नाटक

लहान थोरांना मनापासून आवडणारा मनोरंजन विश्वातला प्रकार म्हणजे नाटक, नृत्यगीत, अभिनय या तिन्हींच्या अप्रतिम एकीकरणातून साकार होणार, हे नाटक नावाचं रसायन खरोखर अद्भुत म्हणायला हवं. परवाच ‘मुक्ता बर्वे’ या अभिनेत्रीचे विचार वाचले. ‘हृद्यांतर’मध्ये दोन लहान मुलींच्या आईची भूमिका वठवणारी ही गुणी अभिनेत्री. ‘आता  तुम्हाला यापुढे नवीन काय करायला अवाडेल?’ या प्रश्नावर ती उत्तरली, ‘आता मुलांसाठी नाटक करायचा विचार आहे.’ त्यांना मुलांसाठी नाटक करावसं वाटतंय तेसुद्धा स्वतः अभिनयाचं उत्तुंग शिखर गाठल्यावर याचं खूप अप्रूप वाटलं आणि मनापासून समाधानही वाटलं.

आजची मुलं काय करतात त्यांच्या फावल्या वेळात? काय पाहतात? काय ऐकतात? याचा विचार केला, तर भयानक वास्तव समोर येतं. व्हिडीओ गेम्स, मोबाईल गेम्सनी मुलांच्या मनाचा कब्जा घेतलाय. ब्लू व्हेल, गो पोकेमॉन गो.. यांसारख्या अनेक खेळांनी मुलांच्या भावविश्वात खळबळ उडवून दिलीय. त्यांना झिंगाटसारखी गाणी आवडू लागली आहेत.

'असं कां?' याचं उत्तर शोधताना हाती येतं एक कटू सत्य. मुलांना खूप एकाकी वाटतं. आई-वडील आपापल्या कामात बिझी. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नसतो.

जिथं पैसा पुरेसा असतो, तिथे अधिकच्या अपेक्षेने पालक उर फुटेस्तोवर धावत राहतात घरात विभक्त कुटुंबपद्धतीमुळे, आईबाबा आणि एखादंच मूल. मग त्याच्या वाढीच्या वयात त्याच्या भावनिक गरजा पूर्ण न करता आल्यानं मनातून खंतावलेले आई-बाबा त्यांची भरपाई पैशांच्या जोरावर मोबाईल, टी.व्ही., व्हिडीओ गेम्स इत्यादींमधून करू पाहतात त्यात आजची पिढी खूपच शार्प. त्यांना हवं ते कुठून आणि कसं मिळवायचं हे त्यांना बरोबर कळतं. यातून भलभलत्या मार्गांना मूल वळतात. याचं मुख्य कारण पालकांचा मुलांशी नीट संवादच होत नाही. संवाद हरवलाय. जिथं, आजी-आजोबा घरात असतात, तिथं थोड्याफार प्रमाणात तरी तो संवाद होतो संस्कारही होतात, पण अशी कुटुंब फार कमी आढळतात. मग यावर उत्तर काय? मुलांच्या भावभावनांना योग्य प्रकटीकरणाची दिशा मिळायला हवी असेल त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला हवं असेल तर नाटकासारखं उत्तम मध्यम दुसरं नाही.

अगदी लहान वयाच्या मुलांना राक्षस, पऱ्या, जादुगार अशासारख्या फॅन्टसीच्या जगात रमायला आवडतं. त्यापेक्षा जरा वरच्या वयोगटातल्या मुलांना साहसी नायक-नायिका भुरळ घालतात. त्यापुढच्या वयोगटातल्या मुलांना वास्तवातल्या त्यांच्या समस्यांची उत्तरं शोधण्यासाठी ते विषय लक्षात घेऊन त्याकडे वळावंस वाटतं. या सर्व भावनिक गरजा नाटक पूर्ण करतं.

नाटक हे मुलांना सुंदर दालन उघडून देतं, एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. जिथं त्यांच्या वेगवेगळ्या कल्पनांना अवकाश मिळतं. जिथं मुक्तपणे संचार करता येतो. नाटकात खऱ्याचा आभास निर्माण होत असला तरी त्यातून मिळणारा निखळ आनंद मुलांना खूप हवाहवासा वाटतो. लहानपणी घर-घर, शाळा-शाळा, लुटुपुटूची बाहुलाबाहुलीची लग्न, भातुकली यांसारखे खेळ खेळताखेळता मूल त्याच्याशी एकरूप होऊन जातात. मुलांच्या नाटकाची ही छोटी आवृत्तीच म्हणता येईल. यादृष्टीनं पु.लं.चं 'वय मोठम खोटम' या नाटकाचाही विचार होऊ शकतो, यात मुलांचं भावविश्व किती तरलपणे नाटकारानं दाखवलंय, त्यात मध्येच विनोदही घडतो. एकीकडे मनोरंजन होत असताना संस्कारही होत असतात. लहान वयात शाळेतला संस्कार मोठं झाल्यावरही तसाच राहतो. तो अमीट ठसा असतो, जीवनभर आपली साथ देतो.

मुलं अनुकरणशील असतात. त्यांचं मन टीप कागदासारखं असतं, समोर दिसेल ते तसच्या तसं आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं. अनुकरणाच्या या गुणातूनच आनंददायी चैतन्यदायी नाट्यनिर्माण होतं.

मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला संपन्न बनवायचं काम नाटक करतं. नुसतं नाटक पाहायला जायचं तर मुलांच्यात एक वेगळाच उत्साह संचारतो, नाटक सुरू झाल्यावर तर त्या भूमिकेशी मुलं तादात्म्य पावतात. त्या पात्राच्या सुख-दु:खाशी एकरूप होतात, जणू एका परीनं ती भूमिका जगतात आणि एक निखळ आनंद त्यांना मिळतो.

नाटकात काय करायला मुलांना खूप आवडतं वेगवेगळया भूमिकेत शिरून त्यांच्या सुख-दु:खाना व्यक्त करण्यात खूप मजा वाटते. यातूनच मुलं कितीतरी गोष्टी शिकतात प्रत्येक काम मन लावून नीटनेटकं करणं, वेळच्या वेळी करणं, खाण्यापिण्याच्या योग्य सवयी, अभ्यासवृत्ती, उत्तम निर्णयक्षमता मोठ्यांना आदर देणं या सर्व गोष्टी त्यांच्या अंगी बाणतात. आपल्या जवळची वस्तू वाटून घ्यायची असते. एक तीळ सात जणांनी म्हणतात ना तसं हे त्यांना समजतं त्यातला, देण्यातला आनंद कळतो. चारचौघात उभं राहून धीटपणानं आपलं म्हणणं मांडता येतं. उद्धटपणा सोडून विनम्रपणा येतो, मित्रांच्या सहकलाकारांच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव बनतो. खरं-खोटं. चांगलं-वाईट याची ओळख पटते. जुनं ते सोनं म्हणून जुने संस्कार रुजवताना नवं ते हवं म्हणत, योग्य तेवढं आत्मसात करायला मुलं शिकतात.

एक संपन्न व्यक्तिमत्व घडवायला नाटक फार उपयुक्त ठरतं म्हणून व्यक्तिमत्त्व विकासामध्ये नाटकाचा रोल फार मोठा ठरतो. आता मुलांनी पाहायचं, करायचं तर त्यासाठी आधी नाटकाची संहिता (स्क्रिप्ट) तयार करावी लागते. एखादा विषय घेऊन तो एका कथानकात संवाद माध्यमातून गुंफला जातो, मात्र त्याची सुरुवात - मध्य दोन्ही उत्कंठावर्धक असावे लागतात सगळं पाहायला पुढे काय होईल त्याची कल्पना करण्यात मुलं गुंतत जातात.

नुसती संहिता हाती आली तर नाटक होत नाही. वेगवेगळी पात्र आपल्या अभिनयानं जिवंत करणारे कलाकार लागतात. या सर्वांना एकत्र आणणारा, योग्य हालचाली देऊन दिशा देणारा दिग्दर्शक लागतो. याशिवाय बॅक स्टेज आर्टिस्ट, रंगभूषाकार, केशभूषाकार, वेशभूषाकार संगीतकार, गीतकार अशी कितीतरी मोठी फौज लागते या सगळ्यांच्या सहकार्यानं नाटक जिवंत होतं. पण खरंच हे नाटक आलं तरी कुठुन? त्याचे पितृत्व कुणाकडे जाते?, याबद्दल सविस्तर चर्चा करू या आपण पुढच्या वेळी.