गारगोटी येथील लेखक विनायक चौगले यांचा 'मनाची स्पंदने' हा कथासंग्रह अक्षर प्रकाशन, आजरा यांनी प्रकाशित केलेला आहे. एकूण बारा कथांचा संग्रह असणाऱ्या या सचित्र पुस्तकाचे मुखपृष्ठ साजेसं आणि बोलकं करण्यात मुखपृष्ठकार यशस्वी झाले आहेत. सतत मुलांच्यात रममाण होणारे, उपक्रमशील चौगले सर प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील एक हिराच म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यांना अनेक सामाजिक संघटना व संस्थेकडून  मिळालेल्या पुरस्कार बरोबरच जि.प.कोल्हापूरने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला  हीच त्यांच्या कार्याची पोहोच होय. 
मुले आणि शिक्षक यांचा संबंध फारच घनिष्ठ असतो. कधी कधी आपल्या मर्जीनुसार वागणाऱ्या मुलांनी एखादी गोष्ट मिळवायची म्हंटलं तर तिच्या मागे ती अशी काय लागतात की जीव धोक्यात असला तरी मागे हटत नाहीत. प्रसंगी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्यांशी खोटं बोलायलाही ती मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्या अशा कृत्यामुळे काहीजणांवर जीव गमावायची वेळ येते. मुलांची ही मानसिकता लेखकाने पहिल्याच कथेत अगदी अचूकपणे टिपली आहे. मुले घडवण्याबरोबर ती वाचण्यातही शिक्षक कुठेच कमी पडत नाही. हे नकळत सर पटवून देतात की काय? असे वाटते. त्यांच्या अशा लेखणीमुळे  कथा वाचताना मन अधीर होऊन पुढं पुढं पळत राहतं. त्यामुळे वाचकाला खिळवून ठेवणे हे त्यांच्या लेखणीचं वैशिष्टय म्हणावे लागेल.
आजी म्हटलं की सर्वांशी आपुलकीने वागणारी स्त्री. आजच्या जमान्यात वृद्धाश्रमामुळे तिचे अस्तित्व हरवत चालले आहे. लेखकाला भेटलेली तानुआजी फारच प्रेमळ आणि दूरदृष्टीनं वागणारी होती. लाघवी बोलण्याने तिने भरपूर माणुसकी मिळवली, पण आजच्या जमान्यातील माणसासारखी ती संकुचित जीवन जगली नाही. म्हणूनच सारे जण तिच्या मदतीला धावायचे. ग्रामीण संस्कृतीत वाढल्याने ती दुसऱ्यांची मने जाणणारी होती. हे दुधपावडरीच्या डब्यावरून कळते. सारा समाज साक्षर करणारा शिक्षक समाज वाचण्यातही कमी नाही हे त्यांच्या कथेतून समजून येते. तर आजच्या पिढीला आवश्यक असणाऱ्या आजीचे अनेक पैलू आपल्या कथेतून लेखकाने समाजासमोर मांडलेत याचा अभिमानही वाटतो. यातून भविष्यात समाजमन आजीविषयी सहानुभूती बाळगेल अशी आशा व्यक्त करण्यास काही हरकत नाही.
एखाद्या घटनेतून मुलांची मानसिकता बदलली की त्यांचे जीवनच उध्वस्त होते की काय असे वाटते. त्याची झळ पालक, शिक्षक व विद्यार्थी या सर्वांनाच बसते, हे वास्तव आहे. अशा वेळी पालक आणि शिक्षक यांच्या संगनमताने त्याचे जीवन पूर्वपदावर येऊ शकते हे 'जॉर्ज पास झाला' या कथेतून पक्कं समजून येतं. अशा वेळी शिक्षक आपल्या पेशाबरोबर पालकत्वाचीही जबाबदारी पार पाडत असतो. हे सत्य वाचकासमोर मांडण्याचा लेखकाचा प्रयत्न महत्त्वाचा वाटतो. थोडक्यात काय तर, आजच्या जमान्यात शिक्षकाची डागाळलेली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न लेखक आपल्या कथेतून करत आहे असे समजून येते. स्वकमाईत समाधान मानणारी बरीच माणसे समाजात आहेत. अशी माणसे भ्रष्टाचाराला आपल्या जीवनात कधीच थारा देत नाहीत. जेव्हा सारे जण स्व-कमाईत सुख मानतील तेव्हाच भ्रष्टाचारमुक्त समाज, भारत निर्माण होईल. त्यासाठी 'लोकशाहीतील आप्पा' या कथेत लेखकाने जे मांडलेय ते लहानपणापासूनच मुलांच्या मनावर वाचनातून बिंबवता आले तर आदर्श समाज निश्चितच निर्माण होईल.
माणसाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असला तरी त्याचे स्वरूप वेगवेगळे असते. कोणी संघटीतरित्या त्याला विरोध करतो. तर कोणी त्यापुढे हतबल होऊन त्याचा स्वीकार करतो. म्हणून तर एकेकट्याच्या लढ्याला कधीच यश नाही. आयुष्यभर हातावरच्या पोटासाठीची लढाई त्यांना लढावीच लागते. नियतीपुढे हतबल झालेल्या कांचन मावशीची गत मन हळहळायला लावते. मुलांना परिस्थितीची जाण असेल तर जिद्दीच्या जोरावर ती आपलं भविष्य उज्वल करू शकतात. अशा मुलांच्या जिद्दीला पाठबळ देणाऱ्या शिक्षकाविषयी त्यांच्या मनात कायमस्वरूपी आदराची भावना असते. आजच्या इंटरनेटरूपी युगात जिद्द आणि बालपण हरवून बसलेल्या मुलांना लेखक आपल्या कथेतून जिद्द बाळगण्याचा मोलाचा संदेश देत आहेत. मेसकाठी तोडणाऱ्या मजुराची नोट शोधून दिल्यावर त्या नोटेवरील सत्याची शिकवण देणाऱ्या गांधीजींच्या फोटोत मुलांचा चेहरा पाहणारा मजूर वाचल्यावर शाळेचे संस्कार कळून येतात. 
नोकरीत कष्टाच्या जोरावर स्वतःचा उत्कर्ष करणारी माणसं पारदर्शी असतात. अशी माणसं सहकाऱ्यांना नकोशीच असतात. त्यांच्या कटकारस्थानामुळे ते  नोकरी गमावतात तेव्हा ती समाजाला कायमचीच टाळतात. हे असे न करता येणाऱ्या बिकट प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता प्रत्येकात असली पाहिजे. ही मानसिक कमतरता कथेतून समाजासमोर मांडण्याचा लेखकाचा प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. अभ्यासावर मुलांची हुशारी अवलंबून नसते हे शिक्षकालाही माहीत असते. तरीही हाडाचा शिक्षक त्यांच्या प्रगतीसाठी झटत असतो, हे 'मिलिंद' या कथेतून लेखक पटवून देतो. निसर्गाच्या सानिध्यात राहिलेल्या मुलांसमोर जीवघेणा प्रसंग उद्भवल्यास बुद्धीचातुर्याच्या जोरावर तो प्रसंग ती सहज हाताळतात. हे सूक्ष्म निरीक्षण लेखकाने आपल्या कथेतून मांडून, मुलांसमोर कठीण प्रसंगाशी दोन हात करण्याचे धाडस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हल्ली कुसंगतीचे परिणाम चांगल्या मुलांना भोगावे लागत आहेत हे वास्तव आहे. याकडे समाज, पालक, शिक्षक या सर्वांनी जागरूकपणे पाहिले पाहिजे, अन्यथा अनेक पिढ्या बरबाद झाल्याशिवाय राहणार नाहीत. हा समाजहितैषी संदेश लेखकाने आपल्या लेखणीद्वारे दिला आहे. परिस्थितीने आपल्यासमोर ठेवलेला प्रसंग मान्य करून बरीच मुले शिक्षण घेत असतात. चांगले शिकूनही त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. हा दोष कुणाचा समजावा? हेच कळत नाही. मग समोर आहे त्याचा मुकाट्यानं स्वीकार करण्यातच काहीजण समाधान मानतात.
शिक्षकाची सेवा बजावताना जे अनुभव आले त्यांना पुस्तकरूप देऊन लेखकाने मनाची स्पंदने समाजासमोर मांडली. या पुस्तकातील सर्वच कथा सुंदर आहेत पण लेखकाने त्या कमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला.जर आवाका थोडासा वाढवला असता तर त्या आणखीही दर्जेदार झाल्या असत्या. या धावत्या युगात वाचकाच्या वेळेचाही विचार लेखक करताना दिसतात. कुठेही शब्दांची ओढाताण दिसत नाही. जसं सुचलं तसंच मांडण्याचा लेखकाचा प्रयत्न अगदी गौरवार्थ आहे. भविष्यात बालमनावर हे पुस्तक संस्कार करून एक आदर्श समाज निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल अशी आशा वाटते. 
- बा.स.जठार 
mailto:[email protected]com
..... ............................................. 
पुस्तकाचे नाव - मनाची स्पंदने
लेखक - विनायक चौगले
प्रकाशक - अक्षर प्रकाशन आजरा
पृष्ठे - ६०
किंमत - ५० रूपये
.................................. ..............