बार्बेक्यू हा शब्द हल्लीच्या काळात ऐकला नाही अशी युवा पिढीतील एकही व्यक्ती सापडणार नाही. मोकळ्या जागी शेकोटी पेटवून त्यावर किंवा रसरसत्या कोळशांवर जेवण भाजणे हा खरं तर बार्बेक्यूचा अर्थ. आता तर घरातल्या घरात बार्बेक्यू करता यावे यासाठी ग्रीलही बाजारात उपलब्ध झाले आहेत. खरं हा प्रकार परदेशी. मात्र अस्सल भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे अशा देशी बार्बेक्यू पार्ट्या होत असतात याची तुम्हाला कितपत माहिती आहे? चला तर या पार्ट्यांची ओळख करून घेऊ या. 
 
जानेवारी महिन्यात अशा देशी बार्बेक्यूची सुरूवात होते. खानदेश आणि त्यातही जळगाव भागात या काळात शेतावर जाऊन केलेली भरीत-भाकरीची अस्सल देशी पार्टी म्हणजे खवय्यांना मेजवानी असते. बामणोद, रावेर येथील पांढरी-हिरवी वांगी भरीत बनवण्यासाठी वापरली जातात. याची चव आणि फारशा बिया नसणं ही या वांंग्यांची खासियत आहे. साधारणपणे २० ते २५ किलो वांगी (पट्टीच्या खवय्यांनुसार संख्या कमी जास्त होते) काट्याने सगळीकडून टोचून तेल लावून कापसाच्या काटक्यांवर खरपूस भाजली जातात. ही वांगी भाजताना त्यांना तेल सुटते. हे तेलही भरीत करताना चवीसाठी महत्त्वाचे असते. याच जाळावर हिरव्या मिरच्याही भाजल्या जातात. वांगी सोलून तो गर बडजी म्हणजे लाकडी खलबत्त्यात हिरव्या मिरच्यांसोबत एकजीव केला जातो. नंतर तेल गरम करून त्यात शेंगदाणे, ठेचलेला लसूण, आलं, कांद्याची पात आणि एकजीव केलेला वांग्याचा गर मिठासह घालून एक वाफ आणली जाते. हे भरीतही चुलीवरच केले जाते. या भरीताबरोबर असते कळणाची भाकरी. कळण म्हणजे ज्वारी आणि उडीद यांचे मिश्रण. अशी चुलीवरची भाकरी, गरमगरम भरीत, घट्ट दही किंवा कांदा टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर, कोवळ्या मुळ्याच्या चकत्या केळीच्या पानावर जेव्हा वाढले जातात तेव्हा खाणाऱ्यांची ब्रम्हानंदी टाळी लागते. फक्त हे भरीत झणझणीत असायला हवे; पण ते किती तर पहिला खास खाल्ल्याबरोबर टाळूवर घाम फुटला पाहिजे असं खवय्ये मानतात. 
 
खानदेशात भरीत भाकरी तर पश्चिम महाराष्ट्र आणि देशावर हुरडा पार्टी प्रसिद्ध आहे. या मोसमात शेतात लावलेल्या ज्वारीच्या कणसांमधील दाणे हिरवट, कोवळे असतात. ही कणसं गोवऱ्यांवर भाजली तर त्यांचा स्वाद आणखी वाढतो. म्हणूनच डिसेंबर जानेवारीमध्ये ज्वारीच्या शेतांवर हुरडा पार्टीचे आयोजन केले जाते. शेतामध्ये एक छोटा खड्डा खणून त्यात गोवऱ्या, पालापाचोळा घालून ते छान पेटवले जाते. या रसरसलेल्या आगीवर मग ज्वारीची कोवळी कणसे भाजली जातात. भाजून झाल्यावर गरम असतानाच त्याचे दाणे काढायचे. हे दाणे म्हणजे हुरडा. शेंगदाणा चटणी, गूळ किंवा खास यासाठी तयार केलेल्या चटण्यांसोबत हुरडा खाल्ला जातो. सोबत असतात गावरान बोरं, ताजे हरभरे, भुईमुगाच्या शेंगा, रेवड्या आणि शेतातला ताजा ऊस. शेवट करायचा तो घट्ट दह्याने किंवा मठ्ठ्याने. अहाहा... काय वाचूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही? 
 
तिसरा अस्सल देशी बार्बेक्यूचा प्रकार म्हणजे कोकण पट्ट्यात होणारा पोपटी हा प्रकार. पहिले दोन प्रकार दिवसाच्या पार्टीसाठी तर पोपटी रात्रीच्या मेजवानीसाठी. नावावरून नेमका प्रकार काय हे समजायला जरा अवघडच आहे. गुजराती उंधियोच्या जवळ जाणारा पण तेल आणि पाणी यांचा अजिबात वापर न करता हा पदार्थ करतात. थंडीच्या दिवसात येणाऱ्या विविध शेंगा, वांगी, छोटे बटाटे, रताळ्याचे तुकडे, कच्ची केळी, नवलकोल या भाज्या स्वच्छ धुवून चिरा पाडून तयार केल्या जातात. मिरची, कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण एकत्र करून केलेलं जाडसर वाटण, मीठ आणि ओवा या भाज्यांना चोळले जाते. वाटण राहिलंच तर चिरा पाडलेल्या भाज्यांमध्ये भरलं जातं. नंतर भांबुर्डे वनस्पतीचा पाला मातीच्या मडक्यात तळाला पसरवला जातो. त्यावर भाज्यांचे थर जाणकारांच्या मदतीने लावले जातात. सर्वात वर परत भांबुर्ड्याचा पाला घालून मडक्याचे तोंड बंद केले जाते. शेतातल्या जमिनीत खड्डा करून त्यात पालापाचोळा, पेंढा टाकून त्यावर भाज्या भरलेले मडके उलटे म्हणजे तोंडाचा भाग खड्ड्यात ठेवून भोवती वाळलेली लाकडे, पालापाचोळा किंवा गोवऱ्या रचून ते पेटवले जाते. साधारणपणे अर्धा पाऊण तास ही शिजण्याची प्रक्रिया सुरू असते. जाणकार व्यक्तीला पोपटी शिजल्याचे वासावरून समजते. त्यानंतर आग बाजूला सारून जाड फडक्याने हे मडके बाहेर काढले जाते. वरचा पाला काढून आतील शिजलेल्या भाज्या मोठ्या परातीत किंवा पेपरवर काढून सगळ्यांना वाटण्यात येतात. रात्रीच्या थंडीत शेकोटीजवळ बसून अशी पोपटी खाण्यात जी मजा आहे ती एकदा अनुभवण्यासारखी आहे. या भाज्यांना किंवा पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा, मातीचा एक भाजका विशिष्ट वास आणि चव असते. 
 
हल्ली या पार्ट्यांचेही व्यावसायिक आयोजन केले जाते. एक दिवसीय सहलींचे या पार्टीबरोबर बुकींग करता येते. एक वेगळा अनुभव घेण्यासाठी आणि देशी बार्बेक्यूची चव बघण्यासाठी तरी या सहलींना जाण्याचे यंदा नक्की कराच. 
 
आराधना जोशी