अशी असावी जिद्द

दिंनाक: 09 Sep 2017 12:34:48


बाबू आणि त्याचे आई - बाबा असं एक त्रिकोणी कुटुंब. स्वतःचं म्हणावं असं त्याचं घरच नव्हतं, गावही नव्हतं. ज्या गावात ते जात ते गाव त्यांचं होई आणि ते त्या गावाचे. जिकडे काम मिळेल तिकडे त्यांची पालं (घरं) थाटली जात. कामासाठी सतत स्थलांतर करणारी ही लोकं एका ठिकाणी खूप कमी वेळासाठी थांबत, अपार कष्ट करत. बाळू तसा ९-१० वर्षांचा असला तरीही अजून शाळेची पायरी चढला नव्हता आणि सततच्या फिरत्या बिऱ्हाडामुळे त्याच्या आई - बाबांना हा विचारच कधी शिवला नव्हता. त्यामुळे शेतात काम करणे, त्यातून मिळणारी अर्धी भाकर खाणे आणि मित्रांसोबत विविध प्रकारचे खेळ खेळणे हा त्याचा नेहमीचा उद्योग. त्यामुळे खेळत तो अगदी पारंगतच होता.

एकदा बाळूचं कुटुंब एकदा लहानशा गावात उतरलं. गावाच्या प्रवेशद्वाराजवळच शाळा होती. गावात शिरतानाच गुरुजींनी बाळूच्या वडिलांना गाठलं आणि बाळूचं नाव शाळेत दाखल करून घेतलं. बाळूचा बा म्हणाला, “गुरजी, आम्ही न्हाय त न्हाय, पण आमचं पोरगं शिकलं तं उद्या साहेब व्हईल. पाठवतो  उद्यापास्न.” असं म्हणून बाळूच्या शाळेचा श्रीगणेशा झाला. शाळेत पहिल्या दिवसापासूनच बाळूचे जुने फाटलेले कपडे, त्यात त्याचा थोडं मोठं दिसणं, सोबतीला वह्या, पुस्तके, पाटी, पेन्सिल नसणं यांमुळे सहा महिने आधीपासून रुजू झालेली मुलं त्याला हिणवत असत. सुजल नावाचा वर्गातील सर्वात हुशार मुलगा तर आपल्या हुशारीचा तोरा मिरवत त्याला सतत त्रास देई. बाकडे पाटी- पेन्सिलचा हट्ट करूनही पैशाअभावी त्यांच्याकडून आश्वासनाशिवाय काही मिळालं नाही. परिणामी वर्गात त्याला काहीच लिहिता येत नसे. तो सारं काही मग आपल्या डोळ्यातच साठवत बसे. खेळाच्या स्पर्धामध्ये मात्र त्याने सर्वच प्रकारांत बाजी मारली. त्यामुळे वर्गात तो मुलांचा लाडका होऊ लागला.

एकदा शाळेत हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले गेले. त्याकरता नावनोंदणीची सूचन वर्गात फिरून गेल्यावर इच्छुकांनी गुरुजींकडे नावनोंदणी केली. बाळूला मात्र पाटीपेन्सिल नसल्याने लिखाण जमत नसे, त्यामुळे त्याने याचा विचार केला नाही. स्पर्धेच्या १५ दिवस आधी गुरुजींनी सहभागी विद्यार्थ्यांची नावे वर्गात वाचली. त्यात स्वतःचे नाव ऐकून बाळू चकीत झाला. त्याला काही कळेना. सुजल मात्र त्याच्याकडे पाहून हसत होता. बाळूला झाला प्रकार लक्षात आला. मात्र त्याने त्या प्रसंगावर जिद्दीने मात करायचे ठरवले.

बाळू निराश चिंताग्रस्त असला की, दर वेळी नदी किनारी जाऊन बसे. नदीचं, त्याचं नातं तसं फार जुनं होतं. ज्या ज्या गावात तो जाई तेथील नदीकाठी त्यांची पालं वसत. त्या नद्यांशी तो आपलं नातं लहानपणापसूनच जोडत आला. त्या दिवशी विचारात मग्न असलेला बाळूला अचानकपणे वाळूवर लहानसा खेकडा चालताना दिसला. त्याच्या चालण्याने वाळूवर उमटलेली छानशी नक्षी त्याच्या नजरेत चटकन भरली आणि बाळूला काहीतरी उमगले. त्याने तातडीने नदी किनारची वाळू पसरवली त्यावर वर्गात पाहिलेले एक-एक आकार तो गिरवू लागला. त्याला या गोष्टीचा जणू छंदच लागला. सात आठ दिवसांतच तो चांगलीच अक्षरे गिरवू लागला आणि स्वतःच यावर खूशही झाला.    

शेवटी स्पर्धेचा दिवस उगवला. सुजल आपलाच पहिला क्रमांक असणार या खुशीत होता. स्पर्धा सुरू झाली. सुजल सारखा बळूकडे पाहून हसत होता. बाळू मात्र त्याच्याच विश्वात. स्पर्धा संपली आणि निकालाचा दिवस आला. निकाल जाहीर होण्यापूर्वीच बक्षीस घेण्यासाठी सुजल पुढे सरसावला. पण बाळूच्या नावाचा पुकारा ऐकताच तो थबकला. शरमेने गोरामोरा झाला. बाळूने जाऊन बक्षीस स्वीकारले. त्याला पाटी-पेन्सिल देऊन त्याच्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले. बाळूला खूप आनंद झाला होता.

इकडे सुजालला स्वतःच्या कृत्याची लाज वाटू लागली. त्याने जाऊन बाळूची माफी मागितली. बाळूनेही त्याला चटकन माफ केले व आपल्याला ही प्रेरणा दिल्याबद्दल त्याचे आभारही मानले. त्या दिवसापासूनच दोघे अगदी पक्के मित्र झाले.

- सावली जनार्दन म्हात्रे

[email protected]