नमस्कार मित्रांनो, आपण मागील लेखामध्ये आपले सण आणि त्यांचे आपल्या आकाशाशी असलेले नाते नक्की काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की तुम्ही नक्की त्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल. चला तर मग या प्रस्तुत लेखात आपण आकाशाविषयी कोणकोणते प्रयोग करू शकतो ते पाहूयात

आता हे सर्व प्रयोग करून पाहण्याआधी असं समजूयात की आपण एखाद्या निर्जन बेटावर आहोत आणि आपल्याकडे वेळ, दिशा आणि काळ कळण्याचे कोणतेही साधन नाही. आता असा विचार करा की आहेत त्या साधनांमधून आपण काय काय जाणून घेऊ शकतो? आता या गोष्टीचा विचार केल्यास आपल्याला लक्षात येईल की जर आपल्याला काही मूलभूत गोष्टी ठावूक असतील तर आपण जवळपास सर्वच गोष्टी जाणून घेऊ शकतो. ते कसे हे पाहूयात –

आता सूर्योदय आणि सूर्यास्तावरून आपण नक्की दिवसाचा कोणता कालावधी आहे ते शोधून काढू शकतो जसे की सूर्य उगवत असेल तर सकाळ, साधारण डोक्यावर असेल तर दुपार आणि मावळत असेल तर संध्याकाळ! त्याचप्रमाणे सूर्याचे रोज निरीक्षण केल्यास त्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन यावरून आपल्याला वर्षाचा कालावधी सुद्धा काढता येईल. आता साधारण दिवसाची आणि वर्षाची वेळ कळली, आता थोडं पुढे जाऊन जर आपण चंद्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की चंद्र जर सूर्य मावळल्यावर लगेच दिसत असेल तर साधारण शुक्ल पक्षातील पहिल्या काही तिथी असाव्यात, तसेच जर सूर्य मावळताना चंद्र अर्धा आणि डोक्यावर दिसत असेल तर साधारण शुक्ल अष्टमीच्या जवळपासचा दिवस असावा. आता जर सूर्य मावळल्या वर चंद्र पूर्वेला पूर्ण दिसत असेल तर पौर्णिमा असेल आणि सूर्य मावळल्यावर जर बऱ्याच वेळाने चंद्रोदय होत असेल तर तो कृष्ण पक्ष असावा, म्हणजे नुसत्या चंद्राच्या निरीक्षणावरून आपल्याला महिन्याचा कालावधी समजला. आता हेच निरीक्षण थोडं पुढे नेलं तर आपल्या लक्षात येईल की जर आपण पौर्णिमेचा चंद्र नक्की कोणत्या नक्षत्राजवळ दिसतो हे पाहिलं तर आपणास कोणता मराठी महिना चालू आहे हेसुद्धा सापडू शकतं जसे की – कृत्तिका या नक्षत्राजवळ पौर्णिमा असेल तर कार्तिक, मृगशीर्ष या नक्षत्राजवळ असेल तर मार्गशीर्ष असे. अशाप्रकारे आपल्याकडे नुसत्या डोळ्याने पाहून भरपूर माहिती कळली!

आता एक पाउल पुढे जाऊयात, आपण ध्रुव ताऱ्याची माहिती आधीच करून घेतलेली आहे, आता या ध्रुव ताऱ्याच्या मदतीने आपल्याला आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाचे अक्षांश काढता येतात. ते कसे हे आपण पाहूयात. आपलं क्षितिज, आपला डोळा आणि ध्रुव तारा यातील तो कोन होतो, तो कोन म्हणजे आपण निरीक्षण करत असलेल्या जागेचे अक्षांश. आपल्याला ठाऊक आहे की आपली पृथ्वी ही एका अक्षाभोवती फिरते त्या अक्षाच्या उत्तर बिंदूच्या बरोबर समोरचा तारा म्हणजे ध्रुव तारा. त्यामुळेच उत्तर ध्रुवावरून हा कोन ९० अंश आणि तोच विषुववृत्तावर तो कोन शून्य अंश इतका दिसेल. तुम्ही Inclinometer हे मीटर वापरून हा प्रयोग करू शकता.

आता आपण लोहोचुम्बक वापरून उत्तर दिशा काढण्याचा प्रयोग केलेला असेल. ह्या प्रकारे आपण जी उत्तर दिशा काढतो ती चुंबकीय उत्तर दिशा असते. भौगोलिक उत्तर दिशा काढायची असेल तर एक सोप्पा प्रयोग आपल्याला करता येईल. एक साधारण एक मीटर इतका लांब खांब जमिनीत खोचायचा आणि त्याच्या भोवती साधारण ४-५ वेगवेगळ्या त्रिज्येची एकात एक असलेली वर्तुळे काढायची. आता सकाळच्या वेळात सूर्य सूर्याची सावली पश्चिमेला पडेल आणि एखाद्या वर्तुळास छेदेल. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळी त्याच वर्तुळास सावली विरुद्ध बाजूला छेदेल. आता हे दोन बिंदू जोडले तर आपल्याला त्या जागेची भौगोलिक पूर्व पश्चिम दिशा मिळू शकेल , आणि या रेषेचा लंबदुभाजक काढला असता आपल्याला भौगोलिक उत्तर दक्षिण दिशा सुद्धा मिळू शकेल.

अशा प्रकारे आपण, नुसत्या डोळ्यांनी आणि सहज सोप्प्या साधनांच्या मदतीने अनेक गोष्टी माहीत करून घेऊ शकतो. अशा प्रकारेच आपण असे अनेक प्रयोग जसे की सूर्य-पृथ्वी अंतर काढणे, सूर्याची त्रिज्या मोजणे, पृथ्वीची त्रिज्या मोजणे अनेक प्रयोग करून पाहू शकतो फक्त ते प्रयोग थोडे क्लिष्ट असल्याने इथे नुसती नावे नमूद करत आहे. मला खात्री आहे की तुम्ही याबद्दल अधिक माहिती नक्की मिळवण्याचा प्रयत्न कराल. भेटूयात पुढील लेखात !!!

लेख 5 – आपले सण - आपल्या सणांचे खगोलीय महत्व

-अक्षय भिडे