जास्वंद

दिंनाक: 21 Jan 2018 14:40:15


जास्वंदीचे वनस्पतीशास्त्रीय नाव हिबीस्कस रोझा सायानेन्सीस असे आहे. तिचा समावेश कापूस, भेंडीच्या कुळात होतो. आजूबाजूला परिसरात पटकन लाल जास्वंद दिसते पण याचे पांढरे, निळे फूल असेही प्रकार दिसतात. जगभरात याच्या प्रजाती खूप आहेत. जवळजवळ दोनशेच्या पुढेच. जास्वंदीला जपा, जासूद, रुद्रपुष्प वगैरे विविध नावाने संबोधले जाते. ही समशीतोष्ण वनस्पती असून ती झुडूप प्रकारात मोजली जाते. याची पाने थोडी मोठी, कडेला कातरलेली असतात. काळ्या लांब पानांच्या टोकाला येतात. पाने समोरासमोर, भारतातही धार्मिकदृष्ट्या ही महत्त्वाची, सपुष्प वनस्पती आहे. पण ती वनात येत नाही.

गणपतीच्या पूजेत त्याचे आवडते फूल - लाल जास्वंद याला विशेष महत्त्व आहे. तसेच बंगालमध्ये देवीच्या पूजेसाठी जास्वंदीची फुले आवर्जून वापरली जातात. जगभरातही या फुलाला महत्त्व आहे. मलेशिया, कोरिया या देशांचे राष्ट्रीय फूल म्हणून ओळखले जाते. भारतासह इजिप्त, इराण, नायजेरिया या देशांमधील पारंपरिक वैद्यकशास्त्रात या फुलांचा अनेक औषधांमध्ये उपयोग करण्यात येतो. हिचा मूळ देश चीन समजतात. काही जाती लाकडासाठी प्रसिद्ध आहेत. तर काही देशांमध्ये सालींपासून मिळणारे तंतू वस्तूनिर्मितीसाठी वापरतात.

मेक्सिकन वाळलेल्या फुलांचा उपयोग सरबते, चहा यांमध्येही करतात. हे सरबत तापात व मूत्रविकारात उपयोगी असते. पाकळ्यांचा रस लिटमस पेपरचे काम करतो. याच्या पानाच्या लेपाने सुजलेला भाग मऊ होऊन वेदना कमी होतात. ताजी फुले वाटून केसांना चोळल्याने त्यांचा रंग सुधारून वाढ चांगली होते. फुलांपासून तेलही करतात. याचे फूल एकाच वेळी हृदय व मेंदूला बळ देते. याच्या फुलांचाही गुलाबासारखा केलेला गुळकंद बाजारात मोठ्या प्रमाणात विकला जातो.

ही सपुष्प वनस्पती मानव जातीच्या कोट्यवधी वर्षे आधी उत्क्रांत झाली आहे. आयुर्वेदात मूळ, पाने, साल व फुलांचे अनेक उपयोग सांगितले आहेत. कडू-गोड रसाची ही पित्तनाशक वनस्पती आहे. मुळांना धक्का लावू नये, जमिनीवर पडलेली फुले गोळा करावी असे महाभारतात विदुर म्हणतात. आजही कित्येक देवरायांमध्ये (उदा., कोल्हापूर वैगरे) देवाला वाहण्यासाठी सुद्धा झाडावरची फुले न तोडता जमिनीवरचीच फुले गोळा करतात.

- मीनल पटवर्धन

[email protected]