भारत देशाला चीन, म्यानमार, श्रीलंका यांसारखे मैत्रदेश आहेत. कित्येक वर्षांपासून या देशांशी भारताचा व्यापार चालू आहे. मात्र सध्या भारत-चीन व्यापारातील वाढ ही भारतातील व्यापारासाठी घातक होत चालली आहे. भारतात प्रत्येक सणाच्यानिमित्ताने चीनमधून अनेक गोष्टींची मोठ्या प्रमाणात होणारी आवक भारताच्यादृष्टीने तोट्याची आहे. ही गंभीर बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात आली तर ‘राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियाना’चा खरा हेतू साध्य होईल, असा दृष्टिकोन समोर ठेवून शिक्षणविवेकने न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पपेट शोचे आयोजन केले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली ठकार यांनी ‘राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान’ अंतर्गत घेतलेले इतर उपक्रम सांगून पपेट शोची संकल्पना मांडली.

मंगळवार, दि. १९ सप्टेंबर रोजी इ. १ली ते ४थीच्या १५० विद्यार्थ्यांसमोर पपेट शोच्या माध्यमातून ‘स्वदेशी वापरा’चा संदेश दिला. शिक्षणविवेक समुपदेशक मानसी भागवत, जय गोळे आणि राधा भाग्यवंत यांनी पपेट शोचे सादरीकरण केले. गणेशोत्सव, दिवाळी यांसारख्या सणांच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या, स्वस्त म्हणून खरेदी होणाऱ्या विदेशी वस्तू वापरल्यामुळे होणारे तोटे, त्यामुळे देशाचे होणारे नुकसान यांची मजेदार गोष्ट ‘बंडू व आजी’ यांच्या संवादातून ऎकायला मिळाली. लहानपणापासूनच स्वदेशी वापराची जाणीव झाली तर ती सवय होऊन एक मोठे देशकार्यच आपल्या हातून घडेल, असा विश्वास गोष्टीतील आजीच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. गोष्टीतील गमती, उत्तम संवादफेक, बाहुल्याचे हावभाव व हालचाली, संवाद आणि बाहुल्यांचा अभिनय यातील उत्तम सुसूत्रता या वेळी पाहायला व ऐकायला मिळाली.

एका तासाच्या पपेट शोमध्ये मुलांना खूप मजा आली. बाहुल्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्साहात आणि मोठ्याने उत्तरे देताना पपेट शोचा आनंद सर्वांच्या चेहेऱ्यावर दिसत होता. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी शिक्षणविवेक आयोजित भव्य किल्ले स्पर्धेची माहिती सांगितली. कार्यक्रमाला न्यू इंग्लिश मिडीयम माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आभा तेलंग, शिक्षणविवेक कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. आभार प्रदर्शनानंतर स्वदेशी वापरण्याचा संदेश मनात ठेवून बालचमू आपापल्या वर्गात परतली.

-प्रतिनिधी 

[email protected]