मकरसंक्रांत

दिंनाक: 14 Jan 2018 12:50:49


भारतीय संस्कृतीमध्ये सणांचे महत्त्व खूप मोठे आहे. सण साजरे करण्यातल्या उत्साह आजही, एकविसाव्या शतकातही कायम आहे, किंबहुना आजच्या काळात तो दुणावला आहे. सणांसाठी आवश्यक असणार्‍या आकर्षक आणि सहजी उपलब्ध होणार्‍या वस्तू हे त्यामागचे मूळ कारण आहे. त्यातूनच सण आणि अर्थकारण यांचे एक नवे समीकरण निर्माण झाले. यादृष्टीनेच आपण शिशिर ऋतुमध्ये येणार्‍या मकरसंक्रात या सणाकडे पाहिले तर सण आणि छोट्या-छोट्या उद्योगांतून उलगडणार्‍या बाजारपेठेचे स्वरूप आपल्याला कळत जाईल. त्यातूनच स्नेहसंवर्धन आणि स्नेहवृद्धी करणार्‍या या सणातील संस्कृतीचा भाग जोपासताना अर्थव्यवस्थेलाही एक निराळे वळण मिळाले हेही लक्षात येईल.

मकरसंक्रांतीला तीळ आणि साखर यांपासून बनवल्या जाण्यार्‍या हलव्याला खूप महत्त्व आहे. परंपरा समजून घेऊन, ती जपणार्‍या माणसाच्या हौसेलाही मोल नाही. हलव्याचे दागिने ही या हौसेतूनच टिकलेली परंपरा.

मकरसंक्रांतीच्या सणाला नववधूंना आणि नवबालकांना हलव्याच्या दागिन्यांनी सजवण्याची परंपरा आजही अनेक घरांमधून उत्साहाने पाळली जाते. ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायाने बाजारपेठाही या काळात हलव्याच्या दागिन्यांनी सजलेल्या दिसतात. जावयासाठी पुणेरी पगडी, कंठी, उपरणे, हार; नवविवाहितेसाठी पारंपरिक हार, चिंचपेटी, बांगड्या, मंगळसूत्र, कानातले, बाजूबंद, केशसंभारासाठी आवश्यक अलंकार, नथ, अंगठ्या; यांबरोबरच साडी, पर्सेस, चपला; तर बाळांसाठी कान्हा सेट आज बाजारात उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या पारंपरिक दागिन्यांबरोबर हलव्याचे घड्याळ, मोबाईल पाऊच, ब्लूटूथ, हेडफोन्स, लॅपटॉप यासांरख्या वस्तू आज नव्या जमान्याचे आकर्षण ठरत आहेत. या वर्षीचे आकर्षण म्हणजे ‘रमा-माधव सेट’ आणि ‘जय मल्हार सेट’ या नावांनी ग्राहकांसमोर आलेले हलव्याचे दागिने म्हणजे रमा-माधव, मल्हार-म्हाळसा वापरत असलेल्या विविध वस्तू.

बदलत्या काळानुसार ग्राहकांना आकर्षित करण्यासोबतच त्यांची हौस पुरवण्याच्या उद्देशाने तयार केले जाणारे हलव्याचे दागिने भारतीय अर्थविश्‍वामध्ये एका नव्या आणि बळकट अशा उद्योगाची भर घालत आहेत. काटेरी हलवा, दोरा, फेविकॉल या मुख्य वस्तूंना जोड देत दागिने अधिक कलात्मक करण्यासाठी मणी, जीग (सोनेरी स्प्रिंग), विविध प्रकारच्या लेसेस, रंगीत कागद, पुठ्ठे यांचा वापर दागिने करण्यासाठी केला जातो. तो वापर अनेक लघुउद्योगांना बळ देतो. या विविध वस्तूंचा नेमका वापर करून नाविन्यपूर्ण हलव्याचे दागिने बनवणार्‍या कलाकारांना यानिमित्ताने रोजगार मिळत आहे.

दागिने बनवताना विविध आकारांचा, विविध रंगांचा  हलवा लागतो. तो बनवताना तीळासोबतच भोपळ्याच्या बिया, खसखस, शेवया याचाही वापर केला जातो.

हलवा आणि त्यापासून आकर्षक दागिने बनवण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास हा सण विशिष्ट काळासाठी असला तरी चांगला आर्थिक नफा मिळवून देणारा आहे. 200/- रुपयांपासून अगदी 7000/- रुपयांपर्यंत मिळणारे हे हलव्याचे दागिने, लघुउद्योजक ग्राहकांना उपलब्ध करू देऊ शकतात. असे दागिने मोठ्या हौसेने खरेदी करणार्‍या ग्राहकांचे प्रमाण वाढलेले आहे, यापुढेही ते वाढत राहाणार आहे, हे नवीन उद्योजकांनी लक्षात घेतले पाहिजे.

संक्रांत म्हटले की, कुंभारवाड्यात अनेक स्त्रियांची  संक्रांतीच्या वाणासाठी सुगडे घेण्यासाठी गर्दी दिसते. वाण देण्यासाठी एक स्त्री 5 सुगडे विकत घेते. त्यात तिळाचा हलवा, गाजर, ऊस, घाटे, गव्हाच्या लोंबी इ. गोष्टी घालून या स्त्रिया एकमेकींना हे सुगडाचे वाण देतात. मुलांनो, तुम्ही सिंहगडावर याच सुगडांतले थंडगार दही खाल्ले असेल ना! पण, तुम्हाला या सुगडांचा प्रवास माहीत आहे का?

दिवाळी संपली की, लगेचच कुंभारांची सुगडे बनवण्याची लगबग सुरू होते, त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी हे महिने फारच लगबगीचे असतात.

सुगडे बनवण्यासाठी चिकण माती, शाडू माती आणि शेतातल्या मातीचा वापर करतात. माती आणल्यावर सर्वप्रथम ती चाळून घ्यावी लागते, खडेरहित असणारी माती2 दिवस  भिजवून ठेवतात; अशा भिजून मऊ झालेल्या मातीपासून चाकावर सुगडे तयार करतात. अंदाजे 10 किलो भिजवलेल्या मातीपासून 30 सुगडे बनतात. उत्तम कारागीर असेल, तर एक सुगड साधारण 5 मिनिटांत तयार होते. तयार झालेली सुगडे सावलीत 1 दिवस वाळवावी लागतात. त्यानंतर त्यांची भट्टी लावली जाते. भट्टी लावताना जर वाफ कोंडून सुगडे भाजली, तर त्यांचा रंग काळा होतो आणि  वाफ न कोंडता भाजली, तर लाल होतो. भट्टीमध्ये सुगडे भाजण्यासाठी साधारण 12 ते 15 तास लागतात. नंतर पूर्ण 1 दिवस ती थंड होण्यासाठी ठेवतात; असा हा लहानशा आणि सुबक सुगडांचा मोठ्ठा प्रवास.

या कालावधीत, पुण्यातील कुंभारवाड्यात कोट्यवधी सुगडांची विक्री होते. एका सुगडाची किंमत फक्त 10 रुपये असते. ही विक्री करणार्‍यांना एका सुगडामागे फक्त 2 ते 3 रुपये मिळतात. सुगडांचा हा प्रवास बघता, त्यामागच्या कष्टांची कल्पना तुम्हांला आलीच असेल.

‘तिळगूळ घ्या, गोडगोड बोला’ म्हटले की, डोळ्यांसमोर येते ते तिळाची वडी, तिळाचे लाडू हे पदार्थ. तीळ अत्यंत लहान असला, तरी संक्रांतीच्या सणाला त्यांचे महत्त्व फार मोठे आहे. संक्रांतीच्या दिवसापासून पुढे रथसप्तमीपर्यंत तिळगुळाची देवाण-घेवाण चालूच असते. या लहान तिळाचे पदार्थ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पुणे शहरात नव्या-जुन्या कारखान्यांमधून पन्नास हजार किलोंपेक्षा जास्त तिळगूळ विकला जातो. संक्रांतीपूर्वी पंधरा दिवसांपासून तीळवडी, तिळाचे लाडू बनवण्याची लगबग सुरू होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तीळ व गूळ विकत घेतला जातो. मोठमोठ्या यंत्रांमधून निवडून घेऊन, भाजलेले अर्धा किलो तीळ, अर्धा किलो गुळाच्या पाकात मिसळून त्याचे मिश्रण बनवले जाते. हे मिश्रण बनवण्याचे काम अत्यंत कौशल्याचे असते. तयार झालेल्या मिश्रणात स्वादासाठी वेलची किंवा जायफळाची पावडर घालतात. मिश्रण गरम असतानाच त्याची चौकोनी पोळी लाटून त्याच्या वड्या पाडल्या जातात किंवा छोटे छोटे गोळे तयार करून लाडू बनवले जातात. मिश्रणाचे प्रमाण ठरलेले असल्यामुळे त्याची चव कायम राहते. वड्या व लाडू 100 ग्रॅमपासून 1 किलोपर्यंतच्या वेगवेगळ्या वजनात पॅकिंग करून विक्रीस ठेवले जातात. 1 किलो मिश्रणात 100 ते 105 मध्यम आकाराच्या वड्या तयार होतात. तीळ व गूळ खरेदी करण्यापासून वड्या, लाडू बनवून; त्याचे पॅकिंग करून बाजारात विक्री होणे, ही तिळाएवढी छोटी प्रक्रिया नव्हे. या संपूर्ण प्रक्रियेत एका शहरात दहा लोकांपासून एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. थंडीच्या दिवसांत शरीरात उष्णता निर्माण करणारे तीळ आणि गूळ यांपासून वड्या तयार करण्याचा व्यवसाय अनेक जणांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनला आहे. तिळाचे लाडू, कडक तीळवडी, मऊ तीळवडी, गुळपोळी, रेवडी, हलवा असे अनेक पदार्थ या वेळी विक्रीसाठी बाजारात दिसतात. वातावरणानुसार आपल्या शरीराचे तापमान वाढवणारे तिळगुळाचे पदार्थ आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठीच पूर्वीपासून चवीने खाल्ले जातात. आजही ते खातात आणि यापुढेही खाल्ले जातील.

आकाशात पतंग भिरभिरताना दिसणे, त्यांचा काटाकाटीचा खेळ चालणे म्हणजे संक्रात जवळ आली, हे मनात कुठेतरी बिंबून जाते. तिळगूळ, हलव्याचे दागिने आपल्याला आठवतात; तसाच पंतग उडवण्याचा खेळही आठवतो. मकरसंक्रात म्हणजे सूर्याच्या संक्रमणाचा सण. या संक्रमणाचे स्वागत पतंग उडवून केले जाते, असा संदर्भ संक्रातीला पतंग उडवण्यामागे सांगितला जातो.

संक्रातीच्या महिनाभर आधीच पतंग उडवायला सुरुवात केली जाते. त्यामुळे महिनाभर आधीच पतंग विक्रीला वेग येऊन, बाजारपेठा रंगीबेरंगी पतंगांनी फुलतात. आज छोट्या-मोठ्या आकारात, वेगवेगळ्या रंगांत अनेक पतंग बाजारात उपलब्ध आहेत. अर्धा फूट ते वीस फूट उंचीच्या पतंगांच्या किंमती त्यांच्या आकारानुसार ठरवल्या जातात. 3 रु. ते 1500 रु. किंमतीपर्यंतचे पंतग बाजारात आहेत. पूर्वी फक्त साध्या कागदाचा आणि दोनच रंगातला पतंग तयार केला जात असे, पण आता बालमित्रांना आकर्षित करण्यासाठी पिव्हीसी या चकचकीत कागदामध्येही पतंग तयार केला जातो. या पतंगावर विविध कार्टून्स्, अनेक सेलिब्रेटींचे फोटो छापलेले असल्याने त्यांना मागणीही जास्त आहे.

करायला सोपा वाटणारा पतंग सात कामगारांच्या हाताखालून जातो. एक कामगार एकाच प्रकारचे काम करतो. हे सात कामगार मिळून एका दिवसात दोन हजार पतंग तयार करतात. एका कामगाराला एका दिवसाचे 200 ते 300 रुपये मिळतात. पतंग उडवण्यासाठी आवश्यक असतो ‘मांजा’. साधा मांजा आणि काचपावडर लावलेला मांजा अशा दोन प्रकारांत मांजा मिळतो. काच पावडर लावलेला मांजा अधिक मजबूत असल्याने काटाकाटीचा खेळ खेळण्यासाठी हाच मांजा वापरला जातो. साधारण 1000 मीटर मांज्याची किंमत 100 रु. आहे. मांजा ‘आसारी’वर गुंडाळला जातो. लाकडाच्या व प्लॅस्टिकच्या ‘आसारी’ 50 रुपयांपासून ते 600 रुपयांपर्यंत बाजारात विक्रीला आहेत.

पंतग बाजारात वर्षभर विक्रीसाठी असला; तरी संक्रातीच्या दरम्यान त्यांना जास्त मागणी असल्याने, याच काळात पतंग व्यवसायात वाढ होते; पण आता व्हिडीओ, मोबाईल गेम्समुळे मुळातच मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाल्याने, पंतग उडवण्याचा पारंपरिक खेळ काही शहरांतच खेळला जातो. यामुळे पंतग विक्रीचे प्रमाण पूर्वीपेक्षा अत्यल्प झाले आहे. पण, संक्रातीसारख्या सणांना परंपरा म्हणून हा खेळ खेळणार्‍यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळेच आजही अनेक व्यावसायिक पिढ्यान्पिढ्या पंतग विक्रीचा व्यवसाय करत आहेत.