नमस्कार मित्रांनो!, कसे आहात? श्रावण सरला, त्यानंतर भाद्रपद आला. पुढच्या वर्षी परत येण्याचं आश्वासन देऊन गणपती बाप्पा गावाला गेलेसुद्धा. हळूहळू पाऊसही ओसरू लागलाय आणि ऑक्टोबरमधल्या उन्हाने सप्टेंबरमध्येच आपली जाणीव करून द्यायला सुरू केली आहे. भरपूर पडलेल्या पावसाने कोकणातल्या नद्या, विहिरी ओसंडून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे कृषिवलही निर्धास्त झाले आहेत. पावसाळा असल्यामुळे दर्यालाही उधाण आलं आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात अन्यत्र दुष्काळाने स्वतःचं बस्तान बसवलं असलं तरी कोकण मात्र अद्याप पाण्याच्या बाबतीत सुदैवी आहे. याचं कारण आहे या प्रांताला मिळालेली जलसंपदेची देणगी.

कोकणाला अरबी समुद्राचा जवळपास ७२० किलोमीटर किनारा लाभला आहे. अगदी पालघर, ठाणे ते अगदी गोव्यापर्यंत हा समुद्र आपल्याला कोकणातल्या या जलसमृद्धतेची साक्ष देतो. समुद्र, किनाऱ्यावरील नारळाचं, बांबूचं बन, किनाऱ्यावर असणारं एखादं छोटंसं मंदिर, मासेमारांच्या जिकडे तिकडे लागलेल्या बोटी, जाळ्या हे असं दृश्य अनेक गावांतून दिसून येतं. आपण रायगड जिल्ह्यातील कोणत्याही किनाऱ्यावर गेलो तर तिथे दिसणारा समुद्र हा फिकट निळ्या रंगाचा दिसतो. त्याच रूपही फार घाबरवणारं नसतं. पण जसजसे आपण दक्षिण कोकणात उतरायला सुरुवात करतो तसतसा समुद्राचा रंग हा अधिक गडद निळा-हिरवा होत जातो. या गडद रंगासोबत समुद्राचं रूपही गंभीर होत जातं. त्याचा अवखळपणा निघून जातो आणि एका पोक्त माणसासारखा तो भासू लागतो. अशा वेळी पावसाळ्यात समुद्रात जाणं म्हणजे जीवाशी खेळ. म्हणूनच आज तंत्रज्ञानाच्या साथीने सगळं काही शक्य असतानाही पावसाळ्यात मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याची पूर्वापार चालत आलेली रीत किनाऱ्यावरचे लोक अद्यापही पाळत आहेत. कोकणातला निसर्ग, तेथील समुद्राचं बदलत जाणार रूप, त्या त्या भागाचं वैशिष्ट्य याचं साहित्यिकांनाही आकर्षण वाटलं. चिं. त्र्यं. खानोलकरांच्या साहित्यकृतींमध्ये अनेक ठिकाणी हा समुद्र वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटतो. थोडे मोठे झालात की खानोलकरांच्या कादंबऱ्या आवर्जून वाचा. निसर्गाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी तुम्हाला त्यातून मिळेल.

कोकणातली जलसंपदा ही केवळ समुद्रापुरती मर्यादित नाही बरं का! कोकणातल्या प्रत्येक घरात आपल्याला विहीर असलेली दिसून येते. प्रत्येक दारात असणारी बारा महिने पाणी देणारी विहीर हे कधी काळी कोकणाचं वैभव होतं. पण ऋतुचक्र बदललं आणि विहिरीचं पाणीही आटू लागलं. आता मात्र अनेकांना पाण्यासाठी दुसरे पर्याय शोधावे लागत आहेत. अनेक ठिकाणी ज्या जमिनींमध्ये पाण्याचा अंश आहे अशा ठिकाणी कुपनलिका बसवून पाण्याचा उपसा सुरू झाला आणि जमिनीतील जलांश कमी झाला. आज कोकणात बऱ्याच ठिकाणी शेतीचा कस कमी झाला आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्राच्या मानाने कोकणात अजूनही दुष्काळाचा फारसा त्रास होत नाही. मित्रांनो!, आपण नेहमी म्हणतो money save is money gain. अर्थात पैशांची बचत म्हणजेच पैशाची कमाई. हीच गोष्ट पाण्यालाही लागू होते. पाण्याची बचत हीच पाण्याची कमाई. आज कोकणात अनेक ठिकाणी नळ आलेत. मात्र घरात नळ आलेल्यांना पाण्याची किंमत उरली नाही, असं चित्र मी अनेक ठिकाणी पाहिलंय. खरं तर पाण्याच्या अशा दुहेरी, तिहेरी पुरवठ्यावर सुयोग्य नियोजनाचा तोडगा काढून त्याचा वापर केला पाहिजे.  

कोकणात पश्चिम महाराष्ट्रासारख्या मोठ्या नद्या नसल्या तरी छोट्या छोट्या नद्या, ओढे मात्र कोकणात दिसून येतात. जगबुडी, सावित्री, वशिष्ठी या कोकणातल्या मुख्य नद्या. यांच्याच उपनद्या, ओढे ज्या घरांमध्ये विहिरी नाहीत अशा घरांना पाण्याचा पुरवठा करतात. अनेक छोटे मोठे तलावही कोकणाचं जलजीवन समृद्ध करतात. आपली मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी असली तरी ती कोकणाचाच एक भाग आहे. आज कित्येक लाख लोक आपल्या पोटापाण्यासाठी, करिअरसाठी मुंबईत राहत आहेत. एवढ्या महाकाय शहरात राहणाऱ्या या लाखो लोकांना पाणीपुरवठा करणारे जलाशयही मुंबईच्या आसपासच आहेत. विहार, तानसा, भातसा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, तुळशी, मध्य वैतरणा हे सात जलाशय मुंबईला पाणीपुरवठा करतात. सुदैवाने अजूनही मुंबईला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागलेला नाही. पण पाण्याचा अपव्यय असाच सुरू राहिला तर भविष्यात हे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुरुवातीलाच मी म्हटलं तसं आजही निसर्गाने कोकणावर आपला वरदहस्त कायम ठेवला आहे. कोकणातल्या पिकांसाठी ही जलसंपदा आणि नित्यनेमाने पडणारा पाऊस अतिशय पूरक आहे. पण ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात झालेले बदल आता पावसावर आणि त्याला जोडून येणाऱ्या जलसंपदेवर परिणाम करायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे प्रदूषणामुळे समुद्राचे पाणी दुषित होत चाललं आहे. यासाठी आपण पाउल पुढे टाकायला हवं. पाणी वाया जाऊ द्यायचं नाही, नदीत-समुद्रात सांडपाणी सोडायचं नाही, प्लास्टिकच्या वस्तू पाण्यात टाकायच्या नाहीत. आपणही हे करायचं नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही. जलसाक्षरतेच्या दिशेने आपलं हे पहिलं पाउल असेल.

कोकणातल्या पाऊलखुणा ही लेखमाला नक्की वाचा आणि कोकणाबद्दलची माहिती मिळवा.  

कोकणातल्या पाऊलखुणा ६

- मृदुला राजवाडे

[email protected]