नमस्कार मित्रांनो!

आतापर्यंत आपण विविध अभ्यास कौशल्ये पाहिली, ज्यांचा उपयोग तुम्हाला अभ्यासाला प्रवृत्त होण्यासाठी झाला. आता आपण प्रत्यक्ष अभ्यास करताना वापरावयाची काही कौशल्ये पाहणार आहोत. नोव्हेंबर महिन्याच्या लेखात वाचन कौशल्याविषयी जाणून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या वाचन सवयींमध्ये सुधारणा केली असेलच. या लेखात आपण काही अभ्यास करण्याच्या पद्धती जाणून घेणार आहोत.

बरीच मुलं अभ्यास करतात म्हणजे काय करतात? तर धडा वाचतात आणि प्रश्‍नोत्तरं पाठ करतात. पण बदललेल्या मूल्यमापन पद्धतीप्रमाणे आकलनावर भर देण्यात आला आहे. धड्याचे किंवा विषयाचे आकलन जास्तीत जास्त व्हावे, यासाठी काही अभ्यासपद्धती नक्कीच परिणामकारक आहेत.

1) विषयाचे किंवा धड्याचे भाग पाडून अभ्यास करणे -

जेव्हा एखादा धडा मोठा असतो किंवा कठीण असतो, तेव्हा त्या धड्याचे टप्याटप्प्याने वाचन केल्यास तो धडा अधिक चांगला समजतो, त्यामुळे लक्षातही चांगला राहतो. पण, जेव्हा एखादा धडा सोपा व लहान असतो, तेव्हा मात्र असे भाग न पाडता सलग अध्ययन केल्यास फायदेशीर ठरते.

2) वेळेचे भाग पाडून अभ्यास करणे -

आपल्या पालकांची अशी अपेक्षा असते की, सलग तीन तास अभ्यास कर, जागचा हलू नकोस. पण खरंच, आपण इतका वेळ सलग बसू शकतो का हो? नाही नं! म्हणूनच या पद्धतीने अभ्यास करायचा. दीड-दीड तासांचे दोन भाग करायचे व मध्ये 10-15 मि. विश्रांतीसाठीचा ब्रेक घ्यायचा. त्याप्रमाणे दीड तासामध्येही 1.10 मि. वाचन किंवा पाठांतर व पुढची 15/20 मि. मननासाठी (आठवून बघण्यासाठी) द्यायची. या पद्धतीमुळे सलग बसण्याचा कंटाळाही येत नाही व मननाची सवय लागल्यामुळे परीक्षेच्या वेळेस उत्तरं आठवणे सोपे जाते.

3) SQ3R पद्धत -

या पद्धतीने कठीण विषयाचा अभ्यास केल्यास त्या विषयाचे आकलन जास्त चांगले होते, असे मानसशास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. काय आहे ही पद्धत?

S म्हणजे Survey म्हणजे - संपूर्ण धड्यावरून सुरुवातीपासून शेवटपर्यंत नजर फिरवणे. फक्त ठळक अक्षरातील पॉईंट्स वाचत पुढे जाणे.

Q म्हणजे Question म्हणजे - वरील पायरीत फक्त पाईंट्स वाचल्यावर तुमच्या मनात कोणते प्रश्न निर्माण झाले ते लिहून काढणे, त्यामुळे धड्याबद्दलची उत्सुकता वाढते. तसेच, कोणत्या मुद्यांवर जास्त भर दिलाय हे समजते.

R म्हणजे Read म्हणजे - 3 R मधला पहिला R म्हणजे संपूर्ण धड्याचे नेमकेपणाने केलेले वाचन. वरील दोन पायर्‍यांनंतर जेव्हा आपण धडा वाचायला घेतो, तेव्हा जास्त चांगले आकलन होते.

R म्हणजे Recite- दुसरा R म्हणजे मनन. संपूर्ण धडा वाचून झाल्यावर पुस्तक बंद करून आपण काय वाचले ते आठवूण बघणे.

R म्हणजे Review - आणि तिसरा R म्हणजे मागोवा घेणे. वरील पायरीत जो भाग आठवत नाहीये, तो पुन्हा वाचणे व पुन्हा आठवून बघणे, याला मागोवा घेणे म्हणतात.

विशेषत: शास्त्र, इतिहास, भूगोल, परिसर, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या विषयांच्या अभ्यासाला ही पद्धत जास्त परिणामकारक ठरते.

तेव्हा मुलांनो, तुमच्या लक्षात आले असेलच, या तीनही अभ्यासपद्धतीत मननावर व आकलनावर भर दिला आहे. एकदा का तुमचे विषयांचे आकलन चांगले झाले की, तो विषय चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहे. त्यामुळे फक्त घोकंपट्टी करू नका, तर समजून घेऊन मग पाठांतर करा.

वरील पद्धतीने अभ्यास केल्यास तुम्हाला कसा फायदा होतोय, ते मला जरूर कळवा.

 -रश्मी पटवर्धन 

[email protected]