आपले आणि माकडांचे पूर्वज एकच होते, हे पदोपदी जाणवतं. त्यांच्या हालचाली, खाण्याची आणि बसण्याची पद्धत आणि महत्वाचं म्हणजे एखाद्या घडलेल्या किंवा घडणाऱ्या घटनेमागे येणारी प्रतिक्रिया आपल्याला मुग्ध करते. आपल्या आसपासच्या जंगलांमध्ये काळ्या तोंडाची माकडं म्हणजेच हनुमान लंगुर आणि लाल तोंडाची माकडं ही सहजगत्या दिसतात. या दोन्ही प्रकारातली माकडं कायम समूहामध्ये राहतात. मोठ्या वृक्षांवर अक्षरशः लगडल्यासारखी दिसतात. तेंदूच्या झाडाची फळं जर पिकलेली असतील तर यांचा उत्साह अवर्णनीय असतो. जंगलात हिंडताना फार कमी लोक यांच्याकडे पाहतात. जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून दाखवतात. यापलीकडे फार कोणी लक्ष देत नाही. फारशी वाट पाहायला न लावता अगदी सहज दिसणारा हा प्राणी आहे. ही जमात टोळीनी जर आली तर कधीकधी ते नाकी नऊ आणतात. माकडाला हाताळणे हे अजिबात सोपे नाही. प्रसंगी ते आक्रमक देखील होतात. त्यांच्या हालचाली आणि डोळ्यातली अगतिकता बरंच काही सांगून जाते.

एक मी स्वतः पाहिलेला प्रसंग सांगतो. डिसेंबर2014 मध्ये बांधवगडला गेलो होतो. तिथे एक विलक्षण अनुभव आला होता. आम्ही जिप्सी मध्ये होतो. दूरवर आम्हाला लंगुरांची एक टोळी शोकसभेला बसतात तशी गोलाकार बसलेली दिसली. अगदी शांततेत. आम्हाला लांबूनच ते दिसत होतं म्हणून आम्ही खुप सावकाश त्यादिशेने जात होतो आणि अचानक शेजारच्या वाळलेल्या गवतामधून काहीतरी मोठ्या आकाराचं झाडाकडे झेपावलं. लगेच नजर तिकडे वळली. बघतो तर एक लाल डोक्याचे गिधाडं.. आम्हाला ते आधी दिसलच नव्हतं. ते काय खात होतं पाहिलं तर त्या गवतात एक मृत लंगुर आढळले. ते गिधाडं या लंगुराला खात होते तर. त्या मृतदेहापासून जवळचं ती टोळी जणू काही आपल्या बळी पडलेल्या मित्राला शेवटचा अलविदा करायला बसावं तशीच बसली होती. मनात चर्रर्र झालं. कल्पना करून पाहा ना, आपल्या  जवळच्या एका मित्राचं शव कुणीतरी खातंय आणि आपण शेजारी नुसते बसलोय. अंगावर शहारा आणणारी गोष्ट आहे ही. आमची gypsy जवळ थांबल्यामुळे त्यांना असुरक्षित वाटतंय हे आम्हाला जाणवू लागलं म्हणून मग आम्ही तिथे फार वेळ थांबलोच नाही. आश्चर्य वाटलं त्या माकडांचं वागणं बघून. अर्थात त्यांनाही भावना असतातच की. पण ते याप्रकारे त्यांच्या अश्रूंना वाट देत असतील हे कुठे माहीत होतं. सांगायचा मुद्दा असा कि, माणसाप्रमाणेच राग-लोभ आणि दु:ख हि माकडे सुद्धा व्यक्त करतात.

असाच एक खटकणारा अनुभव परवा कुंभार्ली घाटात आला. तुफान पाऊस पडत होता. वळणावरच्या बांधलेल्या सिमेंटच्या कट्यावर काही लाल तोंडी माकडे बसली होती. फोटो चांगला येईल म्हणून मी गाडी थांबवली तर ते मी काहीतरी खायला देईन या आशेने चक्क उभं राहिलं. आसपासचे त्याचे सवंगडी पण लगेच पुढे सरसावले. त्यांची वखवख आणि हावभाव पाहून क्षणभर मी गोंधळलो. मला अचानक असं वाटू लागलं कि आपण पुण्यात एखाद्या सिग्नलला तर नाही ना उभे? एवढ्या पावसात ते कोणीतरी खाऊ देईल याकरता वाट पाहात होते कि काय?  कोणी वाढवली यांची वखवख?? आपणच ना.. काय गरज होती, ते समर्थ आहेत त्यांचं अन्न शोधायला. आपण गमंत म्हणून बिस्कीट किंवा काय वाटेल ते देतो आणि मग त्यानाही ती वाईट सवय लागते. वन्यजीवांना शक्यतो अशा खाद्यपदार्थांची सवय लावू नये. त्यांना माहित आहे जंगलातलं काय खायचं आणि काय नाही ते. कशावरून तो मैदा खाऊन त्यांचं पोट बिघडत नसेल, कशावरून या पदार्थांमुळे त्यांना सुस्तता येत नसेल? या गोष्टी आपल्याला कळणार नाहीयेत जोपर्यंत आपण रोज त्यांना पाहात नाही किंवा त्याचा खोलवर जाऊन अभ्यास करत नाही. 

राजस्थानमध्ये रणथंबोरच्या किल्ल्याजवळ टकाचोर (Rufous Treepie) नावाच्या पक्ष्याला अशीच बिस्कीट खायची सवय लावली आहे लोकांनी. का तर तो आपल्या हातावर बसुन खातो म्हणून. उद्या जर वाघ हातानी भरवलेले खातो असं कळलं तर भरवणार आहोत का आपण त्याला?? माणूस म्हणुन आपण तर बिघडलेले आहोतच पण अजून कोणाकोणाला बिघडवणार आहोत, देवच जाणे!

- अमोल बापट