्यप्रकाशात वाढणारी झाडे आणि सावलीत वाढणारी झाडे. इथे प्रखर सूर्यप्रकाशात वाढणारीच झाडे आहेत कारण ही बाग समुद्रकिनारी असणाऱ्या खडकाळ भागावर माती पसरून तयार केलेली आहे. खरं तर पूर्वी इथे पूर्णपणे खडकाळ भाग होता, त्यावर दीड हजार डंपर माती पसरून हे गार्डन तयार केलं आहे. एक डंपर साधारणत: अडीच ब्रासचा असायचा तेव्हाची ही गोष्ट. आज साधारणपणे सहा ते साडेसहा ब्रासचा डंपर असतो.

ही झाडे एक फुटाचा मातीचा थर ते तीन ते साडेतीन फुटाचा मातीचा थर अशा वेगवेगळया उंचीच्या मातीच्या थरावर लावलेली आहेत, त्यामुळे यांची पाण्याची गरज वेगवेगळी आहे. साधारणत: दररोजची एक लाख लीटरची गरज आहे, पण ठिबक सिंचन व तुषार सिंचनाद्वारे ती आम्ही चाळीस हजार लीटरमध्ये भागवतो. तसंच संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान व गर्दी असेल तर रात्री दहानंतर पाणी देतो. मार्च एप्रिलमध्ये दिवसाला दहा हजार लीटर आणि त्यानंतर चार पाच दिवसांनी पाणी देतो, जे झाडंं जगवण्यासाठी उपयोगी असतं. मार्चपासून पाणी कमी देत असल्याने आम्ही झाडांना खत देत नाही.

प्रश्न : या झाडांना देण्यात येणारी खते आणि कीटकनाशके याबाबत काय सांगाल?

उत्तर : यासाठी आम्ही सेंद्रीय खत वापरतो ते आम्ही इथेच तयार करतो आणि ते ओला पालापाचोळा कुजवून तयार न करता सुकलेल्या पालापाचोळ्यावर माती पसरून तयार करतो. सेंद्रीय खताच्या जोडीला रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरावीच लागतात, पण ती वापरताना ठरवून दिलेल्या प्रमाणातच वापरण्याची खबरदारी आम्ही घेतो.

प्रश्न : सुकलेल्या पालापाचोळ्यापासूनच केलेलं खत का वापरता?

उत्तर : जर ओला पालापाचोळा खतासाठी वापरला तर त्यामुळे झाडांच्या मुळात फंगस निर्माण होतो, तो वाढून मुळे कुजतात त्याचबरोबर  मातीतली वाळवी वाढते व झाडे मरतात म्हणून आम्ही बागेतच सुकलेल्या पालापाचोळ्यापासून खत निर्माण करतो व तेच झाडांसाठी वापरतो. त्याचबरोबर युरियासारखी रासायनिक खतेही त्यांच्या योग्य वाढीसाठी वापरतो.

प्रश्न : इथल्या झाडांबाबतची माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकाल का?

उत्तर : त्यांनी झाडे दाखवत काही नावे सांगितली तगर, ख्रिसमस ट्री, आरेका पाम, सायकस, बदाम आणि समुद्री फळ, समुद्रीफळाच्या फुलाला स्पर्श करत त्या स्पर्शाचा अनोखा आनंद आम्ही सर्वानी लुटला.

प्रश्न : झाडांचं काही वैशिष्ट सांगाल का?

उत्तर : काही झाडांना एकटं वाढायला आवडतं तर काही झाडांना सोबत लागतेच. उदाहरणार्थ, चंदनाचं झाड. चंदनाचं झाड वाढताना त्याला दुसऱ्या झाडाची सोबत लागते. म्हणून चंदनाबरोबर बांबूसारखं सहज कापता येणारं झाड लावतात व काही वर्षांनी चंदन वाढला की बांबू तोडून टाकतात.

 

दरम्यान त्यांनी स्प्रिंकलर, वेगवेगळ्या कात्र्या, खुरपी, कुऱ्हाड, मंगेरा इ. बागकामासाठीची अवजारे दाखवत त्यांची जुजवी माहिती दिली.

प्रश्न : तुम्हाला एवढी सगळी माहिती आहे ती तुम्ही कशी मिळवता? गुगल वगैरे वापरता का?

उत्तर : मी गुगल किंवा सोशल नेटवर्किंग साइटस् यासाठी वापरत नाही, पण पुस्तकांचा खूप वापर करतो. जर मला काही शंका किंवा अडचण आली तर पाट हायस्कूलचे प्राचार्य परब सर यांची मदत घेतो.

प्रश्न : मालवणात सर्रास आढळणारी माड-पोफळी  इथे का नाहीत?

उत्तर : खरं तर पूर्वी इथे माडांची लागवड केलेली होती पण वीज पडून ती सर्व नामशेष झाली. तसंच पामच्या झाडाला रोटा लागून त्याचे नुकसान झाले असे नुकसान झाले की आम्हाला खूप दु:ख होते.

प्रश्न : तुम्ही तुमची विशेषता काय सांगाल?

उत्तर : मी रॉक गार्डनच्या सुरुवातीला इथे काम करत होतो, पण नंतर काही काळ नोकरी सोडली होती. मी परत २०१४ मध्ये रूजू झालो त्यानंतर बॉर्डरला प्लांटेशन केलं त्याचबरोबर मालवण नगरपरिषदेने लावलेले लॅम्प्स कव्हरिंग करण्यासाठी झाडांची लागवड केली.

प्रश्न : झाडांना मानसिकता असते का?

उत्तर : मला वाटतं असते, कारण सतत ओलांडली जाणारी झाडं वाढत नाहीत त्याबरोबर एखादे लांबचे किंवा कोपऱ्यातले दुर्लक्षित झाडही अपेक्षेप्रमाणे वाढते किंवा फळे देत नाही.

प्रश्न : आपल्या आगामी योजना काय आहेत?

उत्तर : बागेच्या प्रवेशद्वाराजवळ कारंजे करणे, बागेत असणाऱ्या छोटया तलावात बोटींग सुरू करणे आणि स्टील फ्रेम वापरून झाडांना वेगवेगळे आकार देणे यांसारख्या काही योजना मालवण नगरपरिषदेमार्फत हाती घेतल्या जातील.

प्रश्न : इथे भेट देणाऱ्या सर्वांना तुम्ही कोणता सल्ला द्याल?

उत्तर : प्रवेशद्वारावर लावलेली नियमावली वाचावी व त्याचे पालन करावे. बागेत फिरताना झाडे ओलांडू किंवा त्यामधून चालू नये. लॉनवर बसून कोणताही तेलकट पदार्थ खावू नये कारण तसे केल्यास पुढच्या अर्ध्या तासात त्या ठिकाणचे गवत पिवळे पडून कोमेजते. झाडे ही आपल्यासारखीच सजीव आहेत त्यामुळे उगाचच त्यांना त्रास देऊ नये. लोकांना बसल्याबसल्या लॉन उपटायची, चालता चालता झाडांच्या फांदया किंवा फुलं तोडायची, झाडे ओलांडायची किंवा झाडांमधून त्यांना तुडवत चालण्याची खोड असते. त्या सर्व गोष्टी टाळून हा सामाजिक ठेवा संर्वर्धित करण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी ही नम्र विनंती आहे.

 

- सहभागी विद्यार्थी -  इ. ८ वी

                 जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूल, मालवण

शिक्षक सहभाग व शब्दांकन - 

मेघना सं. जोशी.

 राजश्री अ. सावंत

 उज्ज्वला भा. चौकेकर.

 [email protected]