शिक्षक कार्यशाळा - अहिल्यादेवी प्रशाला 

उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स या शाळेत शिक्षकांसाठीही अनेक उपक्रम घेतले जातात. उत्साहाने आणि दर महिन्याला घेतला जाणारा एक उपक्रम म्हणजे ‘शिक्षक प्रबोधिनी’. या महिन्यातील शिक्षक प्रबोधिनीमध्ये ‘शिक्षणविवेक’ आयोजित व्याख्यान घेतले गेले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा शिंदे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात शिक्षणविवेकच्या समुपदेशक मानसी भागवत या व्याख्यात्या होत्या. शुक्रवार, ०१ सप्टेंबर २०१७ रोजी दुपारी १२.३० ते २.०० या वेळात झालेल्या शिक्षक प्रबोधिनीमध्ये सुरुवातीला शिक्षणविवेकच्या कार्यकरी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढेही ‘शिक्षणविवेकचा मदतीचा हात सतत पुढे असेल’, असा विश्वास दिला.‘शिक्षणविवेक’ समुपदेशक मानसी भागवत यांनी या व्याख्यानात ‘एकाग्रता’ हा विषय मांडला. एकाग्रता म्हणजे काय, या प्रश्नापासून सुरुवात झालेल्या या व्याख्यानात एकाग्रता वाढवण्याविषयीचे अनेक कृतीखेळ घेतले गेले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात उपमुख्याध्यापिका कोरके, पर्यवेक्षिका स्मिता करंदीकर आणि अनघा डांगे यांनी सक्रीय सहभाग घेतला. सर्व शिक्षक मोठ्या उत्साहाने खेळ खेळत होते. प्रत्येकाची एकाग्रतेची व्याख्या वेगळी असली तरी स्वतः आणि विद्यार्थी या दोन्ही घटकांना उपयोगी ठरतील अशा अनेक मुद्यांवर चर्चा घेण्यात आली. एकाग्रता वाढवण्यासाठी आवश्यक मानसिकता, भावनिक समतोल असे विषय ऐकताना प्रत्येकजण स्वतःबरोबर विद्यार्थ्यांचा विचार करत होते.  व्याख्यानात शाळेच्या अभ्यासक्रमातील विषयांना स्पर्श होत असल्याने अध्यापन करताना येणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे विचारली जात होती. यावरून सर्व शिक्षक कृतीखेळांचा वापर करण्याविषयी विचार करत होते, हे लक्षात आले. या कृतीखेळांमुळे अध्यापनात येणारी रंजकता शिक्षकांना अनुभवता आली.

साठ शिक्षकांच्या शिक्षक प्रबोधिनीत ‘एकाग्रता’ या विषयावरील मानसशास्त्रीय संकल्पना लक्षात आल्यामुळे एक नवी दिशा मिळाली. ‘विद्यार्थ्यांशी संबंधित विषय असल्याने वाढलेल्या उत्सुकतेला समर्पक उत्तरे मिळाली’, अशा अनेक उत्तम प्रतिक्रिया या व्याख्यानात उमटल्या. व्याख्यानानंतर शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी दिवाळी अंकासाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धांची माहिती सांगितली. कार्यक्रमात प्रज्ञा करडखेडकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन गरुड यांनी केले होते.

प्रतिनिधी

[email protected]