विवेकाची पूजा

दिंनाक: 25 Sep 2017 12:27:04
 


दुर्गा, भद्रकाली, अंबा, अन्नपूर्णा, सर्वमंगला, भैरवी, चंद्रिका, ललिता, भवानी, मूकांबिका अशा प्रतिमांच्या रूपांत नऊ दिवस पूजली जाणारी देवी! हा नऊ दिवसांचा उत्सव म्हणजे नवरात्र! आपल्या संस्कृतीत नऊ दिवस वेगवेगळी धान्य पेरून दहाव्या म्हणजे दसर्‍याच्या दिवशी ती उगवली, की प्रसाद म्हणून त्यांचं सेवन करायचं आणि पोषणकर्ता म्हणून देवीची पूजा करायची, असा प्रघात आहे. थोडक्यात, दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या तीन रूपांत प्रामुख्याने आपण देवीला वंदन करतो. संरक्षण, संवर्धन, शिक्षण या तीन बाबींशी निगडित तपासून पाहाता येईल.
मित्रांनो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विविध क्षणांना कधी थांबून, कधी बगल देऊन, तर कधी त्यात मिसळून जाऊन आपण सामोरे जात असतो. आजकाल ते क्षण इतके गतिमान बनले आहेत की, थोडं थांबून त्यांच्याकडे पाहायलाही आपल्याला वेळ नाही. आता तुमचंच बघा ना, सकाळी उठल्यापासून क्लासेस, मग शाळा, मग पुन्हा कोणत्यातरी इतर अ‍ॅक्टिव्हिटीजचे क्लासेेस, मग टी.व्ही, इंटरनेट आणि मोबाईल इत्यादी गोष्टींनी तुमचं लहानसं विश्व व्यापून गेलं आहे आणि त्यातून वेळ उरलाच तर आई-बाबांचे उपदेश, ओरडा, नातेवाईकांच्या अपेक्षा, आसपासच्यांचे दृष्टिकोन, शिक्षकांचं दडपण या सगळ्या गोष्टींनी तो वेळ पुरेपूर वापरला जातो. तुम्हीही रडत-खडत का होईना; या सगळ्यांत अगदी तंतोतंत बसला आहात, जणू काही हे सगळं तुमच्यासाठीच बनवलं असावं. त्यातून तुम्हाला कंटाळा आलाच; तरी त्याकडे लक्ष द्यायला तुम्हाला स्वत:लादेखील वेळ नसतोच नाही का?
1ली ते 10वी आपण शिक्षणाच्या एका मोठ्या अवकाशात असतो. जिथे तुम्ही दिवसातला सर्वांत जास्त काळ घालवता, तिथे तुम्हाला काय पाहिजे, कसं शिकवलं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? किंवा तुम्हाला जे समोर दिलं जातंय, ते तुम्हाला शिकायचंय का? हे काहीही लक्षात न घेता शाळा, शिक्षक, बोर्ड, क्लास, शिक्षणतज्ज्ञ, पालक हेच सर्व काही ठरवतात. त्यामुळे तुम्ही शिकता, मोठे होता, मोठ्या पगाराच्या नोकर्‍या मिळवता, पण आनंद आणि समाधान मिळतंच असं नाही. सरस्वतीची पूजा करणं म्हणजे खर्‍या अर्थाने जीवनमूल्य रुजवणार्‍या शिक्षणाची उपासना करणं होय. प्रत्येक गोष्ट तर्काच्या आणि बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहाणं; पण त्याच वेळी चांगल्या गोष्टींवरची श्रद्धा ढळू न देणं. जिथे शिक्षकांचं जगणं मुलांसाठी प्रेरणा बनतं, शिक्षणातून मुलांची विवेकबुद्धी सतत जागी राहाते आणि संवेदनशीलता नवनिर्मिती घडवून आणते, त्या वेळी आपल्याकडून सरस्वतीची पूजा घडते.
सरस्वतीची पूजा आपल्या हातून घडो न घडो लक्ष्मीची पूजा मात्र आपण न चुकता करतो. ज्याच्याकडे लक्ष्मी आहे, त्यालाच आज समाजात जास्त प्रतिष्ठा आहे. आपण कोणत्या पद्धतीचं शिक्षण घेतलं; म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळतील, हे आपण सतत ठरवतो. म्हणजे, शिक्षण अर्थकारणाशी बर्‍याच प्रमाणात निगडित असतं. पण पैशाच्या मागे किती काळ धावायचं? त्याचा विनियोग कोणत्या पद्धतीने करायचा, संपूर्ण आयुष्यात पैशाचं स्थान किती आणि कोणतं? याचा विचार आपण कधी करतो?
दुर्गा रूपातील देवीही आपण पूजनीय मानतो. आजच्या समाजात स्त्री असुरक्षित असताना तर तिचं हे रूप अधिक प्रकर्षानं आठवतं. आपल्याला जन्म देऊन भरण-पोषण करणारी स्त्री तिच्या अस्तित्वाला धक्का पोहोचला; तर दुष्टांचे पारिपत्य करणारी दुर्गाही होऊ शकते. आजूबाजूला आज स्त्रीची अनेक प्रकारे अवहेलना होत असताना, केवळ तिच्यावर बंधनं घालून ती सुरक्षित होणार नाही; तर आई, बहीण, पत्नी, मैत्रीण म्हणून तुमच्या विश्वासाची तिला गरज आहे. तुमचा विश्वास हीच तिची सुरक्षितता आहे. आपल्याशी संबंधित प्रत्येक स्त्रीला हा विश्वास देणं, म्हणजेच शक्तीची किंवा दुर्गेची पूजा करण्यासारखं आहे.
नवरात्रीच्या निमित्तानं देवीची पूजा कशासाठी करायची, हे आपण पाहिलंं; पण आज सभोवार पाहिलं तर कोणत्याही देवतेचा उत्सव करण्यातच माणसं मग्न असलेली दिसतात. म्हणजे, पूजनाचा भाग वगळता मोठमोठ्या आराशी, गरबा नृत्य, विविध कार्यक्रम, आरत्या, स्त्रियांचं नटणं, मोठमोठ्या आवाजात चालणारे लाऊडस्पीकर या गोष्टींचीच रेलचेल दिसते. त्यात देवी पूजनाचं महत्त्व क्वचितच जाणवतं. या दिखावटीला महत्त्व देणार्‍या वातावरणात वावरताना तुम्हीही या उत्सवांमध्ये सगळ्यांबरोबर चालत राहाता, वाहत जाता. शक्तीचं नेमक महत्त्व ओळखून आपल्यातील सर्व प्रकारच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करणं व स्वत:बरोबर समाजासाठी त्या उपयोगात आणणं, ही खरी शक्तीपूजा!
शिक्षण घेेताना विवेक जागृत हवाच. पुस्तकी ज्ञानाबरोबर सणसमारंभातून जाणवणारी संस्कृतीही आपल्या दैनंदिन जगण्याचा एक भाग आहे. पंरपरा आहे तशी डोळे मिटून पुढे नेण्यापेक्षा डोळे, कान उघडे ठेवून तिच्याकडे पाहायचं आणि तिच्यातलं सार विवेकाने तपासून आपल्या जीवनाला लावून बघायचं, मगच ते पुढे न्यायचं. अन्यथा आंधळेपणानं त्यातील अनावश्यक भागच पुढे जाण्याची शक्यता निर्माण होते. उलट विवेकबुद्धीने पंरपरेकडे पाहत, त्यातील मर्म जाणून, नेमकी कृती केल्यास तुमचं-आमचं सर्वांचंच जीवन अधिकाधिक समाधानाकडे प्रवास करेल. तुमच्यासारख्या मुलांचा तर यात सर्वाधिक मोलाचा वाटा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षणाचा उपयोग विवेक जागृत ठेवण्यासाठी केला तर सरस्वती आणि लक्ष्मी या दोन्ही रूपांची पूजा सफल ठरेल, नाही का!
- डॉ. मानसी गानू