स्वदेशी स्वदेशी

दिंनाक: 25 Sep 2017 16:41:32


स्वदेशी शब्द उच्चारला की, आमच्या डोळ्यांसमोर केवळ स्वदेशी वस्तू येतात. ‘स्वदेशी’ शब्दाला इतका छोटा अर्थ नाही. त्याला विशाल अर्थ आहे. छोट्या छोट्या गोष्टींतून स्वदेशी बाणा प्रकटत असतो.

अगदी साधी गोष्ट पाहा ना - पारतंत्र्यात बहुधा शंभर टक्के लोक आम्ही ‘आई’ असे म्हणत होतो. स्वातंत्र्यात हा स्वाभिमान कमी कमी होत गेला. बघा ना ‘आई’ शब्द जगातील नितांत सुंदर आहे. कवी यशवंतांची ‘आई म्हणोनि कोणी’, ही कविता कवी माधव ज्युलियन यांची ‘प्रेमस्वरूप आई’ ही कविता वा ‘श्यामची आई’, ‘विनूची आई’, ‘आई समजून घेताना’ ही पुस्तके वाचताना आपल्या डोळ्यांत पाणी येते. आई हा सर्वांत गोड, मधुर, सुंदर शब्द आपण संपवून टाकला आणि त्या जागी, ज्यांनी आम्हाला दीडशे वर्षेगुलामगिरीत लोटले या इंग्रजांचा ‘मम्मी’ हा शब्द मोठ्या आवडीने प्रस्थापित केला. तसेच, बाबा शब्दाऐवजी पप्पा, डॅडी हे परकीय शब्द मोठ्या आवडीने रूढ झाले आहेत.

मुस्लिम राजवटीमुळे शेकडो फार्सी, अरबी, तुर्की शब्द मराठीत घुसले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांच्याकडून राजव्यवहार कोश रचून अनेक सुंदर मराठी शब्द रूढ केले. पुढे इंग्रजी राजवटीमुळे शेकडो इंग्रजी शब्द मराठीत घुसले. मराठी भाषेला अशुद्ध स्वरूप येऊ लागले; त्यामुळे दु:खी झालेल्या स्वा. सावरकरांनी अतिशय सुंदर मराठी शब्द निर्माण केले. महापौर, नगराध्यक्ष, क्रमांक, प्रशाला आणि कितीतरी! तर मग आपण निश्‍चय करू या की, इंग्रजी मला उत्कृष्टच येईल; पण मराठी बोलताना मी शुद्ध मराठीतच बोलणार. स्वा. सावरकर वृद्धापकाळी खूप आजारी असतानाही शुद्ध मराठी शब्दच कटाक्षाने वापरत होते.

आपल्याला कुणाचा दूरध्वनी (टेलिफोन) आल्यास आपण हॅलो न म्हणता आवर्जून ‘नमस्कार’ शब्दाने प्रारंभ करावा.

इंग्रजी राजवटीत सर्वत्र इंग्रजी कालगणना आरंभित झाली. अजूनही तीच चालू आहे. मात्र एक गोष्ट आपल्याला करता येईल. महाभारतयुद्ध संपले आणि नवीन शके/संवत्सर चालू झाला. त्याचे नाव युधिष्ठिर संवत किंवा कलियुगाब्ध वा युगाब्ध. सध्या युगाब्ध 5119 चालू आहे. पुढच्या  वर्षप्रतिपदेपासून 5120, तर इंग्रजी दिनांकासही युगाब्धही लिहावे.

एकमेकांना भेटल्यावर वा निरोप देताना बाय, हाय, गुड मॉर्निंग, गुडे डे आदी शब्दांऐवजी कटाक्षाने मराठी शब्द वापरावेत.

वाढदिवसाच्या मंगलमयी वातावरणातही पाश्‍चात्त्यपण घुसलेच आहे. ते टाळून भारतीय पद्धतीने औक्षण केले पाहिजे. स्वत: सुधारक असूनही कविवर्य कुसुमाग्रजांनी ‘औक्षणा’चे महत्त्व सांगितले आहे. औक्षण म्हणजे आयुष्यवंत व्हा. औक्षणामुळे ऊर्जा मिळते, ऊर्जा म्हणजे ऑरा! निरंजन, अक्षता, सुपारी, सुवर्ण या ऊर्जावस्तू आहेत. ही ऊर्जा मिळवून आपण आनंदी होऊ या!

स्वदेशी हा आपला मूलमंत्र झाला पाहिजे. स्वदेशी आपले ध्येय झाले पाहिजे. स्वदेशी हाच आपला नारा, स्वदेशी हीच आमची घोषणा झाली पाहिजे. जर स्वदेशी हा मंत्र आपण जपला नाही, आचरला नाही, तर आपले अस्तित्व टिकणार नाही, इतकी ही अत्यावश्यक गोष्ट आहे.

- सु.ह.जोशी 

[email protected]