अंधकारमय हिंदुस्थानला प्रकाशमय करण्यासाठी अविरत तळपत राहणाऱ्या एका तेजोगोलाची आवश्यकता होती. जणू त्यासाठीच मकर संक्रांतीला समाजाला नवे परिणाम देणारा प्रज्ञासूर्य अवतरला. पौष वद्य सप्तमी, शके १७८४ म्हणजेच १२ जानेवारी १८६३ च्या शुभदिवशी पिता विश्वनाथ दत्त व अत्यंत धार्मिक अशा माता भुवनेश्वरीदेवी यांच्या पोटी नरेंद्र (वीरेश्वर)चा जन्म झाला.

पुढे नरेंद्राचा आध्यात्मिक झंझावात - श्रीरामकृष्ण परमहंस यांच्याशी संपर्क आला व एक गुरुशिष्याची नवीन जोडी जन्माला आली. मात्र गंमत म्हणजे या दोघांची भेट प्राध्यापक हेस्टी यांच्यामुळे झाली. प्रा. हेस्टी वर्गात वर्डसवर्थ यांची ‘एक्सकर्शन’ नावाची कविता शिकवत होते. नरेंद्रची भावस्थिती पाहता त्यांनी नरेंद्रला श्रीरामकृष्णांची भेट घ्यावयास सांगितले. मतितार्थ एवढाच की, या दोघांची ओळख करून दिली एका ख्रिश्चन  प्राध्यापकाने व त्याला वेदातील ऋच्यांकडे घेऊन गेली वर्डसवर्थ यांची कविता! अविश्वसनीय योगायोग!

श्रीरामकृष्ण वेळोवेळी आपल्या लाडक्या शिष्याला वारंवार जाणीव करून देत होते की, कौटुंबिक, सांसारिक पाशांपेक्षा त्याचा मार्ग वेगळा आहे. गुरूंच्या महानिर्वाणानंतर त्याला त्याच्या जीवित कार्याची जाणीव झाली. शांतपणे विचार केला व सर्व पाश तोडून त्याने गुरुआज्ञेनुसार संन्यास घेतला. स्वामी विवेकानंदांनी तीन वर्षांच्या काळात आसेतू हिमाचल आणि आसिंधू - सिंधूपर्यंत सर्वत्र भाषा, प्रांत, पंथ, जात, धर्म ही बंधने झुगारून देऊन मुक्तपणे पायी भटकंती केली. भारत भ्रमणाच्यावेळी जात व धर्माची भिंत उभी राहिल्यावर ते म्हणाले, ‘तू हिंदू, मी मुसलमान असे ना कुराणाने सांगितले ना वेदांनी! आपण सारेजण एक आहोत.’

त्याच काळात खेत्री नरेश व स्वामी यांच्यात मैत्री झाली. वेदांतावर त्यांची चर्चा होई. स्वामींनी राजाला सल्ला दिला की, प्रथम प्रजेला शिक्षित कर, प्रजेचे व तुझे सर्व प्रश्न मिटतील. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र या शास्त्रांचा परिचय करून दिला. एवढेच नव्हे तर, गच्चीवर दुर्बीण बसवून ताऱ्यांचे निरीक्षण करायला शिकवले. राजवाड्यात प्रयोगशाळा तयार करवून घेतली. शिक्षण कृतीशील, आनंदी उपजीविकेला हातभार लावणारे असावे असे त्यांचे मत होते. यावरून स्वामीजी उत्तम शिक्षणतज्ज्ञ ठरावेत!

राजा महाराजांचे महाल सोडताना देऊ केलेल्या पैशाची भुरळ या संन्याशाला पडली नाही. मात्र राजस्थानामधील दारिद्य्र पाहून ते अत्यंत अस्वस्थ झाले. त्यांचे स्वप्न होते प्रत्येक खेड्यामध्ये संन्यासी असेल जो लोकांना विज्ञान व धर्म शिकवेल. जीवनोपयोगी शिक्षण देईल. प्रत्येकाला आळस झाडून काम करण्यास प्रवृत्त करेल, खेड्यांकडे चला, खेड्यांचा विकास करा हीच भूमिका स्वामीजींची यातून प्रतीत होताना दिसते.

दरम्यान १८९३ ला कोलंबस अमेरिकेत उतरण्याला ४०० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभर आनंदोत्सव सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून शिकागो येथे संगीत, अर्थशास्त्र, राजकारण, महिलांचे प्रश्न अशा २१ विविध परिषदा भरवण्यात येणार होत्या. मात्र धर्म विषय वगळून! म्हणूनच हे लक्षात येताच सर्वधर्म परिषदेचा आग्रह चालर्स करोल बॉनी यांनी प्रथम केला. त्यांच्या एकाकी व अविरत लढ्याने धार्मिक परिसंवादाची उपयुक्तता आयोजकांना पटली. या परिषदेत आपापल्या धर्माची वैशिष्ट्ये विशद करणे, श्रम, संपत्ती, दारिद्य्र, शिक्षण, व्यसनमुक्ती या समस्यांचे निराकरण करण्यासाठी धर्म काय सुचवतो, जगात शांतता नांदावी यासाठी सर्व राष्ट्रांना बंधुभावाच्या पातळीवर आणण्यासाठी सर्व धर्म काय करू शकतील याचे मार्गदर्शन करणे अपेक्षित होते. त्या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली.

त्या परिषदेला स्वामीजी शिकागो येथे उपस्थित राहिले. व्याख्यानाची सुरुवात सहा शब्दांनी झाली. ‘My brothers and sisters of America‘ श्रोत्यांच्या शरीरभर वीज संचारली. कोणत्याही प्रकारची भाषणाची तयारी नसताना सुरुवातीलाच त्यांनी परिषद जिंकली. हिंदू धर्माची पताका सातासमुद्रापार फडकवली. अर्थातच त्यांच्याभोवती एक अद्भुततेच वलय निर्माण झाले!

विवेकानंदांची ग्रंथसंपदा हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. रशियन विचारवंत टॉलस्टॉय याने विवेकानंदांचे राजयोगावरील पुस्तक वाचल्यावर आधुनिक भारतातील श्रेष्ठ तत्त्वज्ञ म्हणून त्यांचा गौरव केला. एवढ्यावर न थांबता सॉक्रेटीस, प्लेटो या प्राचीन तर काष्ट आणि शॉपेनहौर या आधुनिक तत्त्वज्ञाबरोबर स्वामीजींची तुलना केली. यावरून त्यांच्या लिखाणाची ताकद आपल्याला कळते.

भारतीयांची बुद्धी विलक्षण व अतुलनीय आहे हे स्वामींनी पूर्वीच ओळखले होते. म्हणूनच यंत्रयुग व संगणक क्रांती झाल्यावर आमच्या उच्चशिक्षित तरुणांना परदेशात किती मागणी आहे, हे आपल्याला आजही पटते. पर्यावरणाचे संतुलन मानवामुळे बिघडते हे कटूसत्य त्यांनी आग्रहीपणे मांडले. मनुष्यांची संख्या वाढत आहे, त्याच वेळी पशुंची संख्या घटत आहे. मनुष्य त्यांना मारून त्यांची जमीन, खाद्य, हक्क हिरावून घेतो असे त्यांचे स्पष्ट मत होते.

स्वामीजींचा द्रष्टेपणा काळाच्या कितीतरी पुढे होता हे आपल्याला मान्य करावे लागेल. म्हणूनच स्वामीजींच्या जीवन-चारित्र्याचा अभ्यास प्रसार व्हायला हवा. त्यांची विचारधारा, धर्मावरील निष्ठा, धर्मविषयक विचार, देशप्रेम, शिक्षणविषयक विचार, स्त्रियांचा आदर, तरुणांवरील विश्वास, ध्यानयोग... या सगळ्याला, या विचारांना कोटी कोटी प्रणाम!

- युगंधरा पाटील

[email protected]