टूटू लपंडाव

दिंनाक: 10 Jan 2018 19:16:06


साहित्य : काही नाही

खेळाची तयारी : हा खेळ दोन गटांत आणि कितीही जणांत खेळता येतो. घरात खेळताना ‘सारा’ आणि ‘अन्वय’ असे दोन गट आहेत. साराच्या गटात आजोबा, काका, रोहन आणि आई. अन्वयच्या गटात आजी, काकू, प्रिया आणि बाबा. दोग गट समोरासमोर बसतील आणि खेळायला सुरुवात करतील.

चला खेळू या :

प्रत्येक भाषेत असे अनेक शब्द असतात, ज्यात दुसरे शब्द पण लपलेले असतात. काही शब्दात फक्त एकच नव्हे, तर अनेक शब्द लपलेले असतात. या शब्दांच्या मदतीनेच हा खेळ खेळायचा आहे. अशा शब्दांना ‘टूटू शब्द’ म्हणू या. मराठी किंवा इंग्रजी यांपैकी कुठलीही एक भाषा निवडून हा खेळ खेळा.

मराठी भाषा निवडली आहे, असे समजू या.

‘सारा’ गटातील आई उभी राहील आणि ‘उत्सुकता’ हा टूटू शब्द सांगेल. ‘अन्वय’ गटाने या टूटू शब्दात लपलेले ‘ताक’ आणि ‘उत्सुक’ हे दोन्ही शब्द ओळखायचे आहेत. मग ‘अन्वय’ गटातील बाबा उभे राहतील आणि ‘पखवाज’ हा टूटू शब्द सांगतील.

‘सारा’ गटाने या टूटू शब्दात लपलेले ‘खवा’, ‘खप’ आणि ‘जप’ हे तीनही शब्द ओळखायचे आहेत. टूटू शब्द ऐकल्यानंतर मनातल्या मनात त्यातील अक्षरांची फिरवाफिरव करून त्यात लपलेले जास्तीत जास्त शब्द ओळखणे हे या खेळातले कौशल्य आहे.

तुमच्या संदर्भासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतील 7-7 टूटू शब्द देत आहे.

मावशी (माशी, शीव); पोपट (पोप, पोट, पट); पाऊस (पास, ऊस); सुकुमार (सुमार, कुमार, रमा, मार); शिकेकाई (काशी, शिका) सारवण (वसा, वरण, साव); समर (सर, मर, रस).

Pant(Ant, Tap, Pat); Busy(buy, By, Bus); Father(Fat, Her, Fear); Your(Our, You); Start(Art, Tar, Rat); Welcome(Come, Me, Cow); Mistake(Take, Seat, Eat).

नियम :

1) एका गटाने टूटू शब्द सांगितल्यावर दुसर्‍या गटाने 30 सेकंदांत त्या शब्दात लपलेला एक तरी शब्द ओळखलाच पाहिजे.

2) पहिल्या गटाने सांगितलेल्या टूटू शब्दात लपलेला शब्द दुसर्‍या गटाला 30 सेकंदात न ओळखता आल्यास पहिल्या गटाला 10 गुण मिळतील.

* कोण जिंकेल :

ज्या गटाला 50 गुण मिळतील तो गट जिंकला.

 

 -राजीव तांबे 

[email protected]