मुली वयात येताना होणारे शारीरिक-मानसिक बदल, मासिक पाळी म्हणजे नेमकं काय?, पाळी दरम्यान स्वच्छता कशी राखायची, सॅनटरी नॅपकीन्सचा वापर, त्याचं डिस्पोजल या विषयांवर किशोरवयीन मैत्रिणींबरोबरच पालक, शिक्षकही मोकळेपणाने चर्चा करत होते; निमित्त होेतं ‘कळी उमलताना...’ (वयात येणाऱ्या मुलींचे प्रबोधन) या कार्यशाळेचं.

शिक्षणविवेक व लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षण माझा वसा’ या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा  आणि ‘कळी उमलताना...’ कार्यशाळा असा संयुक्त कार्यक्रम ७ जानेवारी रोजी सांगली येथे घेण्यात आला. वयात येणाऱ्या मुलींच्या दृष्टीने मासिक पाळी हा महत्त्वाचा घटक असला तरीही तो चर्चा न करण्याचा विषय समजला जातो. मासिक पाळीशी संबंधित असणाऱ्या सर्व विषयांवर चर्चा करण्याच्या उद्दशाने विद्यार्थीनी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी कळी उमलताना या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 बालसाहित्यिक राजीव तांबे यांच्या हस्ते कार्यशाळचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी शिक्षणविवेकच्या 'कळी उमलताना...' या मासिक पाळी व्यवस्थापन विशेषाकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच मासिक पाळी विषयात कार्य करणाऱ्या ‘रोशनी फाउंडेशन’ या संस्थेला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यशाळेत सकाळी कौस्तुभ जोगळेकर व प्रविण निकम यांनी शिक्षकांसाठीचे सत्र घेतले. विद्यार्थ्यांना लैंगिक विषय शिकवताना शिक्षकांनी संकोच कमी करायला हवा. मुलांच्या उत्सुकता, त्यांच्या प्रश्नांना शिक्षक, पालक यांनी योग्य उत्तरे कशी द्यायला हवीत, याविषयी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला. दुपारच्या सत्रात डॉ. यशस्वीनी तुपकरी यांनी वयात येणाऱ्या मुलींना प्रजनन क्षमता, शारीरिक-मानसिक बदल, वयात येताना घ्यायची काळजी यांविषयी नाट्यछटा व दृक माध्यमांतून प्रभावी मार्गदर्शन केले.

 संध्याकाळच्या सत्रात राजीव तांबे यांनी ‘सुसंवादाची ‘पाळी’ या विषयावर पालकांशी संवाद साधला. ‘मुलांना प्रश्न विचारण्याऐवजी त्यांच्याशी सुसंवाद साधायला हवा. मुलांची चूक झाली तरी त्यांना लेबल न लावता, काय बरोबर आहे ते पुन्हा पुन्हा सांगा. तुमच्या घरातील भाषा विधानार्थी की ज्ञानार्थी आहे, त्यावर मुलांचे लहानपण आणि मोठेपण अवलंबून असते,’ असे सांगितले.

 या वेळी 'शिक्षण माझा वसा' या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कारही प्रदान करण्यात आला. त्यामध्ये सचिन देसाई (भाषा), विनोद कांबळे (गणित), मीना म्हसे (विज्ञान), प्रविण ढाकरे (कला), विनित पद्मावार (तंत्रज्ञान); तसेच माधवी पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शिक्षणविवेक मासिकाचे दुवा म्हणून उत्तम कार्य करणाऱ्या शिल्पा पराडकर, ॠतुजा गवस, गायत्री जवळगीकर या शिक्षक प्रतिनिधींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कल्पना आगवणे यांना उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणविवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर यांनी केले. तर ऍड. किशोर लुल्ला यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी सांगली जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, डाएटचे सल्लागार, सांगलीच्या शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे, शिक्षण मंडळाच्या दीपाली पाटील, अमित लुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते. वर्षा लिमये, विनिता तेलंग, मयुरेश अभ्यंकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 -प्रतिनिधी 

[email protected]