गेल्या महिन्यातील या लेखाच्या पूर्वार्धात मी म्हटलं होतं, "आपण कोणत्याही कलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतो ना, त्याला एक आखीवरेखीव अभ्यासक्रम असतो. म्हणजे काय तर आधी काय शिकायचं, नंतर काय याचा एक मार्ग आखून दिलेला असतो. सोप्याकडून अवघड गोष्टींकडे जाणारा... ... प्रारंभिकपासून विशारद (बी.ए.ची पदवी परीक्षा)पर्यंत विचारपूर्वक आखून दिलेला हा संगीताच्या सात परीक्षांचा अभ्यासक्रम, आपल्याला अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते ख्यालगायनापर्यंतचे शिक्षण घ्यायला मदत करतो. शास्त्रीय माहितीबरोबरच, आपल्या कलेचे सादरीकरण करण्याबद्दल मार्गदर्शन करतो."

म्हणजेच संगीत शिकत असताना परीक्षा का द्यायच्या याबद्दल मी सांगितलं होतं.    

आता यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्याबद्दल....     

सर्वप्रथम संगीत शिकताना हे नेहमी लक्षात ठेवा, की इतर विषय शिकणं आणि एखादी कला शिकणं यांत नेमका फरक काय ? इतर कोणताही विषय शिकताना, एकेक धडा समजून घेतला, त्यावरचे प्रश्न सोडवले की पुढचा धडा....असा रोज नवीन धडा शिकू शकतो. आधी केलेला धडा लक्षात आहे का, हे पाहण्याची गरज नसते. फक्त परीक्षेच्या वेळेस आपण त्या धड्यांची रिव्हिजन करतो. संगीताच्या बाबतीत तुम्हाला शिकलेली गोष्ट लगेच रियाजानं पक्की करावी लागते. आधीची गोष्ट पक्की झाल्याशिवाय पुढची शिकताच येत नाही. त्यामुळे संगीताच्या क्लासच्या वहीत महिनाभरात ४-५ पानंच लिहून होतात. पण ते आत्मसात करायला महिना लागतो. तेही वेळच्या वेळी त्याचा रियाज केला तरच.

तेव्हा तुम्ही काय करायचं, तर सुरुवातीला रोज किमान १०-१५ मिनिटं नियमितपणे सराव करायचा. अगदी अभ्यास करून डोकं शिणलं की फक्त १५ मिनिटं मस्तपैकी गायचं ....वाजवायचं. पाहा तुमचा रियाजही होईल आणि अभ्यासाचा थकवा कुठल्याही कुठे पळून जाईल.. तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. मनावरचा ताण हलका करायला संगीतासारखं दुसरं औषध नाही. या नियमित रियाजामुळे तुम्हाला पुढच्या नवीन नवीन गोष्टी शिकायला कठीण वाटणार नाही. आणि एकदा का तुम्हाला कठीण गोष्टी जमायला लागल्या की शिकण्यातला आनंद आणि उत्साह वाढायला  लागेल.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्वत:ला हा अभ्यास, रियाज करावासा वाटला पाहिजे. त्याची गोडी, आवड ही आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे. कुणी मागे लागून, जबरदस्तीने करण्याची ही गोष्ट नाही. संगीतातील आनंद घ्यायला लागलात की पुढचं सगळं सोपं होऊन जातं. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं करतोय ही भावनासुद्धा सुखावणारी असते.

संगीताच्या प्रत्येक परीक्षेचा एक अपेक्षित स्तर (level) असतो. प्रत्येक वेळी पुढची परीक्षा देताना ती लेव्हल आपल्याला गाठायची असते. ३५ टक्के पासिंग पुरते इतर विषयात चालत असतील, पण संगीतासारख्या कलेत सूर १०० टक्के लागायला लागतो, ताल-लय १०० टक्के अचूक असायला लागतो. तेव्हा कोणतेही शाॅर्टकट न वापरता, पूर्ण अभ्यासक्रम तयार करणं आवश्यक असतं. ही खबरदारी मात्र नक्की घ्यायची असते. नाहीतर अर्धवट अभ्यास करून, कसंबसं काठावर पास होऊन पुढच्या वर्षात गेलात, तर पुढच्या वर्षाचे राग व त्याचे सादरीकरण तुम्हाला जमणारच नाही. तेव्हा फक्त सर्टिफिकिटं मिळवून गाणं येत नसतं, हे माझं म्हणणं तुम्हाला पटेल. चार परीक्षा देऊनही तुम्ही चांगलं गाऊ शकला नाहीत, तर मग लोक म्हणणारच, नुसत्या परीक्षा देऊन कुठे गाणं येतं का? मग मला सांगा यात दोष परीक्षा पद्धतीचा, परीक्षा देणाऱ्याचा का शिकवऱ्याचा...? विचार करा.

परीक्षा देण्यामागे अजून एक कारण असतं. एका वर्षात आपल्याला काय उद्दिष्ट गाठायचंय, याची आखणी करता येते. आपल्या शिकण्यामागे असं काही उद्दिष्ट असणं सुरूवातीला तरी चांगलंच. किमान तीन-चार परीक्षा तरी द्याव्यातच. त्यामुळे ज्याला बेसिक कोर्स (संगीतातील मॅट्रिक) म्हणतात, तो पूर्ण करून आपला तालासुराचा पाया पक्का होतो. मग पुढे शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, नाट्यसंगीत यापैकी आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संगीताकडे वळता येतं.

कोणत्याही क्षेत्रात पाया पक्का होणं खूप महत्त्वाचं असतं आणि हे काम संगीताच्या परीक्षा करतात. एकदा का तुमचा पाया पक्का झाला की, पुढे आयुष्यभर तुम्हाला संगीताचे वेगवेगळे फाॅर्म्स हाताळणं आणि विविध प्रकारे काम करणं सोपं होऊन जातं. म्हणूनच मी सांगेन की संगीताच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारे काम करण्याची इच्छा असेल, तर परीक्षांचा साकल्याने विचार करून आपलं कौशल्य वाढवा. नुसती सर्टिफिकिटं गोळा न करता आपलं ज्ञान आणि कला वाढवा.

संगीत परीक्षा का आणि कशासाठी वाचा खाली दिलेल्या लिंकवर.  

संगीत परीक्षा (पूर्वार्ध)

- मधुवंती पेठे 

[email protected]