‘मोठेपणी कोण व्हायचंय?’ शालेय जीवनात विचारला जाणारा प्रश्न, ज्याची उत्तरही ठरलेली असतात.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज हाच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. ‘मला कोण व्हायचंय?’ आणि जे उत्तर येईल ते तुमच्या डायरीत लिहून ठेवा. आता पुढे काय? हा मोठा कठीण प्रश्न आहे. आणि कठीण प्रश्नांना सोप्पी उत्तर नसतात. त्यामुळे याचं उत्तर मिळवणं सुद्धा तेवढंच 

कठीण आहे; पण अशक्य नाही.

दोस्तांनो, आपला इतिहास हा आपला मार्गदर्शक असतो. इतिहास हा चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारचा असतो. यातल्या चांगल्या गोष्टींची नोंद घेऊन त्याहून अधिक चांगल्या गोष्टी आपण करायच्या असतात आणि वाईट गोष्टी टाळायच्या असतात. इतिहास म्हणजे काही फक्त राजे-महाराजांच्या कारकिर्दी आणि सनावळ्या, युद्ध, तह एवढंच नाही बरं, तर तुमच्या आई-बाबांनी, आजी-आजोबांनी त्याच्या लहान वयात, शालेय-महाविद्यालयीन जीवनात काय काय केलं हाही इतिहासच. फक्त शाळेतल्या परीक्षेत त्यावर प्रश्न विचारले जात नाहीत एवढंच. पण आपण तरी कुठे इथे शाळेतल्या परीक्षेचा विचार करतोय आपण विचार करतोय आयुष्याच्या परीक्षेचा जिथे परीक्षार्थीही आपणच आणि परीक्षकही आपणच. आणि प्रश्नपत्रिकाही आपणच काढलेली असते. ज्यात एकच प्रश्न असतो, ‘मला कोण व्हायचंय?’  याचं उत्तर एकदा का ठरवलं की ते पूर्ण करण्यासाठी मग आपली खरी परीक्षा सुरू होते. हा प्रवास असतो विजयाला गवसणी घालण्याचा!

सखोल विचार, उत्तम नियोजन, सूत्रबद्ध कृती या त्रिसूत्रीने तुम्ही विजयाला गवसणी घालू शकता. तुमचं अंतिम ध्येय साध्य करणं हा तुमचा विजय असतो आणि तो मिळवण्यासाठी तिथेपर्यंत पोहोचण्याचे टप्पे ठरवणं फार महत्त्वाचं असतं. इथे उपयोगी पडतो सखोल विचार. धेय्य निश्चित करत असताना स्वतःचं मूल्यमापन करणं विशेष महत्त्वाचं असतं. हे करत असताना आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्यातली विशेष गुणवत्ता, कौशल्य याचं पूर्ण भान आपल्याला आलं पाहिजे. विशेषतः आपल्यातले गुण-दोष आपल्याला ओळखता आले पाहिजेत. तसंच वर म्हटल्याप्रमाणे आपला ‘इतिहास’ही मदतीला येतोच. यासाठी एक सोप्पी पद्धत अवलंबता येईल. एक कागद घ्यायचा त्यावर उभी रेष मारून दोन भाग करायचे; त्याच्या एका बाजूला आपल्यातले गुण आणि दुसऱ्याबाजूला दोष लिहून काढायचे. असं करण्याचा उद्देश हा स्वतःला चूक किंवा बरोबर ठरवण्याचा मुळीच नसतो. तर यामुळे आपण कोण आहोत हे ओळखायला मदत होते. हे करून झाल्यावर आपण जे डायरीत लिहून ठेवलेलं उत्तर आहे ते उत्तर समोर ठेवायचं आणि त्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याची यादी करायची. डायरीत लिहून ठेवलेलं अंतिम साध्य (मला कोण व्हायचंय?) साधण्यासाठी अर्थात विजय मिळवण्यासाठी हे गुण-दोष पुरेसे आहेत का? याची आपणच तुलना करायची. अगदीच गरज वाटली तर आई-बाबा किंवा आवडते शिक्षक-शिक्षिका किंवा आपल्या नजरेत जे आपल्याला ‘ग्रेट’ वाटतात त्यांच्याशी याविषयी चर्चा करायची आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी उपलब्ध असलेली कौशल्य आणि आवश्यक असलेली कौशल्य यांची एक नवी यादी तयार करायची. इथे पूर्ण होतो सखोल विचार.

आता करायचं उत्तम नियोजन. म्हणजे थेट विजयाच्या लढाईचं प्लॅनिंग. इथे पुन्हा इतिहास मदतीला येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतिम ध्येय काय होतं तर ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन करणं. मग त्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्यांनी प्रयत्न केले. प्रसंगी छोट्या छोट्या पराजयालाही ते सामोरे गेले. अनेक मोहाचे क्षण त्यांनी टाळले. या इतिहासाचा आधार घेऊन आपल्याला नियोजन करणं सोप्प होईल. तर करायचं काय पुन्हा कागद पेन घायचं. एकदम वर आपलं अंतिम साध्य लिहायचं आणि सगळ्यात शेवटी ‘मी’ असं लिहायचं, त्यानंतर त्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी चार टप्पे निश्चित करायचे.

  • Immediate goal, (तत्काळ जे साध्य करायचं तो टप्पा)
  • Short term goal, (काही कालावधीनंतर जिथे पोहोचायचं तो टप्पा)
  • Midterm goal (अंतिम साध्याच्या जवळ नेणारा टप्पा)
  • Long-term goal (अंतिम साध्य) 

उदा., तुम्हाला जर डॉक्टर व्हायचंय तर,

  • Immediate goal, (तत्काळ जे साध्य करायचं तो टप्पा) भरपूर अभ्यास करण्याची तयारी. इथे अनेक मोह टाळावे लागतील.
  • Short term goal, (काही कालावधी नंतर जिथे पोहोचायचं तो टप्पा) गणित आणि विज्ञान या विषयाचं सखोल ज्ञान मिळवणं
  • Midterm goal (अंतिम साध्याच्या जवळ नेणारा टप्पा) उत्तम अभ्यास करून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणं
  • Long-term goal (अंतिम साध्य) चांगला डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळवणं

असे प्रत्येकाचे चार टप्पे वेगळे निघतील.

नियोजन तर झालं. आता ? सुसूत्रबद्ध कृती. म्हणजेच हे प्रत्येक टप्पे पूर्ण करून अंतिम विजय मिळवण्याच्या दिशेने प्रवास. ही सुसूत्रबद्ध कृती ज्याची त्यानेच ठरवलेली बरी नाही का? कारण तुमच्यातल्या गुणदोषाची यादी तुमच्याजवळ आहे. एक छोटीशी ‘टीप’ देतो आणि हा लेखन प्रपंच आटोपता घेतो. अंतिम विजय मिळवण्यासाठीचं प्लॅनिंग करताना आवश्यक तिथे अनुभवी जाणकारांच मार्गदर्शन घ्या. प्रसंगी वरचे चार टप्पे पृर्ण करत असताना तुमची दिशा बदलवणाऱ्या अनेक घटना घडू शकतात अशा वेळी निश्चय डळमळू न देता ठाम राहा आणि अगदीच अशी एखादी आपत्ती आली की आता अंतिम साध्यापर्यंत पोहोचणं अगदीच अशक्य आहे तर, घाबरून जाऊ नका पुन्हा नव्याने त्या परिस्थितीत तुमच्या गुण-दोषांची नवी यादी तयार करा नवीन धेय्य निश्चित करा.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो एक कायम लक्षात ठेवा, लढाई कधीच संपत नसते. आपण एक एक टप्पे सर करत जायचे. विजय निश्चित असतो. 

-अक्षय वाटवे 

akshay.watve@gmail.com