पिटुकला उंदीरमामा पहाटे पहाटे उठला
गालात हसून बाप्पाला 'गुड मॉर्निंग' म्हणाला
बाप्पा म्हणाला 'उंदीर मामा, तयार व्हा लवकर
जय गणेश , जय गणेश ऐकू येतोय गजर'
उंदीर म्हणतो 'श्रीमंत, तुमचा होणार मेक ओव्हर 
चहूकडे दिसू लागला बघा हा फेस्टिवल फिव्हर'
बाप्पा लागला सजायला, दागिने लागले चढायला
मोठे मोठे डोळे करून उंदीर लागला बघायला
सोन्याची लयलूट सारी, कलाकुसर अती सुंदर
सोन्याचेच वस्त्रालंकार, सोन्याचेच केले मखर
दूर्वा फुले सोन्याचीच, नाही त्यांना सुवास
सोन्याचेच मोदक सारे, घेणार कसा त्यांचा घास
उंदीर गेला घाबरून आणि बाप्पा गेला दबून
बाप्पा म्हणे 'उंदीरमामा, चल बाबा इथून'
उंदीर म्हणे 'कबूल बाप्पा, आहे मी वाहन तुझे
पण चाळीस किलो सोन्याचे 
कसे रे मी वाहू ओझे ?'
- अनिता करंदीकर
 
बाप्पा आलेत की कवी असे अंतर्मुख होतात. या कवितेतल्या कवयित्रीही अशाच अंतर्मुख झाल्या आहेत. त्यांनी वापरलेली भाषा लहान मुलांना आकर्षित करणारी आहे तशीच ती मोठ्यानाही आकर्षित करते आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही कविता मुद्दाम देत आहोत. 
कशी वाटली नक्की कळवा.