‘‘उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका,

जोपर्यंत तुमचं लक्ष्य तुम्हाला प्राप्त होत नाही.’’

हे स्फुलिंग तरुणांमध्ये जागवले ते 19व्या शतकातील महान विचारक आणि युवा शक्तीचे प्रवर्तक ‘स्वामी विवेकानंद’ यांनी. माझा छोट्या विद्यार्थी मित्रांनो, स्वामीजी असे एक श्रेष्ठ संन्यासी होते, ज्यांनी साता समुद्रापलीकडे भारतीय संस्कृतीची पताका फडकवली आणि संपूर्ण विश्‍वाला हिंदू धर्मातील सिद्धांतांचे महत्त्व सांगितले. अमेरिकेतील ‘शिकागो’ या ठिकाणी झालेल्या विश्‍व धर्म परिषदेत त्यांनी ‘माझ्या बंधू आणि भगिनींनो’ असे संबोधून ‘विश्‍वबंधुत्वाची’ संकल्पना मांडली. स्वामीजींचे संपूर्ण जीवन हे आपल्यासाठी एक प्रेरणा स्रोत आहे. निराश, हताश झालेल्या व्यक्तीने जरी त्यांचे विचार वाचले, तर त्यातून त्याला काही प्रेरणा मिळून त्याचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन बदलू शकतो. अशा या महान व्यक्तीचा जन्म 12 जानेवारी 1863 साली झाला. म्हणूनच हा दिवस ‘युवादिन’ म्हणून साजरा केला जातो.

स्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य किंवा विचार म्हणजे अलौकिक ठेवा म्हणून आपल्याला त्याकडे पाहावे लागेल. आत्मविश्‍वास, बल, कर्म आणि ध्येय यांविषयी त्यांचे विचार म्हणजे आपल्या दृष्टीने परिवर्तन आहे. युवकांना संदेश देताना ते म्हणतात, ‘‘माझ्या साहसी मुलांनो, सतत पुढे चला, पैसा असो नसो, माणसे आपल्या बरोबर असोत नसोत, सर्वदा पुढे जात राहा. तुमचे हृदय प्रेमभावनेने ओथंबलेले आहे का? भगवंतावर तुमची श्रद्धा आहे काय? याच गोष्टी असल्या की पुरे. थेटपर्यंत पुढे व्हा, तुम्हाला रोखण्याची मग कोणाचीही हिंमत नाही.’’, अशा उद्बोधनातून स्वामीजींनी युवकांमध्ये जागृती केली आणि त्यांना पेटून उठवून कामाला लावले.

जीवनाविषयी स्वामीजींचा दृष्टिकोन स्पष्ट होता. माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकात प्रचंड क्षमता, शक्ती असते, म्हणून स्वतःवर विश्‍वास ठेवा. आत्मविश्‍वासाचा अभाव असेल, तर भीती वाटते आणि मनात जर भीती असेल, तर तुम्ही कुठलेच काम करू शकणार नाही. म्हणूनच प्रबळ इच्छाशक्ती, दुर्दम्य आत्मविश्‍वास हे आपल्यामध्ये असलेच पाहिजेत. स्वतःवर विश्‍वास ठेवणे, म्हणजे मन बळकट करणे, पण मनाबरोबरच शरीरही बळकट करणे आवश्यक आहे. तुम्ही मनाने आजाराच्या, दुःखाच्या, अपयशाच्या जवळ जाता. शरीर सुदृढ असेल, तर तुम्ही उत्साही असता, तुमच्यात सळसळते चैतन्य असते. त्यामुळे स्वामीजी म्हणतात, ‘‘व्यायाम करा, खेळा, शरीर उत्तम ठेवा.’’ शरीर आणि मन हे एकमेकांवर अवलंबून असते. त्यामुळे दोन्ही निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

स्वामीजींनी कर्मालादेखील खूप महत्त्व दिले आहे. ते म्हणतात,  ‘तुम्ही फक्त कामाला सुरुवात करा, मग पाहा; इतकी शक्ती तुमच्यामध्ये येईल की, ती सावरता सावरली जाणार नाही.’ म्हणूनच आपण ठरवलेले काम सातत्याने कोणत्याही परिस्थितीत करत राहिले पाहिजे. त्या कामाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली पाहिजे. आपण बडबड, गप्पा खूप करतो. त्या मानाने काम कमीच करतो. महर्षी धोंडो केशव कर्वे, बाबा आमटे यांसारख्या कितीतरी व्यक्तींनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उत्तम कार्य केले. त्यात सातत्य ठेवले, हार मानली नाही. अपेक्षित गोष्टी लगेच घडल्या नाहीत, तरी ते निराश झाले नाहीत. स्वत: पुढे होऊन ते कर्म करत राहिले. आपण त्यांचा आदर्श सतत डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे.

महर्षी आण्णा म्हणायचे की, ‘चांगले विचार जास्त काळ टिकत नाहीत. म्हणून एखादा चांगला विचार जास्त मनात आला की, त्याच्यावर लगेचच कार्यवाही करावी.’ हे जसे सत्य आहे तसेच, ‘एखादी चांगली कल्पना आपण स्वीकारली की, तिलाच आपले जीवनसर्वस्व बनवा. सतत तिचाच ध्यास घ्या. तिचीच स्वप्ने बघा. त्यासाठीच जगा. तुमचा मेंदू, स्नायू, मज्जातंतू, शरीराचा अणू-रेणू याच कल्पनेने भारला जाऊ द्या. इतर कोणत्याही विचाराला, कल्पनेने थारा देऊ नका. यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे.’ मेरी कोमचे उदाहरण याबाबतीत खूप बोलके आहे. तिच्यासारखी दुर्दम्य इच्छाशक्ती व अथक परिश्रमांची तयारी असेल, तर आपण ध्येयापर्यंत नक्की पोहोचतो. ध्येयप्राप्तीसाठी वाटचाल करताना कितीही अडचणी, संकटे आली, तरी त्यावर मात करू शकतो.

मित्रांनो, विवेकानंदाचे विचार अतिशय मार्मिक आहेत. आयुष्यातील प्रत्येक वळणावर काय करावे, कसे वागावे, हे त्यांच्या विचारांतून आपल्याला उलगडत जाते. मात्र, तुमच्या विद्यार्थीदशेत तुम्हाला आवश्यक असणार्‍या काही विचारांचाच परामर्श आपण इथे घेतला आहे. बघा जमतंय का तुम्हाला स्वत:मधील ‘विवेकानंद’ जागृत करायला.

- मनिषा वैद्य

[email protected]