वरतोंडे

दिंनाक: 18 Sep 2017 17:59:24


‘‘काय, आज कशी आहे तब्येत? नाही म्हणजे, काल तुम्ही ठणाठणा ओरडत होतात. नंतर तुमच्या तोंडातून फेस बाहेर ऊतू जात होता. तुमची नेहमी घुर्रऽऽघुर्र, खूळऽऽखूळ आणि सूर्रऽऽसूर्र ऐकायची सवय. हे तुमचं असलं फेसाने फसफसलेलं तोंड या आधी मी तरी कधी पाहिलं नव्हतं हो, म्हणून चौकशी केली.’’ हे इतकं बोलूनसुद्धा त्याचं तोंड उघडंच होतं आणि त्याच्या तोंडातले स्टीलचे टोकेरी धारदार दात चमकत होते.

‘‘अहो, खरं सांगू का! कुणीतरी आपली चौकशी केली, तर खूप बरं वाटतं मला. मला असं कोपर्‍यात बसवलं असल्याने फारफार एकटं वाटतं. तुमच्यासारख्या घरंदाजांनी माझी विचारपूस केली की, माझं पहिलं तोंड प्रेमाने भिजून जातं.’’

‘‘काऽऽय? तुम्हाला दोन तोंडं आहेत?’’

‘‘हो..हो! अहो, आमचं घराणं जरी मोठं असलं, तरी त्यातले काही ‘दुतोंडे’ असतात, तर काही ‘एकतोंडे’ असतात आणि त्या बिचार्‍या एकतोंड्यांची तर आणखीनच मजा आहे...’’

‘‘मजा..? म्हणजे?’’

‘‘आता हे पाहा, आपल्या सगळ्यांची तोंडं वरती असतात की नाही?’’

‘‘म्हणजे मला दोन तोंडं आहेत, पण ती वरतीच आहेत ना? काय?’’

‘‘शी..! हा काय प्रश्न झाला?

अहो, तोंड वरती असेल तरच खाता येईल ना? माणसांचीच काय पण जनावरांची तोंडंपण वरतीच असतात ना.. काय?

खरं सांगतो, मी तरी अजून खाली तोंड असणारा माणूस आणि मागे तोंड असणारं जनावर पाहिलेलं नाही. आणि..’’

‘‘आता आणि काय..?’’

‘‘आणि.. तुमच्या घराण्यात असतात, तशी दुतोंडी माणसंपण मी पाहिलेली नाहीत हो..!’’

‘‘तुमची पण कमालच आहे! तुम्हाला काही सांगायला गेलं, तर तुम्ही त्याचा पार भुगाच करून टाकता.’’

‘‘काय करणार..? आदत से मजबूर..!’’

‘‘बरं, पुढे बोला. काय ते पटकन सांगा. उगाच फेस काढत बसू नका.’’

‘‘तर ऐका! या एकतोंड्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक आहेत आपल्यासारखे ‘वरतोंडे’, पण.. दुसरे जरा चमत्कारिक आहेत. म्हणजे त्यांचं तोंड समोरच असतं, पण वरती नाही तर ‘मध्यभागी’ असतं. त्यांचं थोबाडही मोठं असतं.

तुमच्यात पण असतात का हो, असे मोठं थोबाड असणारे समोरतोंडे की फक्त वरतोंडेच?’’

‘‘असला प्रश्न विचारण्याची तुमची हिंमतच कशी झाली? अरे.. आमचा संबंध हा अन्नाशी असतो. जेवणाशी असतो आणि अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने आम्हाला डोक्याने काम करावं लागतं. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी डोकंच चालवावं लागतं. म्हणून.. आमच्या डोक्यात ही खादाड माणसं वेगवेगळी तोंडं बसवतात. अहो.. आमचं डोकं चाललं तरच माणसांची तोंडं ‘चालतात’ अशी आमच्यात म्हण आहे ती काय उगाच! अभी कुछ समझे..?’’

मिक्सर एव्हढं बोलला, तरी त्या सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनला फारसं काही कळलंच नाही. त्यानं विचारलं, ‘‘मला सांग, तू पण आमच्यासारखा दुतोंड्या आहेस ना?’’

‘‘अरे, मी एका वेळी एकतोंडे, पण शंभर टक्के वरतोंडे!!’’

‘‘आता हे काय नवीनच..?’’ ‘‘अरे या घरातल्या माणसांच्या तोंडाला जसजशी खाज सुटते किंवा त्यांची जीभ जसजशी खवळते, तसतशी ही माणसं माझी तोंडं बदलतात.’’

‘‘अरे, पाणी सुटलं तोंडाला, नवीन तोंड लावा मिक्सरला’’ असं या घरातली मुलं म्हणत असतात.

‘‘अरे मिक्सू, मला जरा समजेल असं सांग रे.. त्यांची जीभ खवळली आणि तुझी तोंडं बदलली? म्हणजे काय?’’

‘‘ओके. अं.. समजा.. घरातल्या छोट्या मुलांनी हट्ट केला की, आम्हाला आताच्या आता फ्रुट ज्यूस पाहिजे आहे, तर मग घरातली मोठी माणसं माझ्या डोक्यात ज्युसर बसवतात. मी डोकं गरगर चालवून ज्यूस काढतो.

आजोबा आजींना हवा असतो मिल्क शेक. मग ते ज्युसर काढतात आणि माझ्या डोक्यात शेकर लावतात.

सँडवीचकरता झणझणीत चटणी हवी असेल, तर ग्राइंडर लावतात.

भाज्या चिरायला, कांदा कापायला, बटाट्याचे काप करायला, गाजर किसायला, इतकंच काय कणिक मळायलासुद्धा मला माझंच डोकं वापरावं लागतं.’’

‘‘बाप रे..! म्हणजे ही माणसं आपल्या स्वत:च्या डोक्यांनी काहीच काम करत नाहीत असं दिसतंय. अगदीच बिनडोक!’’

‘‘नाही.. नाही! बिनडोक नव्हेत, तर भलतीच डोकेबाज आहेत ती!’’

‘‘खरंय. त्यांच्या डोकेबाजपणामुळे तुला वारंवार डोकं चालवून चालवून तुझ्या पोटातली मोटार पार थकून जात असेल, नाही का?’’

‘‘अरे, मोटार तर थकतेच; पण गरगर पाती फिरून तोंडसुद्धा गरम होतं.

पण, काही वेळा ही बिनडोक माणसं माझ्या तोंडात इतकं काही कोंबतात, की मला घुसमटायलाच होतं. घशात रोठरा बसतो. विजेचे धक्के बसले, तरी तोंडातली पाती काही फिरता फिरत नाहीत. अशा वेळी अक्षरश: जीव जायची पाळी येते..’’

‘‘बाप रे! काय करतोस काय मग..?’’

‘‘काही नाही. तोंड बंद करून पोटातून गुर्रगुर्र गुर्रगुर्र असा आवाज काढला की ही माणसं घाबरतात.

प्रत्येकाला आपल्या पोटाची काळजी असतेच ना! मग घेतात सांभाळून मला.’’

‘‘गप्पा मारताना तुझ्या त्या अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहूनच गेलं बघ!

आता आपण जरी वरतोंडे असलो, तरी आपण काही पैसे खात नाही ना! काल त्यांनी पॅण्टस् धुवायला टाकल्या आणि पॅण्टस्च्या खिशात चिल्लर. त्यामुळे माझ्या पोटात सुरू झाला चिल्लर ऑर्केस्ट्रा!

प्रमाणात साबण पावडर खाल्ली, तर सहज पचते आम्हाला; पण पावडर झाली डब्ब्ल!

मग.. झालं मला अपचन!

साबणाच्या अशा काही उचक्या लागल्या, ढेकरा आल्या, शिंका आल्या की नाका-तोंडातून साबणाच्या फेसाचा महापूर उसळला!’’

‘‘अरे बाप रे..! काय रे, रोज मूठभर साबणाची पावडर खाताना तुला मळमळत नाही?’’

‘‘काहीतरीच काय..?

अरे.. वडापाव, समोसे आणि लसूण चटणी खाणारं किंवा आईसक्रीम खाऊन मिल्कशेक पिणारं वॉशिंग मशीन पाहिलं आहेस का तू कधी?

आम्ही आवडीने साबण पावडर खातो आणि ताकदीने कपड्यातला मळ बाहेर खेचून काढतो.

हल्ली तर आईसक्रीमप्रमाणे निरनिराळ्या चमकदार रंगांच्या आणि वेगवेगळ्या घमघमीत फ्लेवर्सच्या मस्त साबण पावडरी मिळतात.’’

‘‘अरे, ‘ज्याला साबणाची चव लागली त्याला स्वच्छता कळली’ ही चिनी म्हण तुला माहीतच असेल. मी पण चाखलाय साबण.’’

‘‘खरं की काय..?’’

‘‘मी आधी काहीही खाल्लं, तरी मुखशुद्धीला अगदी चिमूटभर साबण खातोच. तेव्हा कुठे मी टकाटक स्वच्छ होतो!

‘जेव्हा वरतोंडे

गरगर गरगर गरगरतात,

तेव्हाच माणसे भरल्यापोटी स्वच्छ कपडे घालून

फिरफिर फिरफिर फिरफिरतात.’

ही चिनी म्हण आपल्यालाच लागू आहे.’’

वाचताय ना बोलणारी ही पात्र. बघा कशा बोलतात या निर्जीव गोष्टी. राजीव तांबे यांच्या शब्दांत. 

सुंदरी

- राजीव तांबे