योद्धासंन्यासी

दिंनाक: 13 Jan 2018 15:31:25


आपल्या भारताला ज्ञानाचे भांडार म्हणतात. भारताची संत परंपरा ही खूप मोठी आहे. भारताला लागलेल्या अनेक थोर संतापैकी स्वामी विवेकानंद हे एक महान संतच होते. ते रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते व रामकृष्ण परमहंस यांनी सुरू केलेल्या “रामकृष्ण मिशन”च्या प्रसार व प्रचार विवेकानंदानी संपूर्ण जगात केला. १० मे १८९३ रोजी राजा अजित सिंग खेत्री यांनी नरेंद्रांना “विवेकानंद" नावाने सन्मानित केले.

नरेंद्र उर्फ स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण जगात वेदांतांचा प्रसार केला.  तत्कालीन अमेरिकन वृत्तपत्रांनी “भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी", असे स्वामींचे वर्णन केले. अमेरिका आणि इंगलंडमध्ये अनेक वेदांत सोसायट्यांची स्थापनाही केली. त्यांचा जन्मदिन आपण "युवादिन" म्हणून साजरा करण्यात येतो.

शिक्षणाबाबत स्वामी विवेकानंद म्हणत, शिक्षणाचा उद्देश सकारात्मक वृत्ती रुजविणे हा आहे. बुद्धीसामर्थ्य वाढवून मन व भावनांवर अंकुश ठेवण्याची तालीम देते, ते खरे शिक्षण. शिक्षण हे चारित्र्य निर्माण करते व जीवन कलहाला सामोरे जाऊन आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज करते.

विवेकानंदांचे सर्व चरित्र हे आपणासाठी प्रेरणादायक असेच आहे. माणसाच्या जगण्याचा मूळ उददेश काय असावा हे आपणास यातून समजते. त्यांच्या चरित्रातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे शिकागो येथे झालेली सर्वधर्म परिषद होय.

सोमवार दि. ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागोतील आर्ट पॅलेस या हॉलमध्ये या परिषदचे आयोजन करण्यात आले होते. क्रिस्तोफर कोलंबस याने अमेरिका खंडाचा शोध लावला या घटनेला ४०० वर्षे पूर्ण झाली म्हणून जागतिक कोलंबिया परिषद भरविण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून सर्वधर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले.

पाश्चिमात्य जगताने तंत्रज्ञान व भौतिकशास्त्रामध्ये जी प्रगती केली व जो ज्ञान विस्तार साधला होता तो इतर सर्व जगतापुढे मांडण्याचा प्रमुख हेतू होता. त्यामध्ये सहभाग घेणाऱ्या काही ख्रिस्ती धर्मवेत्यांनी आपला ख्रिस्त धर्म हा जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ धर्म कसा आहे हे मांडण्याचा व प्रसार करण्याचा त्यांचा हेतू होता.

या परिषदेमध्ये स्वामीजींना ३१ क्रमांकाचे आसन देण्यात आले. स्वामीजी फक्त विशिष्ट धर्माचे प्रतिनिधी म्हणूनच नव्हे, तर वेदांच्या  धर्माचे प्रतिनिधित्व करत होते. सभेला सुरुवात झाल्यानंतर विवेकानंदांचा क्रमांक आला. तेव्हा त्यांनी त्यांना पुढचा क्रमांक देण्याची विनंती करत होते असे बरेचदा झाले. इतर धर्माचे प्रतिनिधित्व त्यांनी लिहून आणलेले भाषण वाचत होते. त्यांची तयारी उत्तम होती. पण विवेकानंद मात्र कसलीही तयारी न करता भाषणास उभे राहिले.

अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधुनो या एकाच वाक्याने त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली. सभागृहातील ७००० लोकांनी उठून त्यांच्या या वाक्याचा टाळ्यांनी सन्मान केला. तिथून पुढे मात्र विवेकानंदांना एक धर्मवेत्ता विचारवंत म्हणून मानाचे स्थान दिले जाऊ लागले. अमेरिकेत ठिकठिकाणी त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाऊ लागले.

“सार्वजनीन सहिष्णुता व परस्परांचा स्वीकार” हे स्वामीजींच्या भाषणांचे सूत्र होते. त्यांनी भारतीयांच्या “परमधर्म सहिष्णुते संबंधाने” हिंदू शास्त्रातील “शिवमहिम्न स्तोत्र” व “श्रीभगवद्गीते”मधील दोन श्लोकांचा उल्लेख त्यात प्रामुख्याने केला होता. अन्य देशातून निराश्रीत झालेल्या धर्माच्या अनुयायांना उदा., यहुदी आणि पारशी लोकांना भारताने कसा आश्रय दिला हे त्यांनी श्रोत्यांच्या मनावर बिंबवले. झळझळीत भगव्या रंगाचा अंगरखा भगवा फेटा, ब्रांझ धातूसारखा वर्ण, रेखीव-सुडौल-रेखाकृती असलेले विवेकानंद सर्वच व्यासपीठावर उठून दिसत होते. या सर्वधर्म परिषदेत विवेकानंदानी जे विचार मांडले ते फक्त हिंदू धर्मासाठी होते असे नसून तर जगातील सर्वधर्माचा गाभा त्यामध्ये होता.

भारताची “सर्वेत्र सुखितो : संन्तु सर्वे संन्तु  निरामय:" या विचारधारेवरतीही त्यांनी भाष्य केले. भारताचा प्राचीन इतिहास, वेदांचे महत्त्व त्यात विशद केले. त्यांच्यापूर्वी जेवढ्यांनी भाषण केले, त्यातील कुणीही विश्वबंधुत्वाची आत्मोन्नतीची संकल्पना मांडली नव्हती. बोलणारा प्रत्येकजण फक्त स्वतःच्या धर्माच्या श्रेष्ठत्वाबद्दलच सांगत होता. पण स्वामीजी मात्र एकमेव असे वक्ते होते, की त्यांनी सर्वच धर्माचा मूळ गाभा हा ईश्वरप्राप्ती हाच आहे, हे ते ठामपणे मांडत होते. त्यामुळेच सर्वांना त्यांचे विचार पटले. भारतातील वसुधेव कुटुंबकम ही संकल्पना श्रोत्यांना पटली म्हणून विवेकानंदाचे भाषण संपल्यावर सर्वांनी उठून त्यांना एक  मानवंदना दिली. दुसऱ्या दिवसाच्या सगळ्या वर्तमानपत्रात फक्त विवेकानंद हाच विषय होता. त्या व्याख्यानानंतर मात्र ख्रिस्ती धर्मावेत्यांना हे मात्र लक्षात आले की, आपल्यापेक्षाही अनेक श्रेष्ठ धर्म या जगात आहेत. “न्यूयॉर्क हेराल्ड" या प्रसिद्ध वृत्तपत्राने तर एक विचार मांडला की भारतासारख्या ज्ञानसंपन्न देशात धर्मप्रसारक पाठवणे म्हणजे शुद्ध वेडेपणाच आहे. आपण आपला हा विचार सोडून द्यावा.

विवेकानंद अमेरिकेत cycloxic Hindu म्हणजेच ‘वादळी व्यक्तिमत्त्वाचा हिंदू’ म्हणून ओळखले जाऊ लागले. “आत्मानो मोक्षार्थ जगद्धीतायचं” अशी जी एक चळवळ त्यांनी सुरू केली, तिचीच मोहिनी अमेरिकन मनाला पडली होती. शेवटी भाषणाचा समारोप करताना स्वामीजींनी सांप्रदायिकता, स्वमतोधता आणि धर्मवेडे हे या पृथ्वीवरून नामशेष होतील व सर्व जग हे एक होईल अशी आशा व्यक्त केली. त्या पूर्ण परिषदेत त्यांची जवळजवळ १२ व्याख्याने झाली. धर्मधर्माच्या ध्वजांवर लवकरच लिहिले ‘संघर्ष नको, परस्परांना साहाय्य करा. कलह नको, मैत्री हवी.’ हा संदेश त्यांनी या सर्वधर्म परिषदेत सर्व जगताला दिला.

स्वामींनी “भारतीय स्त्री शक्ती” हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. भारतातील स्त्रियांना पाश्चिमात्य जगतातील स्त्रियांसारखी मोकळीक दिली जात नाही. त्यांच्यावर बंधने लादली जातात. गार्गी, लोपमुद्रा यांच्या काळात स्त्रियांना जी मोकळीक शिक्षणाच्या संधीचा विचार होता तो मधल्या काही काळात खंडित झाला. भारतातील स्त्रियांच्या समाजजीवनात बदल होणे गरजेचे आहे यावर त्यांनी त्या वेळी सुद्धा राष्ट्राराष्ट्रात संघर्ष हा होताच पण त्या राष्ट्राच्या सगळ्या वाईट गोष्टींकडेच लक्ष दिले तर त्यातील चांगल्या लोकांवर अन्याय होतो, ते म्हणत की एखाद्या राष्ट्राच्या मोठेपणाचे मूल्यमापन करताना दुर्बल बाजू पाहायच्या नसतात. खुरट्या गवतासारखे जे आहे त्या त्या उंचीवरच राहणाऱ्या दुष्ट लोकांचा विचार करायचा नसतो. देशाच्या श्रेष्ठत्वाचे मूल्यमापन करायचे असते, ते त्यातील उदारहृदयी व चारित्र्यसंपन्न लोकांवरून, कारण राष्ट्राचा जीवनप्रवाह चैतन्ययुक्त व निर्मल, स्वच्छ आहे हे अशा लोकांमुळेच शक्य होते.

एखाद्या गोष्टीकडे आपण कसे पाहतो तशीच ती आपल्याला कशी दिसते. त्यावरच आपले यश-अपयश अवलंबून असते. म्हणून विचार करताना सदैव चांगला, सकारात्मक विचार करावा. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. एकदा ध्येय निश्चित झाले की त्याच्या मागे असावे. यातच त्याचा विकास आहे. आणि त्याच्याबरोबरच त्याच्या देशाचाही विकास होईल, असे उदात्त विचार विवेकानंदांनी आपणासमोर मांडून ठेवले आहेत. त्याचा स्वीकार आपण केला तर आपलं भविष्य निश्चित आशादायी असेल. 

- संगीता साळुंके

[email protected]