भारतीय संस्कृतीची उभारणी शतकानुशतके होत आली आहे. आजचा मानव हा कालचा आदिमानव व उद्याचा महामानव आहे. आणि आजची आवश्यक नीती ‘स्वदेशी व्रताची’ आहे. स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म, स्वराष्ट्र.... यांसाठी भूतकळामध्ये ज्यांनी आपले प्राणही कुर्बान केले, त्या दोन व्यक्ती म्हणजे ‘बाबू गेनू’ आणि ‘शिरीषकुमार! त्यांच्या देदिप्यमान कार्याची यशोगाथा आज आठवू या.

बाबू गेनू हे तत्कालीन काँग्रेसचे सदस्य होते. 1908 साली जन्मलेला बाबू गेनू अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी सामना करत लहानाचे मोठे झाले. घरी आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण, वडील शेतकरी होते. घरात उत्पन्नाचं साधन म्हणजे एक बैल होता. त्या बैलाच्या जीवावर वडील शेतीत मोलमजुरीची कामे करत. परंतु दुर्देव असे की, 1910 साली बाबू गेनू 2 वर्षांचे असताना वडील देवाघरी गेले आणि काही दिवसांतच एकमेव उत्पन्नाचे साधन असलेला बैलही निवर्तला. उपजीविकेसाठी आई आपल्या मुलीला घेऊन मुंबईला आली. बाबू आणि दोन भावंडे तेथेच राहिले. बाबू यांनी अशीच मोलमजुरी करून काही दिवस काढले आणि नंतर ते मुंबईला आईकडे गेले. मुंबईमध्ये नोकरीसाठी  वणवण भटकले, पण त्यांना नोकरीही मिळाली नाही. शालेय शिक्षणापासून वंचित राहिले असले, तरी सामाजिक परिस्थितीचे पडसाद त्यांच्या मनावर उमटत होते. स्वातंत्र्याच्या चळवळीत आपण सहभाग घ्यायला हवा, अशी उत्कट इच्छा त्यांच्या मनात संचारत होती.

अशातच एक घटना घडली. 12 डिसेंबर 1930 चा दिवस ब्रिटनमधून येणार्‍या मालाचा ट्रक मुंबईत प्रवेश करत होता; स्वदेशी चळवळीला उधाण आले होते. बाबू गेनू आणि त्यांचे सहकारी यांनी ट्रकला मुंबईत येण्यासाठी मज्जाव केला, परंतु ब्रिटिश सार्जंट दाद देईना. तेव्हा बाबू गेनू रस्त्यावर ट्रकपुढे आडवे झोपले. पोलिसांनीही त्यांना समजावले. ट्रक ड्रायव्हर भारतीय होता - बलवीर सिंग. तोही ट्रक चालवायला तयार होईना. ‘भारतीयावर मी अशा प्रकारे हल्ला करू शकत नाही’, असे तो म्हणाला, तेव्हा ब्रिटिश सार्जंटचे डोके फिरले. तो रागाने लाल झाला आणि क्रूरपणे त्याने क्षणार्धात बाबू गेनूंच्या अंगावर ट्रक घातला आणि वीस वर्षांच्या कोवळ्या तरुणाचे मस्तक स्वातंत्र्यदेवतेच्या चरणी समर्पित झाले! त्यांचे हे बलिदान वाया जाऊ देता कामा नये.

असाच आणखी एक भारतमातेचा सुकुमार - शिरीषकुमार. नंदुरबारचा. शिरीषकुमार पुत्पेंद्रभाई मेहता हे त्याचे संपूर्ण नाव. 28 डिसेंबर 1926 रोजी जन्मले. त्याची आई सावित्रीबेन आणि वडील पुत्पेंद्रभाई हे राष्ट्रीय स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभागी होते. शिरीषकुमार यांना घरातूनच देशभक्तीचा वारसा मिळाला होता. किंबहुना त्यांनी तो स्वीकारला होता.

‘भारत छोडो’ ही स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात होती. ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांना कैद केले होते. 9 ऑगस्ट 1942 च्या प्रभातसमयी शिरीषकुमारांच्या नेतृत्वाखाली प्रभातफेरी निघाली होती. ‘आम्ही आमचा तिरंगा फडकवणारच’ (we will not bow our national flag at any cost) ‘नही नमशे नही नमशे॥ निशानभूमी भारतम्। अशी त्यांची घोषणा होती. शिरीषकुमारांना पोलिसांनी कैद केले होते. ‘जनतेमध्ये असंतोष निर्माण करणारा’, अशी त्याची ब्रिटिश सरकारमध्ये प्रतिमा होती. शाळेचे हेडमास्तर शंकरराव जोशी यांनी त्याला यामध्ये न पडण्याचा व्यावहारिक सल्ला दिला होता. ‘9 सप्टेंबर 1942’, रोजी माणिक चौकात तिरंगा फडकवयाचाच’ हे ध्येय ठेवून मिरवणूक निघाली. पोलिसांचा लाठीमार चालू होता. या चळवळीत काही मुलीही सहभागी होत्या. त्यांच्यावर लाठीमार होऊ नये; म्हणून शिरीषकुमार नेटाने कार्यरत होते. तेव्हा कोणत्याही ऑडर्स नसताना पोलिसांनी जाळपोळ करण्यास सुरुवात केली. तरीही, हातातला झेंडा सोडायला शिरीषकुमार तसूभरही मागे हटत नव्हते. भगवा झेंडा अभिमानाने उंचावत ‘वंदे मातरम्’च्या घोषणा जोराने चालू होत्या. हे दृश्य पाहून रागाने अनावर होऊन शिरषकुमारांना पोलिसांनी तीन गोळ्या झाडल्या. शिरीषकुमार कोसळले. ध्वज हवेत फडकवत... तोंडाने ‘वंदे मातरम’ म्हणत ... त्यांनी प्राण सोडला. तो झेंडा त्वरीत लालदास बुलकीदास शहांनी हातात घेतला.

 चला तर, आपणही हा स्वदेश, स्वभाषा, स्वराष्ट्र, स्वधर्माचा झेंडा हाती घेऊन उंच फडकवू या. अन् या दोन वीरांना कोटी कोटी सलाम करू या !

- डॉ. अर्चना ढेकणेे.

[email protected]