प्रसिद्ध लेखक, साहित्यिक डॉ. न.म. जोशी यांच्याकडून लेखन प्रेरणा घेणे म्हणजे खरोखरीच अद्भुत अनुभव. हा अनुभव घेतला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी. 
शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शिक्षणविवेक आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी "लेखन प्रेरणा" कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस १५ शाळांचे ३१ शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला संकेत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. महिलाश्रम हायस्कूलच्या पर्यवेक्षिका संजीवनी कर्वे यांनी डॉ. न. म. जोशी यांचा परिचय करून दिला. जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा बोराणे यांनी त्यांचे स्वागत केले. शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक अर्चना कुडतरकर यांनी ‘अभिरुची संपन्नतेसाठी लेखन’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल माणकीकर यांनी लेखनाची आवड आणि सवड याविषयी बोलताना कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. ‘स्वत:ला व्यक्त होणे म्हणजे लेखन’ या विधानापासून सुरुवात झालेले डॉ. न. म. जोशी यांचे मार्गदर्शन जवळजवळ दोन तास चालले. संवेदनशील भावना लिखित स्वरूपात समोर आणण्याची प्रक्रिया म्हणजे लेखन, हे सांगताना डॉ. न. म. जोशी यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग सांगितले. ‘कुतुहल’ आणि ‘जिज्ञासा’ या लेखनाच्या पहिल्या पायर्‍या आहेत, हे सांगताना अनेक उदाहरणे दिली. आपली पंचज्ञानेंद्रिये उघडी ठेवून निरीक्षण, वाचन, मनन, चिंतन आणि लेखन हा लेखनाचा प्रवास ऐकताना प्रत्येकाला लेखनाची दिशा मिळत गेली. प्रत्येक घटना, प्रसंग किंवा भावना यांची मांडणी कशी असावी हे सांगत वेगवेगळ्या वयोगटासाठीच्या लेखनातील फरक समजून देताना डॉ. न. म. जोशी यांनी तीन गोष्टी सांगितल्या. मार्गदर्शनानंतर शिक्षकांनी अनेक प्रश्‍न विचारले. लेखनाची आचारसंहिता समजून घेतली. लहान मुलांसाठी लेखन करताना आवश्यक असणार्‍या क्षमता विकसनासाठीचे प्रयत्न लक्षात घेतले.  डॉ. न. म. जोशी यांच्या मार्गदर्शनाने शिक्षणविवेकसाठी लेखन करण्याचा संकल्प करत कार्यशाळा संपली. कार्यशाळेत सुनिता वांजळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्राजक्ता वैद्य यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

-प्रतिनिधी

                                                 [email protected]