कार्यशाळा – हस्तलिखित तयार करणे.

ठिकाण  - सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल, पुणे.

भाषा शिकण्याच्या चार पायऱ्या म्हणजे श्रवण, भाषण, वाचन, लेखन. या चारही पायऱ्यांचा अभ्यास करताना शाळांमध्ये अनेक उपक्रमांचा आधार घेतला जातो. त्यातील चौथी पायरी चढताना विमलाबाई गरवारे हायस्कूलने विद्यार्थ्यांसाठी ‘हस्तलिखित तयार करणे’ हा उपक्रम राबवायचे ठरवले. त्यासाठी मागील पाच वर्ष लेखन क्षेत्रात काम करत असलेल्या शिक्षणविवेकने विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित तयार करण्याची कार्यशाळा घेतली.

सोमवार दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते १२.०० या वेळात इ. ५वी ते ७ वी च्या ६० विद्यार्थ्यांनी. तर इ. ८वी व ९वीच्या ५५ विद्यार्थ्यांनी बुधवार, २० सप्टेंबरला या कार्यशाळेत सहभाग घेतला. प्रत्येक वर्गातील निवडक ५ विद्यार्थी हे त्या-त्या वर्गाचे हस्तलिखिताचे संपादक मंडळ होते. शिक्षणविवेकच्या सहसंपादक रेश्मा बाठे आणि शिल्पकार चरित्रकोशाच्या सहसंपादक चित्रा नातू यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केलं.

रेश्मा बाठे यांनी हस्तलिखिताचे अंतरंग हा विषय मांडताना मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत सर्व घटकांना स्पर्श केला. अनुक्रमणिका, मनोगत, समाप्ती चिन्ह अशा छोट्या छोट्या, पण महत्त्वाच्या सर्व विषयांची माहिती विद्यार्थ्यांना समजली.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात चित्रा नातू यांनी हस्तलिखिताचे लेखन साहित्य, सजावट, मांडणी या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘कल्पनाशक्ती’ ही एक गोष्ट प्रत्येकाकडेच असतेच. ती विकत मिळत नसून तिला परिश्रमपूर्वक जोपासावे लागते, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. हस्तलिखित तयार करताना वर्गातील प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीचा वापर कसा करावा; याविषयी अनेक उदाहरणे देत त्यांनी मुलांची कल्पनाशक्ती जागृत केली. हस्तलिखिताचा विषय कसा निवडावा, वाचनीय लेखाची निवड कशी करावी, हस्तलिखिताचा ले-आउट कसा असावा अशा अनेक मुद्यांना स्पर्श करत प्रकाशन कसे असावे असा हस्तलिखिताचा सर्व प्रवास या कार्यशाळेत उलगडला गेला. 

कार्यशाळेदरम्यान ५वी ते ७वीच्या विद्यार्थ्यांनी समाप्ती चिन्हाचा सराव केला. तर ८वी व ९वीच्या विद्यार्थ्यांनी हस्तलिखिताचे एक पान तयार केले. कमी वेळ असूनही विद्यार्थ्यांनी उत्तम कल्पना लढवल्या होत्या. विचारपूर्वक कल्पनाशक्तीचा उपयोग करून बनवलेले एक पान इतके सुंदर होऊ शकते तर आपले हस्तलिखित कित्ती सुंदर होईल; याचा नेमका संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला, अर्थात हे या कार्यशाळेचे यश म्हंटले पाहिजे. 

जानेवारी महिन्यात होणाऱ्या हस्तलिखित स्पर्धेचे वेळापत्रक याच कार्यशाळेत तयार झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका सविता काजरेकर यांनी मांडलेली कार्यशाळेची संकल्पना उत्तम होती. विद्यार्थ्यांना अनेक बाबींची स्पष्टता येण्यास त्यामुळे मदत झाली. शिक्षणविवेक प्रतिनिधी भारती कुंभार आणि नलिनी पवार यांनी केलेली व्यवस्था उत्तम असल्यामुळे दृक-श्राव्य अशा दोन्हीही माध्यमातून हस्तलिखितातील बारकावे समजण्यास मदत झाली. 

शाळेच्या उपमुख्याध्यापिका सुलभा विधाते यांनी कार्यशाळेचा हेतू आणि अपेक्षा सांगितल्या. शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी शिक्षणविवेकच्या आगामी स्पर्धांची माहिती सांगून विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

-प्रतिनिधी 

[email protected]