दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या हिंदूंचा एक प्रमुख सण व शुभदिवस. अश्विन शुद्ध दशमीलाच ‘विजयादशमी’ किंवा ‘दसरा’ असे म्हणतात. या अनादिकालापासून चालत आलेल्या उत्सवाची मुळे पार पुराणकाळापर्यंत जाऊन भिडतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे नवरात्र असते, याची समाप्ती या दिवशी होते. त्रिलोकात उत्पात माजवणार्‍या शुंभ आणि निशुंभ, रक्तबीज, महिषासूर इ. राक्षसांना मारण्यासाठी शक्तिदायिनी माता, दुर्गेने चंडीचा अवतार धारण केला. नऊ दिवस नऊ रात्र युद्ध करून आपल्या अष्टभूजांतील तीक्ष्ण शस्त्रांनी या राक्षसांचा नि:पात केला. दशमीला महिषासूराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला. म्हणून स्वर्लोकी देवादिकांनी आणि भूलोकी मानवांनी आनंदोत्सव साजरा केला; तेव्हापासूनची ही परंपरा आहे. विजयादशमीच्या दिवशी आकाशात तारका दिसू लागतात, ‘विजय’ नावाचा मुहूर्त असतो; त्या वेळी जे काम हाती घ्यावे त्यात यश मिळते, असे पुराणात वर्णन केले आहे. हिंदूंच्या साडेतीन विशेष शुभ मुहूर्तातील हा एक आहे.

प्रयत्नाने इच्छित ध्येयापर्यंत गेल्यावर जी अवस्था प्राप्त होते तिला ‘विजय’ असे म्हणतात. सार्थकता, शौर्य व स्थिरता विजयात आहे. दसरा म्हणजे दश = दहा इंद्रिये + हरा = विजय मिळविणे. आत्मशक्तीने दहा इंद्रियांवर विजय मिळवून मोहाच्या महिषासूराला मारण्याचा दिवस म्हणजे ‘विजयादशमी’ होय. विजय मिळवून देणार्‍या महत्त्वाच्या साधनांचे म्हणजे शस्त्रांचे पूजन या दिवशी केले जाते. आपल्या संस्कृतीत शस्त्रांचे महत्त्व असाधारण आहे. आपण अनन्यभावे ज्यांची पूजा करतो, त्या प्रत्येक देव-देवतांच्या हातांमध्ये शस्त्रे आहेत. वर्षानुवर्षे षोडषोपचारे पूजा करताना देवांमधील हे साधर्म्य आपल्या लक्षात आले आहे का?

आता नीट निरखून बघूयात. विघ्नहर्त्या श्री गजाननाच्या हातात धारदार ‘परशू’ आहे; भगवान शिवशंकरांकडे ‘त्रिशूल’ आहे, प्रभू श्रीराम कोदंडधारी आहेत; श्रीकृष्णाच्या ‘सुदर्शन चक्रा’ने अनेक अधमांची शिरे धडावेगळी केली, जेजुरीच्या खंडेरायाच्या हातात ‘खंडा’ म्हणजे भलीमोठी तलवार आहे आणि शक्तिरूपीणी अशा त्या अंबा, भवानी, जगदंबा, दुर्गा, काली, चंडी या देवतांच्या सर्व हातांमध्ये शस्त्र आहेत शस्त्र! कशासाठी ही शस्त्र?

‘परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम् ।’ सज्जनांचे रक्षण व दुर्जनांच्या विनाशासाठी या अवतारी शक्तींनी शस्त्रांचा आधार घेतला. त्या साहाय्यभूत दिव्य शस्त्रांचे पूजन करण्याचा दिवस म्हणजे ‘विजयादशमी’.

बारा वर्षांचा दुर्दैवी वनवास भोगलेल्या पांडवांनी एक वर्षाच्या अज्ञातवासासाठी विराट नगरीचा आश्रय घेतला. त्याचा सुगावा लागलेल्या कौरवांनी त्यांना ओळखून पुन्हा 12 वर्षे वनवासात पाठविण्यासाठी विराटनगरीवर हल्ला चढविला. अर्जुनाने अज्ञातवास संपल्यावर शमीच्या झाडावर बांधून ठेवलेले आपले शस्त्र काढून, राजकुमार उत्तर याच्या रथावर आरूढ होऊन कौरवांचा पराभव केला, तो हा दिवस!

नवग्रह पालथे घालून, त्रिलोकावर जुलमी सत्ता चालविणारा दशानन रावण, ज्याने आर्यावर्तातील सर्व आश्रम उद्ध्वस्त करून शिक्षण व्यवस्थाच उलथून टाकली. या गुरुकुलामधून भावी काळात आपल्या सामर्थ्याला आव्हान देणारे कोणी तयार होऊ नये, यासाठीच हा अतिरेक. रावणाचा हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्व भारतवर्षातील सज्जनशक्तीचे संघटन उभे केले. सार्‍या समाजाचे ऐक्य व प्रेम मिळविण्यासाठी श्रीराम सुग्रीवासारख्या राजाकडे गेले, तसेच शबरीमाईच्या झोपडीतही गेले. समाजातील भीरूता, दौर्बल्य दूर करून शत्रूच्या घरात घुसून त्यांनी त्याचे पारिपत्य करण्याची शक्ती जनतेत जागवली. इंद्रजीत, कुंभकर्ण अशा अपराजितांना संपवून, मदांध रावणाचा वध प्रभु श्रीरामांनी केला आणि भारतभर विजयादशमी साजरी झाली. अन्यायाचे राज्य संपलेे. रामराज्याची पहाट उगवली.

विजयादशमीबद्दल एक अत्यंत सुंदर कथा आहे. भगवान श्रीरामांचे पणजे महाराज ‘रघु’ यांनी विश्‍वजित यज्ञ केला व आपल्याजवळचे सर्व धन दान करून टाकले. एके दिवशी त्यांच्या दारात वरतंतू ऋषींचा शिष्य ‘कौत्स्य’ आला. कौत्स्याने अध्ययन समाप्तीनंतर आपल्या गुरुंकडे गुरूची इच्छा नसतानाही ‘काहीतरी गुरुदक्षिणा मागाच’ असा हट्ट धरला होता. त्याचा आग्रह पाहून गुरूंनी त्याला ‘चौदा कोटी सुवर्णमुद्रा’ गुरुदक्षिणा म्हणून मागितल्या. कौत्साने त्याबद्दल रघुराजाकडे याचना केली. सर्व धन दान केल्यामुळे रघुराजाचा खजिना तर रिता झाला होता. दारी आलेला याचक रिक्त हस्ते परतू नये यासाठी रघुराजाने इंद्रावर स्वारीची योजना केली, हे समजताच भयभीत इंद्राने अयोध्येच्या इशान्येला एका आपट्याच्या व शमीच्या वृक्षावर कुबेराला सांगून अगणित सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. कौत्स्याने त्यातील फक्त आपल्या गरजेपुरत्याच चौदा कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या व आपल्या गुरूंना अर्पण केल्या. तो हा दिवस विजयादशमीचाच. गरजेपुरते घेतो तो ऋषी होतो. हव्यासाने दु:खी होण्यापेक्षा संतोषी असावे, असे ही कथा सांगते.

मराठेशाहीत दसर्‍याच्या सीमोल्लंघनाला मोठे लष्करी महत्त्व प्राप्त झाले. दसर्‍यापूर्वी चार महिने पावसामुळे नदी, नाले भरभरून वाहत. त्यामुळे मोहिमा थांबत. सैनिक व सरदार यांना त्यामुळे विश्रांती मिळे व घरची शेतीभातीची कामेही मार्गी लागत. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू झाला, की मग सर्वांच्या अंगात नवा उत्साह संचारू लागे. दसर्‍याचे सीमोल्लंघन होताच मराठे सरदार व राजे पुढच्या मोहिमांचे बेत त्याच मुहूर्तावर ठरवित.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात तसेच पुण्यात पेशव्यांच्या शनिवारवाड्यात थोरल्या देवघरात नवरात्र बसत असे. याचे उल्लेख इतिहासात सापडतात. भगवा झेंडा व जरीपटका हे जुन्याच्या जागी नवे करून त्यांची पूजा करीत व ते ईशान्य बुरुजावर उभारले जात.

सायंकाळी सीमोल्लंघनाच्या स्वारीचा थाट असे. छत्रपतींचा प्रत्येक सरदार आपापले निशाण घेऊन स्वारीत सामील होई. या मिरवणुकीत हत्ती, घोडे, उंट, तोफांचे गाडे व लहान तोफांचे रेकले असत. छत्रपतींची हुजुरातीची फौज या दसरा स्वारीत आघाडीला असे.

मग नगराच्या ईशान्य दिशेस ‘विजय’ मुहुर्तावर शमीपूजन होई. ते झाल्यावर छत्रपती किंवा पेशवे जवळच्या शाळूच्या शेतातील एक तण कणसासह उपटून घेत व त्याबरोबरच त्याखालची थोडी ओली मातीही घेत. याप्रसंगी तोफा बंदुकांच्या फैरी झडत. मग ते सर्व चतुरंग सैन्य परत फिरून निरनिराळ्या रस्त्यांनी आपापल्या गोटात जाई व त्या सैन्यावरचे अधिकारी लोक दरबारासाठी राजवाड्यात येत.

दसर्‍याच्या दिवशी भरणार्‍या दरबारात कित्येकांना नवीन पदव्या दिल्या जात. दरबारात एकेक सरदार क्रमाक्रमाने उठून छत्रपतींचा किंवा पेशव्यांना पतळी, मोहर किंवा होन या स्वरूपात प्रत्यक्ष सोन्याचा नजराणा देई. त्यावेळी भालदार त्या त्या सरदाराचे नाव खड्या स्वरूपात उच्चारून ललकारी देत. दसर्‍याचा हा दरबार आटोपल्यावर आवश्यकतेप्रमाणे किंवा पूर्वयोजनेप्रमाणे मराठे वीर लगेच स्वारीवर निघत. अशा स्वारीची काही ठळक उदाहरणे खालीलप्रमाणे -

इ.स. 1639 चा दसरा साजरा करून शहाजीराजांनी जिजाबाई व बालशिवबा यांच्यासह बंगलोरला प्रयाण केले. इ.स. 1956 साली दसर्‍यास मोहीम करून शिवाजी महाराजांनी सुपे घेतले. शिवाजी महाराजांची बंकापुरावरील स्वारी इ. स. 1673 च्या दसर्‍यासच निघाली. छत्रपती संभाजी महाराजांनी बर्‍हाणपुरावरील स्वारीचे प्रस्थान इ.स. 1681 च्या दसर्‍यासच ठेवले.

दसर्‍याच्या दिवशी इष्ट मित्रांना सोने वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत. असे हे विजयी वीर मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळी. मग ते या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत असत. घरात गेल्यावर आणलेली संपत्ती देवासमोर ठेवीत असत. नंतर देवाला व वाडवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत. या घटनेची स्मृती सांप्रत आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक आहे.

आजही दहशतवाद, भ्रष्टाचार, नक्षलवाद, गुंडागर्दी असे अनेकानेक शुंभ आणि निशुंभ भारतात धुमाकूळ घालत आहेत. आजूबाजूच्या देशातून दिवसरात्र घुसखोरी करणारे अनेक रावण इथे आतंकवाद माजवत आहेत आणि म्हणूनच खर्‍या अर्थाने विजयादशमी साजरी करण्यासाठी आम्हाला सज्ज झाले पाहिजे.

 -ज्ञानेश पुरंदरे

[email protected]